Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

‘मल्लूखानाच्या कबरी आणि जेजुरीचा खंडेराया.?



सन १७०२ च्या जून महिन्यात बादशहाने विशाळगडचा किल्ला जिंकून घेतला होता.

मोगल छावणीतील अधिकारी आणि ‘तारीखे दिलकुशा’ या ग्रंथाचा लेखक भीमसेन सक्सेना या सुमारास जेजुरीच्या मुलूखातून जात होता. जेजुरीच्या खंडोबा विषयीचा अनुभव मांडताना तो आपल्या ग्रंथात म्हणतो-

मोगल फौजेची कूच चालू असता वाटेत खंडोबाची जेजुरी लागली. मी आतापर्यंत हे स्थळ पाहिले नव्हते. ते आता पाहण्यात आले. मोठे प्रेक्षणीय स्थान आहे. दक्षिणी लोक महादेवाला खंडेराय या नावाने संबोधतात. येथे एका उंच डोंगराला लागून एक लहान टेकडी आहे. अहमदनगरच्या निजामुल्मुल्काच्या (निजामशहा) काळात नारो राघव नावाचा एक अधिकारी होता. त्याच्या पूर्वजांनी हे देऊळ बांधले. नारो राघव हा शहाजहानच्या काळात असून तीन हजारी मन्सबदार होता. जेजुरी गाव हे पायथ्यापाशी आहे. तेथून वर देवळापर्यंत चारशे दगडी पायऱ्या आहेत. वर टेकडीवरील देवळाची बांधणी किल्ल्यासारखी आहे. प्रवेशद्वार मोठे आहे. आत शिरताच दगडी फरशी ओलांडल्यावर एक सभागृह लागते. त्यातच एक गर्भागार आहे. आत दोन कबरी (थडगी) दृष्टीस पडल्या. कबरीला लागून एक दगड होता. मी पुजाऱ्यांना विचारले की, हा दगड कशाचा आहे आणि या कबरी कशाच्या आणि कुणाच्या? त्यांनी सांगितले ते हे : ‘या डोंगराला खंडेरायाचा डोंगर म्हणतात. हा दगड म्हणजे खंडोबा होय. या समाध्या (कबरी) पण त्याचेच प्रतीक होय.' हे स्थळ म्हणजे दक्षिणच्या लोकांचे मोठे तीर्थस्थान आहे. वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा येथे मोठी जत्रा भरते. त्या वेळी खूप गर्दी होते. लोकांची खंडोबावर फार भक्ती आहे. शिवाजी(महाराज) हा फार मोठा भक्त होता. त्याने अनेक धार्मिक इमारती बांधल्या.

या सुमारास मुसलमानांचा जोर वाढला. त्यांच्या आक्रमणापासून देवळाचे रक्षण व्हावे म्हणून तेथील पुजारी आणि मराठे हे एक झाले. खंडोबाच्या विग्रहावर त्यांनी दोन कबरी (समाध्या) बांधल्या, आणि त्यांनी जाहीर केले की, या कबरी ‘मल्लूखानाच्या’ होत. डोंगरावर पाणी नाही. वर पाणी असते तर डोंगरावर चांगला किल्ला बांधता आला असता. डोंगराच्या पायथ्याशी, जेजुरीच्या गावाजवळ एक मोठी विहीर आहे. कित्येक शेतकरी आणि मराठे या देवाला नवस मागून घेतात..’(तारीखे दिलकुशा: मोगल आणि मराठे: सेतू माधव पगडी)


भीमसेन सक्सेना आपल्या अनुभवातून सहजच एका विषयाकडे लक्ष वेधून नेतो. तो विषय म्हणजे जेजुरीच्या खंडोबाला लागलेली धार्मिक कट्टरतेची झळ. औरंगजेब बादशहाच्या धार्मिक आक्रमकतेच्या धोरणामुळे काही काळ तेथील लोकांनी मल्लूखानाच्या कबरीचा' उल्लेख करून आक्रमकांपासून मंदिर वाचवण्याची शक्कल लढवलेली दिसते. गंमतच आहे.. नाही? पण नेमके मल्लूखानच का..?

मित्रांनो,

खंडोबाची मूर्ती अनेकदा घोड्यावर स्वार झालेल्या योद्ध्याच्या रूपात असते. राक्षसांना मारण्यासाठी त्याच्या हातात एक मोठी तलवार (खडग) आहे. खड्ग या शब्दावरून खंडोबा हे नावही पडले आहे.

खंडोबाचा उल्लेख मल्हारी महात्म्य आणि महाराष्ट्र व कर्नाटकातील लोकगीतांतून आढळतो. ब्रह्मांड पुराणात असे नमूद केले आहे की मल्ल आणि मणि या दोन राक्षस भावांना ब्रह्मदेवाच्या वरदानाने संरक्षण मिळाले होते. या संरक्षणामुळे ते स्वतःला अजिंक्य समजू लागले आणि पृथ्वीवरील संतांना आणि लोकांना घाबरवू लागले. त्यानंतर भगवान शंकर खंडोबाच्या रूपात आपल्या बैल नंदीवर स्वार झाले. जगाला दिलासा देण्यासाठी त्यांनी राक्षसांना मारण्याचे काम हाती घेतले. मणीने त्याला घोडा दिला आणि मानवजातीच्या कल्याणासाठी देवाकडे वरदान मागितले. खंडोबाने आनंदाने हे वरदान दिले. दुसरा राक्षस मल्ल, मानवजातीचा नाश करण्यास उद्युक्त झाला. मग देवाने त्याचे डोके कापून त्याला मंदिराच्या पायरीवर सोडले, जेणेकरून मंदिरात प्रवेश करताना त्याला भक्ताने चिरडले जावे. असा हा इतिहास समजला की लक्षात येते ‘मल्लू खान’ हे नाव कसे आले. मल्ल राक्षसाला स्थानिकांनी मल्लूखान केल्याने मंदिरावरील आक्रमण टाळण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ‘खान’शब्दप्रयोग आला की तो आपलाच असे समजून मोगल आक्रमक (मंदिरावर) आक्रमण करणार नाहीत असे सोयीस्कर उपयोजन लोकांनी केले तर त्यात नवल काय. आणि एका अर्थी ते खरेच होते. कारण मुस्लिम आक्रमक आपल्याच पीर दरग्यांवर वर हल्ला थोडेच करणार होते.!

अरे हो नकळतच मला अलीकडे निघालेल्या माय नेम इज “खान” या सिनेमाचं नाव सहजच आठवलं! खान नावामुळे येणाऱ्या संशयित वाईट वागणुकीबद्दल शहारुखखानने आक्षेप मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण खंडोबाचे उदाहरण अगदी या उलट आहे. असो, ‘खान’ या शब्दाचा असाही उपयोग होऊ शकते हे इतिहासातील उदाहरण गमतीदारच नव्हे तर मार्मिक आहे.!

शेवटी हा फक्तइतिहासच आहे बाकी काही नाही. विषय धर्मांधतेचा असला तरी धार्मिक विरोधाचा नाही.! इतिहासाच्या अंतरंगातून शब्दा पलीकडच्या अव्यक्त कथा आणि प्रथा काळजाला भिडल्या असतील नक्कीच!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

#jejuri

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts