Search This Blog
बाजे लष्कराच्या ये छावणीत आपले स्वागत असे हुजूर..
- छावणी
- सफर माझी स्थळांची
- अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर जिल्हा अकोला
- अद्भूत साक्षात्कार- लोणार.!(जिल्हा बुलढाणा)
- कलेचा अप्रतिम नमुना साकेगाव येथील साकेश्वर मंदीर(जिल्हा बुलडाणा)
- भेट कवी कलश यांच्या वाड्याला(जिल्हा कोल्हापूर)
- कान्नव बंगला-कारंजा येथील एका पुराण पुरूषाची भेट(जिल्हा अकोला)
- किल्ले बाळापूर-शंभुराजांची वर्हाडातील जहागीर(जिल्हा अकोला)
- जेव्हा थडगं बोलू लागतं-वाशीम येथील एका ब्रिटिश कालीन SP'चे घाडगे(जिल्हा वाशिम)
- टोका येथील सिद्धेश्वर मंदिर-उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार(जिल्हा औरंगाबाद)
- किल्ले बाणकोट-कथा सांगतोय आर्थर पॉईंट ची
- रेवदंडा व कोरलाई-पोर्तुगीज खंडारे नव्हे ती आमुची शौर्य प्रतीके(जिल्हा रत्नागिरी)
- भुलेश्वर-माळशिरस एक अप्रतिम अनुभव(जिल्हा पुणे)
- स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ-राजुरा (जिल्हा वाशिम)
- श्रीवर्धन हरिहरेश्वर-एक नयनरम्य भेट!
- सातगाव भुसारी मंदिर समूह (जिल्हा बुलढाणा)
- केशवाची एक प्राचीन मूर्ती: कुपटा (जिल्हा वाशिम)
- गणपतीचा वाडा:मैराळडोह-शतकापूर्वीचा दिव्य संकल्प(जिल्हा वाशिम)
- अमृतेश्वर-रतनगडाजवळील शिल्पाविष्कार(जिल्हा नगर)
- अंतरिक्ष पार्श्वनाथ-शिरपूरचे दिव्यत्व (जिल्हा वाशिम)
- दख्खन तक्त: अर्थात भेट जिंजी किल्ल्याची
- शिवपराक्रमाचा साक्षीदार वेल्लोरचा भुईकोट
- मेहकर येथील मध्ययुगीन दत्त मंदिर (जिल्हा बुलढाणा)
- for new title
- सफर माझी दस्तावेजांची
- एक सहज चिंतन: महाराज आणि शाहिस्तेखान
- औरंगजेब बादशहा इराणच्या बादशहाकडे राजदूत पाठवतो तेव्हा..
- आग्र्याच्या दरबारात शिवशंभू
- 'अहकामे आलमगिरी' अर्थात आलमगिराची आज्ञापत्रे
- इतिहासातील दारूबंदीची एक गमतीदार गोष्ट
- मोहम्मद अली जिना यांचे शेवटचे दिवस
- एक होता रोमेल: दुसऱ्या महायुद्धातील एका तेजस्वी सेनापतीची कथा
- शिवछत्र साल भेटीतून पुण्यातील NDA चे बीजारोपण
- कोंडाजी फर्जंद: बेखोफ छत्रपतिचा दिलफेक योद्धा!
- गुलामितून मुक्ती
- चाकणचा वेढा आणि फ्रान्सचा व्यापारी
- राजश्री साहेबांचे शासन:छत्रपती शंभूराजांचे सर्जेराव जेधे यांना ताकीद पत्र.!
- छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचे जीर्णोद्धार
- छत्रपती शंभुराजे विरचित बुधभूषण-||सरोवरस्य||
- कसा होता टिपू सुलतान..?
- बेइमानीची कथा सांगतो कोथळीगड
- पानिपताच्या अंतरंगातील काही..
- पानिपताचे आवतन देणारा थोर धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्लाह
- दारा शिकोह: एक पुण्यस्मरण..
- दक्षिण दिग्विजयाचे राजकारण-परराष्ट्र धोरणाचा अनोखा नमुना
- निजामाची विनोदी कथा-हुक्का आणि कॉफीची
- पारगड-चंद्रसूर्य असेतो गड जागता ठेवा!
- रणधूरंदर बाजीराव-भूमि कठीण आणि आकाश दूर!!
- समर्थांचे मनाचे श्लोक आणि मन-समजावंन
- मुल्ला मसीहाचे फारसी रामायण
- युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात-कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब
- महाराज चीनकडे लक्ष ठेवून आहेत!!
- वडले राजिक-छत्रपती शंभुराजांची गोवा मोहीम!
- सकल शास्त्राचा निशा- राजा सरफोजी भोसले तंजावर
- छत्रपती शिवाजी महाराजांचे मोगलांना खरमरीत उत्तर!!
- शिवरायांची राजनीति शत्रू मध्ये भेद-शिवरायांच्या इंटेलिजन्सची एक कथा!
- कथा पिता-पुत्राची:रामपूरच्या चंद्रावत राजांची!
- वीर सावरकर-युद्धाची बारूद शत्रूच्या शिबिरात!
- समकालीन फारशी साधनातून घडणारे दिव्य शिवदर्शन!
- सावनूरचे नवाब माधवराव पेशव्यांचे मामा..?
- हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा-३७१ वर्षापूर्वीचा दिव्य संकल्प!
- मार्मिक भाष्यकार भीमसेन सक्सेना
- Sub Tab
Featured
- Get link
- X
- Other Apps
माहूरचा किल्ले रामगड (Ramgarh Fort of mahur)
माहूर हे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला देवता दत्तात्रेय यांचे जन्मस्थान मानले आहे. दत्तात्रेय माता-पिता अत्रि ऋषी आणि सती अनसूया माता येथे वास्तव्यास होत्या असे पुराण कथा सांगते. दिव्य पुराण कथे शिवाय येथे इतिहास नांदतो तो किल्ले रामगडच्या रूपाने.!
आजचा माहूरगड अर्थात रामगड हा सातवाहन, वाकाटक, चालूक्य, राष्ट्रकूट आणि यादव राजवटीनंतर काही काळ गौंड आणि पश्चात बहामनीच्या ताब्यात राहिला. महाराष्ट्रात बहामनी घराण्यांची राजवट सन १३४७ मध्ये चालू झाली, तरी काही भागात युद्ध संघर्ष सुरू होता.
गोंडांच्या ताब्यातील माहूरवर बहामनी शासकांचे हल्ले:
चौदाव्या शतकात माहूरचा हा किल्ला गोंड राजांच्या सत्तेखाली आला. दक्षिणेत देवगड, चांदा व खेरला अशी गोंडांची राज्ये होती. यासुमारास माहूरचा किल्ला चंद्रपूरचा गोंड राजा तलवार सिंग (१३४७-१३९७) याच्या अधिपत्याखाली होता. महाराष्ट्रात यादवांच्या सत्तेचे पतन होऊन बहामनी सत्ता स्थापन झाल्यावर माहूरच्या या भागावरही बहामनी सुलतानांची आक्रमणे सुरु झाली. पहिला बहामनी शासक अल्लाउद्दीन बहमनशहा याने सन १३५० मध्ये माहूरच्या किल्ल्यावर स्वारी केली. यावेळी तलवारसिंगाने त्याचे अधिपत्य मान्य करुन खंडणी दिली. सुलतानाने खंडणीदाखल सफदरखान या अधिकाऱ्याची तेथे नेमणूक केली.
यानंतर चांद्याचे राज्य भरभराटीस आले. राजा दिनकरसिंग (१३९७-१४२२) याच्या काळात बहामनी सुलतान फिरोजशहा याने सन १४१२ मध्ये माहूरवर आक्रमण केले पण त्याला किल्ला जिंकता आला नाही. चौफेर घणदाट जंगलाने वेढलेल्या उंच डोंगरावरील किल्ल्याचे बेलाग स्थान पाहून फिरोजशहाने जास्त लगट न करता खंडणीवर समाधान मानले. यावेळी बहामनी सुभेदार सलाबतखान याच्या अंमलाखाली वऱ्हाड होता. यानंतर फिरोजशहाने आपला भाऊ अहमदशहा याला वहाडच्या सुभेदारीवर नेमले. त्याने किल्ला जिंकण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र सफल झाले नाहीत. सन १४२२ मध्ये बहामनी सुलतान फिरोजशहा पदच्युत होऊन त्याचा भाऊ अहमदशहा गादिवर आला. त्याने आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदरला हलवली. अहमदशहा क्रूर होता. त्याने सन १४२६ मध्ये चांदा राज्या विरुद्ध मोहिम काढली. माहूरकडे कूच करत त्याने अनेकांच्या कत्तली केल्या, मुलूख उद्ध्वस्त केला. माहूरच्या किल्ल्यावर हल्ला केला परंतू तो त्याला जिंकता आला नाही.
पुढिल वर्षी सन १४२७ मध्ये अहमदशहाने मोठ्या सैन्यानिशी माहूरच्या किल्ल्यावर आक्रमण केले. वेढाही कठोरतेने चालवला. पण रामसिंहाच्या शूर सैनिकांनी वेढा मोडून काढला. अखेर पावसाळा सुरु झाल्याने अहमदशहाला परत फिरावे लागले.
सलग तिसऱ्या वर्षी सन १४२८ मध्ये अहमदशहाने माहूर किल्ल्यावर पून्हा आक्रमण केले. सतत सुलतानाच्या अमानुषतेने कंटाळलेल्या आजूबाजूच्या लोकांनी किल्ल्यावर आश्रय घेतला होता. किल्ला अधिक दिवस लढवणे शक्य नसल्याचे पाहून किल्लेदाराने अहमदशहाला शरणागती दिली. किल्ला व खंडणीच्या मोबदल्यात किल्ल्यावरील लोकांच्या जीवाची हमी सुलतानाकडून मान्य करुन तो त्याचे स्वाधिन केला. मात्र किल्ला ताब्यात येताच अहमदशहाच्या खुनशी स्वभावाने तेथील लोकांच्या अमानुष कत्तली सुरु केल्या. हे पाहून किल्लेदार व सैनिकांनी लढण्याचा निर्धार केला. पण ती केवळ एक ठीणगी ठरली. मात्र त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून स्थानिक लोक ‘जय ठाकरी’ म्हणून दिवस पाळतात. या लढाईत अहमदशहाने अनेक लोकांना मारले. अनेकांना मुसलमान बनवीले. आणि किल्ल्याचे नाव ‘अहमदाबाद’ असे ठेवण्यात आले.
त्याने बहामनी राज्याच्या इतर सुभ्यांपैकी वऱ्हाडच्या सुभ्यावर आपला पुत्र महमूदखान याची नियुक्ती केली. वऱ्हाडचे दक्षिण ठाणे माहूर किल्ल्याला करण्यात आले. उत्तरेत जाताना त्याने एलिचपूर आणि कळंब ताब्यात घेतले. अहमदशहाने उत्तर ठाणे म्हणून गाविलगडची निवड केली. (संदर्भ:चांदा का गोंड राज्य)
माहूरचे रूपांतरण:
मुस्लीमशासन कालात सवर्च हुद्दे व पदव्यांमध्ये बदल झाले. जसे पूर्वी काही जिल्ह्यांच्या कमिशनरी एवढ्या भागास राष्ट्र संबोधले जाई व त्यावरील अधिकाऱ्यास राष्ट्रिक. पण मुसलमानी अंमलात त्यास सुभा व त्यावरील अधिकाऱ्यास सुभेदार म्हणटले जाऊ लागले. तसेच यादवांच्या कालातील महापूर याचे माहूर आणि बहामनी अमलात माहौर व शेवटी माहूर असे रुपांतरण झाले. काही धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख मातापूर असाही येतो.
माहूर वऱ्हाडच्या इमादशाहीच्या वर्चस्वाखाली:
बहामनी राज्य कमजोर झाले त्यावेळी महमूद गवान या मुत्सद्दी वजीराने सुभेदारांच्या वाढत्या शक्तीला काटशह देण्यासाठी बहादमनी राज्यातील चार सुभ्यांचे आठ सुभे केले. त्यावेळी वऱ्हाड सुभ्याचे दोन भाग झाले. उत्तर वऱ्हाडचे मुख्यालय गाविलगड तर दक्षिण वऱ्हाडचे मुख्यालय माहूर असे करण्यात आले. उत्तर वऱ्हाडचा सुभेदार म्हणून फत्तेउल्ला इमादशहा तर दक्षिण वऱ्हाडच्या सुभेदारीवर खुदावंतखान या हबशी सरदाराला नियुक्त करण्यात आले. यानंतर लवकरच बहामनी सल्तनतीचे तुकडे पडले. सन १४९० मध्ये विजापूर येथे युसूफ अदिलशहा (अदिलशाही), अहमदनगर येथे मलिक अहमद (निजामशाही), गाविलगड - एलिचपूर येथे फत्तेउल्ला इमादुल्मुल्क (इमादशाही), बीदर येथे कासीम बरीद(बरीदशाही), गोवळकोंडा येथे सुल्तान कुली कुतुबशहा (कुतुबशाही) आणि वऱ्हाडचा पोट सुभा अर्थात दक्षिण वऱ्हाड माहूर येथे खुदावतंखान यांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली.
बिदरच्या अमीर बरीदने माहूरवर स्वारी करुन किल्ला ताब्यात घेतला व खुदावंतखानाला ठार केले. मात्र लवकरच एलिचपूराहून इमादशहाने त्यावर आक्रमण करुन बरीदला पळवून लावले व माहूरचे राज्य आपल्या राज्यास जोडले.
माहूर निजामशाहीतून मोगलशाहीत:
वऱ्हाडात इमादशाहीने अहमदनगरशी काही काळ लढा दिला पण सन १५७२ मध्ये निजामाने इमादशाहीचा अंत केला व संपूर्ण वऱ्हाड निजामाच्या ताब्यात गेला. यावेळी माहूरवर निजामाची सत्ता होती. यानंतर लवकरच उत्तरेतून मोगलांचा प्रवेश झाला आणि वऱ्हाडातील बाळापूर व एलिचपूर ताब्यात घेऊन त्यांनी अहमदनगरच्या चांदबिबीशी युद्ध सुरु केले. मोगल बादशहा अकबराने चांदबिबीकडून वऱ्हाडप्रांत घेतल्यावर तो आपल्या साम्राज्याला जोडला. याविषयी अकबराचा चिटणीस अबुल फजल आपल्या “ऐने-अकबरी” या ग्रंथात लिहतो. वऱ्हाडच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी मोगलांनी वऱ्हाडच्या सुभ्यात तेरा सरकार निर्माण केले. (मोगलकालीन जिल्हा) त्यापैकी माहूर या सरकारात एकोणवीस महाल (तालूके) असत.
माहूरचे राजे उदाराम देशमुख:
वऱ्हाडच्या इतिहासात ज्या घराण्याचे नाव आपल्या कर्तुत्वाने पुढे आले त्यात वाशीमच्या उदाराम यांच्या घराण्याचे नाव येते. या घराण्याचे मुळ पुरुष उद्धवराव. त्यांच्या वडिलांचे नाव रामजीपंत. उद्धवराव हे ऋग्वेदी ब्राह्मण. ते मुळचे वाशीमचे राहणारे. त्यांची कुळकर्णीपणाची दोनतीन वतनाची गावं वाशीमच्या जवळ सावरगांव, चिवरे वगैरे असत. उद्धवराव ज्यांचा तत्कालिन कागदपत्रात उदाराम असाच उल्लेख येतो ते तत्कालिन संस्कृत, फारसी आणि अरबी आदि भाषांचे जाणकार होते.
अनंत कृत 'भक्तरहस्य' नावाच्या हस्तलिखित ग्रंथात उदाराम यांच्या गरीबीचे व भाग्योदयाचे वर्णन आले आहे की, तो इतका गरीब होता की पाटलाचे घरचे ताक देखिल मागून आणित असे. आपल्या परिस्थितीचा वैताग येऊन तो शिरपूर येथे पद्माजी नावाच्या सत्पुरुषास शरण गेला. काही दिवस राहिल्यावर पद्माजीने त्यास उपदेश केला की, 'काही दिवस शहरास जाऊन रोजगार कर म्हणजे तुझा भाग्योदय होईल.' (त्या वेळी औरंगाबादेस ‘शहर’ असे संबोदले जाई)
उदाराम औरंगाबादेस जाऊन एका अमीराचे दिवाणाचे घरी नोकर राहीले. काही दिवसांनी त्या दिवाणासोबत त्याबद्दल अमीराने बादशहास ते दिल्लीस गेले. तेथे बादशहाने अमीरास सांगितलेली काही कामगिरी त्यानीच केली, त्याबद्दल अमीराने बादशहास सांगितले. त्यावरुन बादशहाने उदारामास समोर बोलावून उत्तेजन दिले. आणि त्यांस बढती देऊन वाढवीत माहूर पासून वाशीम पर्यंतची बावन्न चावड्यांची देशमुखी, पंचहजारांची मनसब, नौबत, निशाण वगैरेची सनद देऊन दक्षिणेत पाठविले. (हिजरी सन १००२, सन१५९२) लष्करी कामातही उदाराम यांनी चांगली कामगिरी केली. मोगलकालातील माहूर व वाशीम या दोन्ही सरकारातील (जिल्ह्यातील) देशमुखी वतन व जहागीरी मिळवल्या. त्यांची मुख्य कामगिरी जहांगिरच्या काळात दिसून येते. फारशी ग्रंथकारांच्या आधारावरून असे दिसते की, लखूजी जाधवरावांप्रमाणेच हे प्रथम निजामशाहीत मलिकअंबरचे नोकरीत असताना प्रसिद्धीस आले. सन १६१७ मध्ये राजपुत्र खूर्रम (शहाजहान) याने जी लढाई चालविली त्यांत ते मलिकअंबरचा पक्ष सोडून मोगल पक्षास मिळाले. (BENIPRASAD JAHANGIR Pg.284)
शहाजहानने उदाराम यांस बादशहा जहांगीरच्या भेटीसाठी नेले. इतर यशस्वी सरदारांबरोबर उदारामासही जाहांगीरने गौरवून मनसब, शंभर तोळे सोन्याचे पदक, एक हत्ती, एक घोडा इनाम दिला.
शहाजहानचे बंड आणि माहूर किल्ल्यावर आश्रय:
शहाजहान याने पुढे जहांगिरबादशहाविरुद्ध बंड केले. त्या युद्धात लखूजीराजे जाधव व उदाराम हे दोघेही शहाजहानच्या पक्षात होते. परवीज व महाबतखान यांनी शहाजहानाचा पाठलाग केला असता सर्व मुसलमान सरदार शहाजहानचा पक्ष सोडून बादशाही पक्षास मिळाले मात्र लखूजीराजे जाधव व राजे उदाराम हे शेवटपर्यंत शहाजहान सोबत राहीले. त्यांनी शहाजहान यास आपल्या मुलूखात आश्रय देऊन सर्व मदत केली.
माहूरचा किल्ला उदाराम यांचे ताब्यात असून ते तेथेच राहत असत. त्यांनी शहाजाहान यास माहूरास नेले. शहाजहान याने आपले जडजवाहीर, हत्ती, घोडे वगैरे सामान तेथे ठेवले व आपण आपली बायको मुमताज महाल व पुत्र दाराशुको, सुजा व औरंगजेब यांसह तो तेथे एक महिना राहून नंतर तेलंगणांतून बंगाल्याकडे कूच करून गेला. (जहांगीरनामा पृ८०२)
यामुळे लखूजीराजे जाधव व राजे उदाराम यांजवर बादशहाची गैरमर्जी झाली व पुढे शहाजहानचे बंड मोडल्यावर लखूजीराजे व उदारामराजे यांना अनुक्रमे आपला पुत्र व बंधू यांस ओलीस ठेऊन पुढे नोकरी करावी लागली.अर्थात राजे उदाराम यांचा पुत्र जगजीवन हा मोगलांकडे ओलिस होता. दक्षिणेत राजे उदाराम हे मोगलांतर्फे महत्त्वाचे सरदार समजले जात. मोठमोठ्या महत्त्वाच्या कामगिरीवर त्यांची रवानगी केली जाई. शहाजहानच्या कारकीर्दीत मलिक अंबर विरुद्ध मोगलांची लढाई चालली तेव्हा मोगालांतर्फे लखूजीराजे जाधव व राजे उदाराम हे लढले होते. सन १६२४ मध्ये भातवडीच्या जवळ मलिकअंबराने मोगल लष्करावर रात्री छापा मारला. त्यांत लखोजीराजे व राजे उदाराम यांचे असावध असल्याने नुकसान झाले व त्यांना घोड्यावर स्वार होऊन कसेतरी पळावे लागले.
उदाराम राजे यांच्यापूर्वी मोगलांचा हरचंदराय नावाचा एक रजपूत सरदार माहूर प्रांतावर होता. पण त्याचे कारकीर्दीत मुलूख 'ओसाड झाल्याने व तो बंडखोर निघाल्यामुळे त्यास कामावरून काढण्यात आले. त्या वेळच्या एका सनदेत उल्लेख आला आहे की, 'घरांची आबादानी व शेतीची लागवण यांची दिवसेंदिवस वाढ करीत असावी.' यावरुन या मुलूखाची स्थिती लक्षात येते.
हरचंदराय या मुलूखाचा ताबा सोडीना शेवटी उदाराम यास लढून त्याचा मोड करावा लागला. राजे उदारामाने आपल्या पराक्रमाणे चाळीस वर्षे कारभार करुन ते हिजरी सन १०४० (सन१६३२) मध्ये मरण पावले. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे पुत्र जगजीवनराव जहागीरीवर आले. सन १६३७ मध्ये शहाजहान बादशहाने उदारामाची सर्व वतन, मनसब, जहागीर वगैरेची सनद देऊन खिल्लत (वस्त्रे) व घोडा विठोजी वकील याचेबरोबर जगजीवनरावास पाठविला.
सन १६३७ च्या सनदेत मुळ पुरुष 'उदाजीराव' हे नाव सर्व वंशजांनी लावावे असा अधिकार या घराण्यास मूळ पुरुषाच्या सन्मानार्थ दिला. तेव्हापासून या घराण्यातील सर्व पुरुष आपल्या नावापुढे राजे राजे उदाराम असे पद लावू लागले व लेखी सहीसुद्धा तशीच करु लागले. पुढे मराठा आमदणीत बाळाजी बाजीराव पेशवा यांचा कमाविसदार कृष्णाजी अनंत याने शंकररावांनी केलेली उदाजीराव ही सही अमान्य केली. मृत पुरुषाच्या नावाने केलेली सही अमान्य केली. तेव्हा शंकररावांनी आपला वकील पुण्यास पाठवून त्यासोबत आपल्या घराण्याची अस्सल सनद पाठविली. पेशव्यांनी ती सनद पाहून गोष्ट मान्य केली. त्यांनी त्याच सनदेत लिहून दिले की, उदाजीराम या नावाने केलेली सही मान्य करावी.
असो, जगजीवनराव हा फारच कर्तबगार निघाला. आपल्या कर्तुत्वाने त्यास सन १६४९ व १६५२ मध्ये दोन सनदा आणखी मिळून त्यास दोन कोटी सत्तर लक्ष दामाचे उत्पन्ना मिळू लागले. माहूर वगैरे २३ महालांची दिवाणी फौजदारी सर्व अधिकार त्यास मिळाले. राजपुत्र औरंगजेब दक्षिणेत आला तेव्हा मुद्दाम जगजीवनरावास बुऱ्हाणपुरच्या छावणीवर बोलावून त्याचा बहुमान केला. जगजीवनरा याने औरंगाबादेस जगजीवनपुरा वसविला तो अद्याप कायम आहे. त्यास उदाराम पेठ असेही म्हणतात. या पुऱ्याचे बाबतीत औरंगजेबाचा शहाजादा मुअज्जम (शहाआलम) याने सनद दिली. सन १६५८ चे सुमारास शहाजाहानच्या मुलांमध्ये वारसाहक्काचे युद्ध पेटले. त्यात आग्र्याजवळ सामूगढ येथे औरंगजेब व दारा शिकोह यांच्यात झालेल्या लढाईत जगजीवनराव मारले गेले. या युद्धात औरंगजेबाचा जय झाला. पुढे सिंहासन प्राप्त झाल्यावर त्याने जगजीवनरावाच्या पत्नी सावित्रीबाई उपाख्य रायबागीण यांना एक दु:खवट्याचे पत्र पाठविले.
जगजीवनराव माहूरच्या किल्ल्यावर राहत असे त्यामुळे या घराण्याला माहुरचे देशमुख असे म्हणटले जाई. तो किल्ला जगजीवनरावाने दुरुस्त करुन उत्तरेकडे चिनी दरवाजा नावाचा रंगीत दरवाजा बांधला. तो दौलताबादेच्या किल्ल्यावरील चिनी महालाप्रमाणे त्यास घोटीव रंग दिला होता.
लढवय्या रायबागीण:
बाबूराव हा जगजीवनरावाचा मुलगा, बापाच्या मृत्युनंतर त्यासही त्याच्या बापाचे सर्व अधिकार प्राप्त झाले. मात्र तो अज्ञान असल्याने लष्कराची मनसबदारी, बावन्न परगण्यांची देशमुखी, जहागीरी आदिंची व्यवस्था त्याची माता राणी सावित्रीबाई पाहू लागली. तीने सन १६५८ मध्ये दिलेले एक दानपत्र वाशीमच्या काळू यांच्या कागदपत्रात मिळाले आहे. पत्र मोडी लिपित असून सन १९५० मध्ये ते उघडकीस आले. त्या पत्रामुळेच रायबागीण यांचे नाव सावित्रीबाई असल्याचे प्रथमच समजले.
बाबूराव लहान असल्याचे पाहून रजपूतांनी उचल खाल्ली. जगजीवनरावाची बायको गोषांतील स्त्री असूनही शूर होती. तीने आपले लोकांस बहिणीची लाज राखा असे अवाहन करुन त्याची खूण म्हणून निशाणास चोळी लावून लष्कर उभे केले व रजपूतांवर चाल केली आणि त्यांचा पूर्ण बिमोड करुन त्यांना कायमचे हाकून लावले. या पराक्रमाची खबर दिल्लीस गेल्यावर औरंगजेब बादशहास या बाईचे फार कौतुक वाटले. त्याने तिला पंडिता व रायबागण असे दोन किताब दिले. रायबागण याचा अर्थ स्त्रीशार्दुल असा होतो. (वऱ्हाडचा इतिहास या. मा. काळे पृ.३४६) परमानंदकृत संस्कृत काव्यग्रंथ शिवभारत (२९वा अध्याय) व तंजावरच्या शिलालेखात या स्त्रीला “राजव्याघ्री” असे संबोदले आहे. या किताबाची सनद ही हिजरी सन १०६९ अर्थात सन १६५८ ची आहे.
शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळेस या रायबागीणीस औरंगजेब बादशहाने शिवाजीमहाराजांवर पाठवीले होते. बरेच दिवस ती त्यांच्या सैन्याशी लढत होती. पुढे शाहिस्तेखानाच्या कोकणकडे कूच करणाऱ्या सरदारांत रायबागीण, कारतलबखान, अमरसिंग वगैरे सरदार उमरखिंडीतून जाताना महाराजांच्या सैन्याने अडविले. रायबागीन महाराजांना शरण आली व तिने सर्व मोगल सैन्याचा नाश टाळला. रायबागीणीच्या शौर्याचा महाराजांनी गौरव केला. रायबागण हिनेही स्वतःस शिवाजीमहाराजांची धर्मकन्या म्हणवून घेतले. अशा प्रकारचे वर्णन शिवकालिन सर्व साधनांमध्ये थोड्याफार फरकाने वाचायला मिळते.
माहूरच्या राजघराण्याचा अस्त:
असो, बाबूराव लहान असतानाच औरंगजेब बादशहाने त्याची बुऱ्हाणपुर येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यास ‘शाहनामा’ या ग्रंथाची सचित्र प्रत भेट दिली होती. ती प्रत राजे गोपाळराव यांच्या संग्रही होती. बाबूराव सन १७०२ च्या सुमारास मृत्यु पावला. त्याचा पुत्र व्यंकटराव हा कारभार करू लागला. तोही कर्तुत्ववान होता पण मोगलशाही संपुष्टात येऊन शाहूमहाराजांचे मराठा साम्राज्य उदयाला आले होते. त्याचा परिणाम या घराण्यावरही पडला. या घराण्याचेही महत्व कमी होत गेले आणि केवळ आपली संपत्ती जतन करणे हेच कार्य राहिले. परसोजी व कान्होजी नंतर रघोजी भोसलेंनी वऱ्हाडात आपली सत्ता वाढवली. नागपूर, गाविलगड, नरनाळा आणि माहूर हे किल्ले रघोजींच्या अंमलाखाली आले. निजामाची सत्ता कमजोर पडली.
असो,व्यंकटरावानंतर त्यांचा पुत्र शंकरराव याने जहागिरीचा कारभार पाहिला. त्यानंतर त्यांचे पुत्र उद्धवराव हे मालक बनले. उद्धवरावांना सहा पुत्र होते. सन १८०७ चे सुमारास सहा पुत्रांमध्ये वाटण्या होऊन त्यांचे वंशज विविध ठीकाणी विखुरले गेले ते असे-
जगजीवनराम - वाशीम व मालेगाव (एक शाखा शिरपूर येथेही राहत असे)
खंडेराव - कळमनुरी
त्रिंबकराव - पुसद (भोजले व गूंज )
जगदीशराव - वारा व अनसिंग (वाशीम जि.)
रघुनाथराव - उमरखेड
नारायणराव - माहूर
या सर्वांमध्ये परगणे, पाटिलक्या व जहागीरी वाटल्या गेल्या. वडिल शाखेचे प्रतिनिधी गोपाळराव हे मालेगाव येथे राहत होते. माहूर येथे स्थायिक झालेल्या नारायणरावांच्या घराण्यात त्यांनी त्यांच्या ऐतिहासीक वस्तुंचा बराच संग्रह केला होता. असा मध्ययुगात प्रसिद्धीस आलेल्या वाशीम जिल्ह्यातील या घराण्याचा इतिहास.
असो,
काही काल नागपूरकर भोसल्यांच्या अंमलाखाली माहूरचा रामगड राहीला. मात्र तीसऱ्या ॲंग्लो-मराठा युद्धात भोसल्यांचा पराभव झाल्यावर इंग्रजांनी वऱ्हाडचा सुभा निजामास दिला. पश्चात निजामाला कर्जापायी तो सुभा इंग्रजांना द्यावा लागला. आणि पेनगंगा नदी सरहद्द मानून वाटणी झाली तेव्हा माहूर व किल्ला हा भाग निजामाकडे गेला. इतिहासकालापासून दक्षिण वऱ्हाडचे मुख्यालय असलेले हे माहूर निजामापासून तर आजपर्यंत मराठवाड्यातच गणले गेले. असा हा माहुर चा राजकीय प्रवास.!
...
माहूरचा किल्ले रामगड-
माहूरचा रामगड हा सातपुड्यातील बालाघाट डोंगरात समुद्र सपाटीपासून अंदाजे २६५० फुट उंचीवर स्थित आहे. हा किल्ला नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आहे. माहूर शहरापासून तीन किमी. अंतरावर असलेल्या डोंगरावर हा प्रचंड किल्ला दिसतो. किल्ल्याच्या समोरील डोंगरावर साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल रेणूका मातेच मंदिर आहे. उजवीकडे दत्तशिखरावर दत्त मंदिर आणि शेजरील अनुसया शिखरावर अनुसया माता मंदिर आहे.
मातेच्या मंदिराला जाण्यासाठी माहूर गावातून चांगला डांबरी रस्ता आहे. त्यामुळे किल्ल्याला जाणे सोपे झाले आहे. कारण किल्ला अगदी रेणूका देवीच्या मंदिराच्या समोरील डोंगरावर आहे.
रामगड हा किल्ला साधारणपणे १२० एकरात पसरलेला असून याचा घेर १० किमी एवढा भरतो. मुख्य अर्थात सर्वात आतील तटबंदीची लांबी २.१६ किमी. एवढी भरते. या तटबंदीच्या आतील जागा ४५ एकर एवढी भरते. या किल्ल्याला तिहेरी तटबंदी असून रक्षणासाठी पंचेचाळीस बुरूज आहेत. आज मात्र बरेच बुरुज आणि तटबंदी निखलेली आहे. बाह्य तटबंदीस डुक्कर किल्ला म्हणातात कारण या क्षेत्रात अतिशय दाट झाडी असल्याने रान डुकरांचा बरीच संख्या आहे. तटबंदीची व बुरुजांची उंची वेगवेगळी आहे. तसेच बुरुजांचे आकारही वेगवेगळे आहेत. गड पाहण्यासाठी किमान चार तास लागतात. गडावर पाण्याची सोय नसल्याने पाणी सोबत न्यावे.
रेणुकामाता मंदिर आणि किल्ला यांच्यामध्ये एक निमुळती खिंड आहे. या खिंडीच्या रक्षणासाठी किल्ल्याचा प्रचंड असा महाकाली बुरुज खडा आहे. किल्ल्यावर येथूनही जाता येते. मात्र वाट दुर्गम आहे. याशिवाय खिंडीच्या डांबरी रस्त्याने अर्धा किमी. पुढे गेल्यास वाटेतच डाव्या बाजूस एक कमान लागते. येथून जाणाऱ्या पायऱ्या महानुभाव पंथाच पवित्र असलेल्या इंजाळा तलावाकडे जातात. ही वाट नवीनच तयार करण्यात आली आहे. पण किल्ल्यावर जाण्यासाठी ही वाट सोईची आहे. किल्ल्याची तटबंदी फोडून ही वाट बनवलेली आहे. पंधरा मिनीटे चढून गेल्यावर इंजाळा तलाव लागतो. हा तलाव किल्ल्यातील वास्तूंप्रमाणे प्राचीन आहे. विस्तीर्ण अशा या तलावाला दगडी पायऱ्यांची बांधणी केलेली आहे. ती पूर्वापार असून शाबूत आहे. या तलावत पूर्वी परिसाचा दगड होता आणि ओढणाऱ्या हत्तीच्या पायातील साखळदंड सोन्याचा झाला अशी दंतकथा सांगितली जाते. तसेच तलावाच्या काठाशी असलेला खडक हा दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र झाल्याचे लोक बोलतात. म्हणून अनेक महानुभावपंथीय या खडकाचे तुकडे नेतात. इंजाळा तलावापासून उजवीकडे चढून गेल्यास चिनी महाल व हत्ती दरवाजा लागतो. आपण गडाच्या आतून प्रवेश केल्याने आपणास प्रथम हत्ती दरवाज्याच्या आतील देवड्या लागतात. ज्यांना चिनी महाल म्हणतात.
प्रस्तुत इमारत प्रचंड मोठी आहे. पूर्वी सुंदर अशा पर्शीयन दगडी टाईल्सने ती सजवलेली होती. त्यावर घोटीव रंगाने नक्षि काढलेली होती. पण पुरातत्व खात्याच्या दुरुस्तीत ती चुन्याने लेपून टाकलेली आहे.
चिनी महालातून बाहेर गेल्यास इशान्याभिमुख बुलंद हत्ती दरवाजा लागतो. हा या किल्ल्याचा प्रमुख दरवाजा. या दरवाज्याला दोन अतिप्रचंड अशा गोल परंतून निमुळते होत जाणाऱ्या बुरुजांचा आधार आहे. या बुरुजांवर पूर्वी गजलक्ष्मीचे शिल्प होते. ते आज नष्ट झाले आहे. यामुळेच या दरवाजाला हत्ती दरवाजा म्हणतात. या दरवाज्यातून गडाखाली जाण्याचा पूर्वीचा प्रमुख मार्ग होता. सरळ हत्ती दरवाजावर आक्रमण होऊ नये म्हणून या दरवाज्यासमोर एक प्रचंड भिंत आहे या भिंतीला जिभी म्हणतात. येथून रस्ता डावीकडे काटकोनात वळतो व तेथे एक पश्चिमाभिमूख दरवाजा आहे. तो ११फुट उंच व ८ फुट रुंद आहे. दरवाज्याच्या उजव्या बाजूस देवड्या आहेत. पुढे अग्नेयाभिमुख दरवाजा आहे. हे दोन्ही दरवाजे जिभि मध्ये आहेत. यानंतर बाह्य तटबंदीमधिल पूर्वाभिमुख दरवाजा लागतो. त्यालाही जिभि आहे. या सर्व दरवाज्यातून रस्त्याने पुढे जाताना डाव्या बाजूची मुख्य तटबंदी नजरेस भरते. त्यावर असलेले भक्कम बुरुज नजरेस भरतात. तसेच उजव्या बाजूची दुय्यम तटबंदीही दिसते. ही जुनी वाट गडाला वळसा घालत खाली शहराकडे असलेल्या डांबरी रस्त्याकडे जाते. मात्र दाट झाडीने हा रस्ता झाकलेला असल्याने जाणे शक्य नाही.
असो, गडावरील इतर इमारती पाहण्यासाठी हत्ती दरवाज्याकडे परत फिरावे. हत्ती दरवाजाची उंची १३ फूट आणि रुंदी ८ फुट आहे. दरवाजावर चून्यामध्ये पर्शीयन टाईल्सचे तुकडे लावलेले होते. त्याचा काही भाग शिल्लक आहे. द्वराच्या कमानीवर दोन्ही बाजूस चुन्याची शरभशिल्प कोरलेली होती. ती नष्ट होऊन थोडाच भाग शिल्लक उरला आहे. दरवाजावर चिनी मातीची रंगीत अशी नक्षी केलेली होती. त्याचे काही अवशेष दिसतात. कमानदार दरवाज्याच्या वर सुंदर कोरीव नक्षीचे सहा गवाक्ष (३/२फुट) आहेत. तसे या दरवाज्याच्या गच्चीवर जाण्यासाठी शेजारील इमारतीजवळून पायऱ्यांचा रस्ता आहे. एका कमानदार द्वारातून आत गेल्यास महाल लागतो. एका बाजूस हत्तीदरवाज्यावरील सहा गवाक्ष आहेत तर दुसऱ्या बाजूस कारंजाचा हौद. झरोक्यातून येणाऱ्या हवेमुळे या महालास हवा महल म्हणत. पूर्वी येथे नाचगाण्याची महफील भरत असे. या गच्चीवरूनच हत्ती दरवाजाला आधार देणाऱ्या महाकाय बुरुजांवर जाता येते. येथून माहूर शहर व किल्ल्याची दूरच दूर धावणाऱ्या तटबंदीचे दृष्य मोहक दिसते. असो, हत्ती दरवाज्याची गच्ची उतरुन शेजारीच तीन दगडी कमान असलेली अनेक खांबांची एक इमारत बघावी. कुणी तीला चिनी महाल तर कुणी घोड्यांची पागा म्हणतात. मात्र दरवाज्याला लागून असल्याने गडावर येणाऱ्या डाक ची ती प्रशासकीय इमारत असावी. येथून डावीकेडे महाकाली बुरुजाकडे जाता येते तर उजवीकडे किल्ल्याचा मुख्य राजवाड्याकडे (राणीमहाल) व कोठाराकडे जाता येते.
हत्ती दरवाजा हा या गड भ्रमंतीचा केंद्र बिंदू आहे. सुरुवातीस उजवीकडे प्रथम जाणे सोईचे ठरेल. त्यासाठी हवामहालातूनच सरळ रस्ता आहे. थोडे चालून गेल्यावर एक पाण्याचा हौद व नंतर प्रचंड मोठी दगडी बांधणीची इमारत नजरेस भरते. एका कमानदार दरवाजातून प्रवेश केल्यावर एक विस्तीर्ण इमारत लागते. ही राजवाड्याची इमारत असावी. याला राणीमहालही म्हणतात. इतिहासप्रसिद्ध रायबागण येथेच राहत असलयाने याला राणीमहाल संबोधले जात असावे. या इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला लागूनच एका दुसऱ्या कमानदार दरवाज्यातून प्रवेश केल्यास अतिविस्तीर्ण अशा महालसदृष्य इमारतीत प्रवेश होतो. या इमारतीचे छत संपूर्ण दगडाचे असून त्याला अनेक ठीकाणी चौकोनी छिद्रे दिली आहेत. तसेच भिंतीलाही अनेक झरोके दिलेले आहेत. ही या इमारतीत एकूण विस दगडी खांब आहेत. हे खांब एकमेकांना कमानीच्या रुपात मिळालेले आहेत. त्यामुळे छताचे पाच कमानदार कप्पे निर्माण झाले आहेत. ही अनोखी बनावट पाहिल्यावर किल्ल्यावरील चढणीचा थकवा पार निघून जातो. या इमारतीस कुणी राणी महाल म्हणटले असले तरी काहीशी कोठाराप्रमाणे वाटणारी ही इमारत भक्कम आहे. या इमारतीच्या छतावर जाण्यासाठी बगलेतून चढून जाव लागत. छतावर पाणी साचू नये म्हणून दगडी बांधणीच्या नाल्या काढलेल्या आहेत.
छतावरून खाली आल्यावर पूर्वेला दल बुरुज लागतो. उजवीकडे समोरील तटबंदीवर चढण्याठी पायऱ्या आहेत. या तटबंदीने चालत जातांना तीची भक्कमता लक्षात येते. मधिल जंग्यांमधून डोकावून पाहिल्यावर अजस्रकाय बुरुज आणि खोलच खोल जाणाऱ्या दऱ्या दिसतात. पंधरा मिनीटे या तटबंदीवरुन चालत शेवटी एक वळणावर एक भलामोठा बुरुज लागतो. तटबंदीच्या आत खाली उतरण्यासाठी अनेक ठीकाणी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरुन आता तटाच्या आतून चालावे. या पायऱ्यांवरुन उतरल्यावर तटाला लागून काही सैनिकांची निवास स्थाने दिसतात. या तटबंदीला मधूनच एक कमानदार चोर दार आहे. कदाचित या मुख्य तटबंदीतून खालील तटाकडे तात्काळ जाण्यासाठी ही चोर वाट असावी. दुसऱ्या बाजूच्या तटाचा काही भाग पडला आहे. जवळच एक बांगडी तोफ आहे. असो, हा परिसर फिरून परत आल्यावाटेने परत राजवाडा व कोठाराकडे जावे आणि तेथून आल्या वाटेने परत चिनी महालाकडे जाव. येथून सरळ चालत गेल्यास महाकाली बुरुजाकडे जाता येत. अर्थात चिनी महाल व त्याचा हत्ती दरवाजा हे या भ्रमंतीच केंद्र आहे. कारण येथून इंजाळा तलाव, उजवीकडे राजवाडा व कोठार आणि डावीकडे आपण महाकालि बुरुजाकडे जाऊ शकतो.
महाकालि बुरुजाकडे जाण्यासाठी हत्ती दरवाज्याच्या देवड्यांजवळील दगडी कमानदार इमारतीच्या(घोडेपागा) लागून असलेल्या तटबंदीवरुन चालत गेल्यास काही अंतरावर एक यादवकालिन इमारत लागते. तिन घुमट असलेल्या या इमारतीला नक्षिदार दगडी खांब आहेत. या खांबांवरील नक्षि पाहिल्यावर या किल्ल्यावर यादव किंवा त्यापूवी चालुक्यांची सत्ता होती हे सिद्ध होते. या इमारतीच्या मागे गडाची तटबंदी आहे. हा किल्ल्याचा उत्तर बुरुज आहे. तटावरुन पैनगंगा नदी दक्षिणेकडून वाहत माहूर शहराला वळसा घेत पूर्वेकडे वाहतांना दिसते. तसेच येथून माहूर शहर व डोंगराच्या पायथ्याशी असलेले विस्तीर्ण तलाव दिसतात. या तटबंदीच्या कडेने चालत पुढे गेल्यावर महाकाय असा महाकालि बुरुज लागतो. ही किल्ल्याचा दक्षिण बुरूज. या बुरुजाच्या तटबंदीच्या आतील बाजूस दोन्हीकडून तत्कालिन प्रशासकीय कमानदार दगडी बांधणीच्या खोल्या आहेत. डावीकडील खोल्यांमध्ये कालीमातेचे मंदिर आहे. बाजूने बुरुजावर चढून गेल्यावर तोफेच्या ठेवणीची गोलाकार जागा दिसते. या बुरुजाच्या अगदी समोरच पायथ्याशी डांबरी रस्ता आहे आणि समारच्या डोंगरावर रेणुका मातेचे मंदिर आहे. येथूनही कच्च्या वाटेने खाली उतरुन रस्त्यावर जाता येते. पण ही वाट अवघड आहे. बुरुजावरून आतील बाजूस असलेल्या काली मातेच्या मंदिरासमोर एक तीन फूट व्यासाचा दगडी रांजन आहे. आता येथून आल्या वाटेने न जाता विरुद्ध दिशेने असलेलया तटबंदीने चालत गेल्यास एक पायवाट लागते. ती पायवाट पुढे एका दरवाज्याकडे जाते. मात्र दरवाजा बघून बगलेल्या रस्त्याने गेल्यास आपण पुन्हा त्याच इंजाळा तलावाकडे पोचतो. येथे झाडीने व्यापलेला आणखी एक बुरुजबंद दरवाजा आहे. मात्र तोही उपयोगात नाही. अशाप्रकारे गडाची परिक्रमा पूर्ण करता येते. इंजाळा तलावापासून आपण पायऱ्याने खाली उतरून पूर्वीच्या सडकेवर पोचतो. याप्रमाणे आपण सोप्या रितीने गड पाहून रेणूका मातेचे व पुढे अनुसया माता आणि दत्त शिखरावरील दत्त मंदिराचे दर्शन घेऊ शकतो. मात्र गड पाहण्यासाठी चार तास लागतात. त्यामुळे तीन्ही मंदिराच्या दर्शनासाठी दुसरा स्वतंत्र दिवस निवडावा. राहण्यासाठी माहूर देवीच्या संस्थानचे भक्त निवास आहे. गावात लॉज आहेत. तसेच बुलढाणा अर्बन बँकेचे भक्त निवास आहे.
मातृतीर्थ तलाव:
किल्ल्याकडे जाणाऱ्या सडकेला लागूनव एक फाटा फुटतो. त्या रस्त्याने सरळ खाली गेल्यास एक किमी अंतरावर विस्तीर्ण असा मातृतीर्थ तलाव लागतो. या तलावाची लांबी-रुंदी साधारणपणे पाचशे फुट असावी. या तलावालाचे घाट उत्तम असून त्याला दगडी पायऱ्या व अनेक कक्ष आहेत. जवळच भगवान परशुरामाचे मंदिर आहे.
पुराण कथेनुसार राजा कार्तवीर्यार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या ताब्यात असलेली पवित्र गाय कामधेनु मागितली, मात्र ऋषीने देण्यास नकार दिला. राजाला गाय मिळवायचीच होती आणि म्हणून त्याने ऋषीवर हल्ला केला. जमदग्नीचा वध झाला आणि रेणुका मातेच्या हाताला २१ ठिकाणी दुखापत झाली. परशुरामला ही दुर्घटना कळली आणि त्याने २१ राजांचा वध करून प्रतिशोध पूर्ण केला. वडिलांच्या पवित्र पार्थिवावर माहूरच्या जंगलात अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. रेणुका माता आपल्या पतीच्या शरीरासह येथे सती झाल्या तेच हे मातृतिर्थ.
हत्तीखाना वस्तू संग्रहालय:
माहूर मध्ये प्राचीन वास्तुंचे एक संग्रहालय आहे. ते पोलिस स्टेशनला लागून आहे. त्या इमारतीस हत्तीखाना असे म्हणतात. त्यात माहूर प्रदेशात सापडलेल्या अनेक प्रकारच्या दगडी मूर्त्या, जाती व वीरगळ आहेत. तसेच अनेक नाण्यांचा संचय, मध्ययुगीन शस्त्रे, ताम्रपट यांचा संग्रह केला आहे.
पांडव लेणी:
माहूर शहराच्या बाहेर आय.टी.आय. च्या शैक्षणीक इमारतीस लागूनच असलेल्या डोंगरात पांडव लेणी आहेत. येथे विविध अशा पाच गुफां आहेत. एक प्रमुख लेणी स्वतंत्र असून तीच्या द्वारावर आठ फूट उंचीच्या देव मूर्ती आहेत. त्या काही प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. लेणीच्या खांबांवरही अतिशय सुबक मुर्ती कोरलेल्या आहेत. या लेणीच्या द्वारावर कोरीव द्वारशाखा आहेत. वर देवकोष्टकात देवीदेवता आहेत. आत एक शिवपिंड आहे. या लेणीस मंदिराप्रमाणे परिक्रमा करता येते. याशिवाय बाजूला काही लेण्या आहेत. मधिल लेणी मोठी आहे. तिच्यामध्ये प्रवेश केल्यावर आत पून्हा एक लेणी कोरलेली आहे. या लेणी आठव्या शतकातील राष्ट्रकुट कालातील आहेत. मात्र पूराणकालात येथे वनवासी पांडव राहून गेल्याने याला पांडव लेणी म्हणतात. आज मात्र हा ऐतिहासीक व सांस्कृतीक ठेवा दुर्लक्षित आहे. वाईट म्हणजे केवळ विरंगुळ्यासाठी येणारी मंडळी येथे आपली नावे लिहून जातात आणि या लेण्याचे सौंदर्य नष्ट करतात. आपल्या कलाकुसरीतून व्यक्त होणाऱ्या या इतिहास पुरुषांना मृत समजून त्यांचा छळ करणे अमानवी कृत्य नाही काय..?
असो, असा हा माहुरचा रामगड, तेथील देदीप्यमान राजघराणे आणि विविध वास्तूंच्या रूपाने इतिहास बोलू पाहणाऱ्या सर्वच इतिहास पुरुषांची जीवन कहाणी..! तर चला कधीतरी माहूरच्या कुशीत बसून अनुभवू किल्ले रामगडची जीवन कहानी.!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर मालेगाव जहागिर (जिल्हा - वाशीम) www.faktitihas.blogspot.in ९६५७५२५५२५
#mahur_fort
Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..
Popular Posts
कोंडाजी फर्जंद - बेखौफ छत्रपतीचा दिलफेक योद्धा...
- Get link
- X
- Other Apps
किल्ले बाळापूर-वर्हाडातील शंभूराजांची जहागीर
- Get link
- X
- Other Apps
एक सहज चिंतन- महाराज आणि शाहिस्तेखान
- Get link
- X
- Other Apps
अद्भूत साक्षात्कार- लोणार...
- Get link
- X
- Other Apps
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा...३७१ वर्षांपूर्वी चा तो दिव्य संकल्प
- Get link
- X
- Other Apps
जानेफळ: इतिहास पुरुषांच्या भेटीचा दुर्लभ योग..!
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन- हरिहरेश्वर एक नयनरम्य भेट..
- Get link
- X
- Other Apps
अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-
- Get link
- X
- Other Apps
गणपतीचा वाडा:शतकापूर्वीचा गणेशोत्सव- मैराळडोह
- Get link
- X
- Other Apps
राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ'
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट