Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

मऱ्हाठा पातशाहा छत्रपती जाला..



शिवराज्याभिषेकाचे महत्त्व-

मध्ययुगीन काळात प्रचलित राज्यव्यवस्थेप्रमाणे राज्यभिषेक करणे गरजेचे असे. कारण या काळात राज्याचे अस्तित्त्व हे राजवंशावर आधरित असे. अभिषिक्त राजाचे राज्य म्हणजे कायदेशीर राज्य अशी प्रथा असे. म्हणून मोगल बादशहाचे वा अदिलशहाचे फर्मान हे सरकारी समजले जाई. तसेच या बादशहांनी दिलेली इनाम, वतने यांचे महत्त्व फार होते. अभिषिक्त छत्रपती झाल्याने इनामे, वतने व जहागीर देण्याचे तसेच न्यायनिवाड्याचे सर्व अधिकार एक स्वतंत्र अभिषिक्त राजा म्हणून शास्त्रानुरुप येणार होते. विजयनगर वा यादवांच्या राज्याचा अंत झाल्यापासून शतकांच्या या कालावधीत लोकांनी केवळ सुलतानांचीच राज्ये पाहिली होती. येथील स्थानिक सरदार त्यांच्या चाकरीत असल्याचे चित्र पिढ्यानपिढ्या लोकांच्या समोर होते.

मोगल बादशहा हे स्वतःस तुर्की समजत. या सत्तेतून आपला धर्म व संस्कारांची रुजवणूक येथील लोकांमध्ये करायची हा त्यांचा एक दुय्यम पण महत्त्वाचा हेतू. येथील बहुसंख्य हिंदु लोकांवर शासन करीत असताना त्यांना प्रजेचा योग्य दर्जा त्यांच्याकडून क्वचितच प्राप्त होई. याशिवाय मोगल दरबारात वजीरापासून तर सरदार वा सामान्य अधिकाऱ्यांपर्यंत असलेले लोक हे मध्य आशिया किंवा इराणातून आलेले होते. त्यांच्या एक वा दोन पिढ्याच झाल्या होत्या. आपण तुर्की आहोत आणि हिंदुस्थानावर सत्ता गाजवित आहोत असे त्यांना वाटायचे. राजांचा लढा हा राष्ट्रव्यापी झाला होता. मोगल साम्राज्याच्या विरोधात त्यांचे यश आणि किर्ती ऐकून उत्तरेतून कवी भूषण सारखे कवी त्यांच्या भेटीसाठी आलेत व त्यांनी शिवपराक्रमावर अनेक दिव्य ग्रंथही लिहिले.

सन १६७२ मध्ये बुंदेलखंडातून राजा छत्रसाल मोगलांना सोडून राजांच्या भेटीसाठी आला. राजांनी त्याच्या कमरेला तलवार बांधली आणि स्वराज्याचा मंत्र दिला. या भेटीचे वर्णन मोठे रोचक असून छत्रसालाचा राजकवी लालकवी याने आपल्या छत्रप्रकाश या काव्यग्रंथात केले आहे. राजे छत्रसालास काय म्हणाले-

हे राजन, आम्ही तुमच्या पासून कधीच वेगळे नाहीत. तुम्ही आपल्या देशी त्वरेने परत जा आणि मोगल सैन्याचा संहार करा. तुम्ही तुर्काची तमा बाळगू नका. तुर्क हे हत्ती असले तरी तुम्ही सिंह आहात हे लक्षात ठेवा. तुर्कांच्यात विवेक नाही, त्यांनी आम्हाला झिडकारले. देवी भवानीने आमचे सहाय्य केले. मोगलांना आपल्या मनासारख्ने वागता येईना. आम्ही युक्तीने आमच्या देशी परत आलो. मोगलांनी आपले सेनापती आमच्यावर पाठविले. आम्ही तुर्कांच्यावर तलवार उपसली. आम्ही त्यांच्यावर हल्ले करु, आणि त्यांचा नाश करु. तुम्ही आपल्या देशी जा, आपली तलवार चालवा, सैन्य गोळा करा आणि तुर्कांचा नाश करा...'


याअर्थाने राजांचे राज्य हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र व एतद्देशीयांचे राज्य होते. मोगल हे तुर्की असून खुद्द औरंगजेब बादशहा स्वतःस तैमूरचा तुर्की वंशज समजत असे. खरेतर हिंदुस्थानचा खऱ्याअर्थाने बादशहा होण्यास त्याने हिंदुप्रजेसही सहिष्णुतेने व धार्मीक स्वातंत्र्याने जगू द्यावयास हवे होते.

अदिलशाही व मोगलशाहीतील काही मराठा सरदार शिवाजीमहाराजांना आपल्या बरोबरीचे समजत. तेही स्वत:स राजे म्हणवून घेत. अर्थात जो जहागीरदार असे तो स्वतःस राजाच समजत असे. दळवी, लखम सावंत, सूर्वे, मोरे यांसारखे मांडलिक राजे शिवाजीराजांचा द्वेश करत. बऱ्याचदा या बड्या वतनदारांना सुलतानांतर्फे राजा ही पदवी मिळत असे. पण तरी त्याचे महत्त्व हे पदवीपुरतेच मर्यादित असे. म्हणून महाराजांच्या अथक प्रयत्नातून आकारास आलेल्या स्वतंत्र हिंदवीस्वराज्याला खऱ्या अर्थाने चौकट ही राज्याभिषेकातूनच मिळू शकत होती.


"मुसलमान बादशहा तक्ती बसून, छत्र धरुन पादशाही करतात. मग शिवाजीराजे यांनीही चार पादशाह्या दबाविल्या आणि पाऊनलाख घोडा, लष्कर, गडकोट असे मिळविले असता त्यांस तक्त नाही, याकरिता मऱ्हाठा राजा छत्रपति व्हावा असें चित्तात आणिलें. आणि तें राजियासही मानिलें. अवघे मातब्बर लोंक बोलावून आणून विचार करिता मनांस आलें."


याप्रमाणे सभासद म्हणतो तसे आपला राजा छत्रपती व्हावा असे जनमानसाला वाटत होते. ते महाराजांनीही मान्य केले व रायगडावर राज्याभिषेकची जबरदस्त तयारी सुरु झाली.


शिवराज्याभिषेक- युवराज्याभिषेक :

सन १६७४, संभाजीराजे आता सतरा वर्षांचे झाले होते. राज्याभिषेकाने संभाजीराजेही युवराज होणार होते. सन १६६३ मध्येच वारानसीहून गागाभट्ट हे पंडित महाराजांची ख्याती ऐकून महाराष्ट्रात येऊन गेले. त्याच वेळी त्यांनी 'शिवप्रशस्ती' लिहिली होती. राज्याभिषेकासाठी गागाभट्टांनी शास्त्रशुद्ध योजना तयार केली. राज्याभिषेकासाठी महाराजांच्या कुलाचा शोध झाला. शहाजीराजेही आपला उल्लेख रजपूत करायचे. महाराजांचे घराणे हे रजपूत सिसोदे वंशाचे आहे असे कवी भूषणने आपल्या काव्यात गायीले होते. सभासदही महाराजांचे 'कुळ शोधिले असता उत्तरेतील क्षत्रीय सापडले' असे म्हणतो. परंतु जन्माने जरी ते क्षत्रीय असल्याचा रुढ समज असला तरी भोसले घराण्यात क्षत्रीयांचे कोणतेच आचार व संस्कार झाले नव्हते. विशेषतः मौजीबंधन संस्कार बंद झाला होता म्हणून राज्यभिषेक करण्यात तांत्रिक दोष उत्पन्न झाले. गागाभट्ट व अनंतभट्ट यांनी या दोषांचे निवारण करण्यासाठी शास्त्रशुद्ध योजना निर्माण केली. त्यासाठी आवश्यक धर्म संस्कार करण्यात आले.


सर्वप्रथम १९ मे रोजी महाराजांनी प्रतापगडी जाऊन कुलदेवता तुळजाभवानीचे पुजन केले. देवीला तीन मण वजनाचे सोन्याचे छत्र अर्पण केले. रायगडावर त्यांचे मौजीबंधन झाले. २९ मे रोजी तुलादानास सुरुवात झाली. राजांची सुवर्णतुला करण्यात आली. याशिवाय चांदी, तांबे, कापूर, साखर, फळे वगैरे अनेक पदार्थांनी त्यांची तुला करण्यात आली व ते सर्व पदार्थ व संपत्ती दान करण्यात आले. यानंतरअनेक शास्त्रविधी चालले. ६ जूनला राज्याभिषेक होऊन महाराज छत्रपती म्हणून सिंहासनारुढ व्हावयाचे होते.


रायगडावर पाहुण्यांची गर्दी झाली होती. रायगडाचे राजवैभव पाहून पाहुण्यांचे डोळे दिपून जात होते. अनेक प्रकारची विद्वान, कलावंत, योद्धे, राजकीय अधिकारी, कवी, वकील व पाहुण्यांची वर्दळ झाली होती. या समारंभावेळी भव्य दरबार भरवण्यात आला, मोरोपंत पेशवे, रामचंद्रपंत, आण्णाजीपंत, त्र्यंबकपंत, निराजीपंत, पंडितराव, दत्ताजीपंत, सरसेनापती, चिटणीस, जेधे, बांदल असे मावळचे देशमुख, स्वराज्यासाठी ज्यांनी श्रम उपसले असे अनेक जिवलग व सहकारी या सोहळ्यास हजर होते.


६ जून तीन घटीका रात्र उरली असता राज्याभिषेक सुरु झाला." शिवाजीमहाराज, संभाजीराजे व सोयराबाई असा राजपरिवार एका सुवर्णाने मढवलेल्या क्षीरपक्षाने बनविलेल्या आसनावर बसले. त्यांच्या भोवती अष्टप्रधान आठ दिशांनी आपल्या हातातील कलशात अभिषेकाच्या वस्तू घेऊन उभे राहिले. मोरोपंत तुपाचा कलश घेऊन, हंबीरराव मोहिते दुधाचा कलश घेऊन, रामचंद्रपंत दह्याचा कलश घेऊन, दत्ताजीपंत मोर्चल घेऊन, त्र्यंबकपंत सुमंत पंखा घेऊन, रघुनाथपंत पंडितराव मधाचा कलश घेऊन तर निराजीपंत न्यायाधीश दुसरे मोर्चल घेऊन उभे राहिले आणि आण्णाजी दत्तो हे छत्र घेऊन उभे राहिले. बाळाजी चिटणीस हे लेखणपान घेऊन उभे राहिले. सभोवताली सर्व अधिकारी व मांडलिक राजे उभे राहिले.' गागाभट्ट, बाळंभट्ट व इतर पंडितांच्या मंत्रघोषात अभिषेक होऊ लागला.


सर्व दरबार खच्चून भरलेला होता. भव्य दरबारात चौथऱ्यावर सुबक रत्नजडीत बत्तीस मण सोन्याचे सिंहासन तळपत होते. शस्त्रे-वस्त्रे आभूषणे धारण केलेले महाराज सहकुटुंब दरबारात दाखल झाले. महाराजांनी सिंहासनास वंदन केले. मंगल घटका येऊन ठेपली आणि राजे सिंहासनासमोर उभे राहिले. गागाभट्ट व इतर पंडितांच्या मुखातून मंत्रघोष सुरु होता. मंत्रघोषाचा स्वर उंचावला आणि सिंहासनाला पदस्पर्श न होता ते सिंहासनावर आरुढ झाले. ताशे, कर्णे, शिंगे, शहादणे सर्व वाद्ये मोठ्या गजरात वाजू लागली. तोफा कडाडल्या व त्यांचा आवाज थेट दिल्लीच्या किल्ल्यावर आणि दख्खणच्या सागरात जाऊन दणाणला. शिवाजीमहाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. संभाजीराजे जेष्ठ पुत्र या नात्याने ते स्वराज्याचे युवराज झाले. युवराजपदाची वस्त्रे आणि अलंकार परिधान करून सिंहासनाच्या बाजूला चौथऱ्यावर ते विराजमान झाले होते. अष्टप्रधान मानाप्रमाणे उजव्या आणि डाव्या बाजूस उभे होते. दरबारात सर्व प्रमुख, आप्त व वकील अदबीने उभे होते. महाराज सिंहासनावर बसून नजराने आणि मुजरे स्विकारत होते. हेन्री ऑक्झेंडन हा इंग्रज वकील सिंहासनासमोर पेश झाला व त्याने महाराजांना मुजरा करून नजराना पेश केला. त्याने महाराजांसाठी एक हिरेजडीत शिरपेच, हिरेजडीत सलकडी आणि मोती असा नजराणा पेश केला. तसेच युवराजांना दोन लालखचित सलकड्या आणि एक आठ हिऱ्याची अंगठी असा नजराना पेश केला. तसेच त्याने अष्ट प्रधानांपैकी पेशवा मोरोपंत, सूरनीस आण्णाजी दत्तो, न्यायधीश निराजी पंडित आणि रावजी सोमनाथ यांनाही नजराने दिले.


अजोड परराष्ट्र धोरणाचा नमुना-

हेन्री ऑक्झेंडन हा तहासाठी २२ मे पासून रायगडावर वास्तव्यास होता. या सोहळ्याचे वर्णन आपल्या रायगडाच्या शिष्टाईच्या रोजनिशीत करताना तो म्हणतो-


५ जून रोजी, दुसऱ्या दिवशी सिंहासनारुढ राजाला मुजरा व नजर करण्यासाठी यावे म्हणून निराजी पंडिताचा निरोप आला. ६ जून रोजी, सात किंवा आठच्या सुमारास मी दरबारात गेलो. त्या वेळी राजा भव्य सिंहासनावर आरुढ झालेला व मौल्यवान पोशाख केलेल्या प्रधानांनी वेष्टिलेला दिसला.

संभाजीराजे, पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण हे सिंहासनाखालील पायरीवर अगर ओट्यावर बसले होते. राहिलेले सेनाध्यक्ष व इतर अंमलदार बाजूला आदराने उभे होते. मी मुजरा केला व नारायण शेणव्याने नजरेची अंगठी वर धरली. शिवाजीराजाचे आमचेकडे लक्ष जाताच त्याने अगदी सिंहासनाच्या अगदी पायरीजवळ येण्याचा आम्हांला हुकूम केला व पोशाख देऊन आम्हाला तात्काल रजा दिली. थोडांच वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो. तेवढ्या वेळांत सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकांवर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला दोन मोठी मोठ्या दातांच्या मत्स्यांची, सुवर्ण शिरेहोती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे (मोर्चेल व चवऱ्या) व एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूंची पारडी, न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो तो दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूला उभे केले असून दोन सुंदर (पांढरे) घोडे शृंगारुन आणिलेले दिसले. गडाचा मार्ग इतका बिकट होता हे लक्षात घेता हे पशू कोठून वर आले असावे याचा आम्हाला तर्कच करवेना !


राज्यभिषेकानंतर महाराजांनी तहावर सही केली. तहानुसार इंग्रजांना बऱ्याच सवलती प्राप्त झाल्या. राजापुरच्या नुकसान भरपाईसाठी इंग्रजांना ७५०० रोख आणि २५००राजापूरच्या जकातीतून असे एकूण १०००० होन देण्याचे ठरले. राजापुरला पून्हा वखार घालण्यासाठी परवानगीही मिळाली. यानुसार सन १६७५ मध्ये इंग्रजांनी राजापुरला पुन्हा वखार थाटली. तसेच या तहात जकात व व्यापाराविषयी इतर बरीच कलमे होती. त्यांना स्वराज्यातील इतरही बंदरात वखारी घालण्यास परवानगी मिळाली होती.


महाराज हे खरेच थोर राजकारणी होते. तसे महाराज ही नुकसान भरपाई देण्यास बाध्य नव्हते. मुळात राजापूर वा इतर ज्या वखारींची लूट झाली ती त्या शत्रुच्या मुलूखात असताना झाली. म्हणून या वखारींची जबाबदारी ही आपली नाही असे महाराजांचे धोरण होते. मात्र ती देऊन त्यांनी इंग्रजांना राजापुरास वखार घालण्याचे एकप्रकारे जणू अमिषच दिले होते. या व्यापारातून केवळ जकातीचे उत्पन्नच नाहीतर आपल्या मुलूखातील मालाच्या विक्रीलाही उत्तेजन मिळणार होते. या आर्थिक बाबी शिवाय इंग्रज आता घट्ट संबंधात अडकल्याने त्यांचेकडून काही तोफा वा सिद्दीवर नियंत्रण मिळवता येण्यासारखे होते. किमान राजापुर वखारीच्या सुरक्षेसाठीतरी इंग्रजांवर दबाव ठेवता येत होता. अर्थात इंग्रजांना आर्थीक व राजकिय संबंधात अडकविता येणार होते. बरे यातही मुत्सद्दीपणा म्हणजे नुकसानीची काही रक्कम ही जकातीतून अदा करायची होती. अर्थात इंग्रजांना त्यासाठी वखार घालणे आवश्यक होते. शिवाय इतर रक्कम पून्हा रोख न देता ती आपल्या मुलखातील नारळ व सुपारी अशा मालातून अदा करणे सुरु झाले. म्हणजे तहाने दहा हजार होन दिले होते पण प्रत्यक्षात मालाच्या किंमतीच्या तफावतिचा फायदा महाराजांनाच होणार होता हे विशेष. इंग्रजांना नुकसानीबाबत मिळणाऱ्या या मालास भरपाई न म्हणता महाराजांकडून इंग्रजांना मिळणारे बक्षिस असे संबोधले जात असे.


असो, राज्याभिषेकानंतर ७ तारखेस दानकार्य व भोजनसमारंभ पार पडले. प्रधान, मुतालिक, बारामहाल व अठराकारखान्यांवरील अधिकारी, महालदार, सुभेदार ब्राह्मण, गोसावी सर्वांना वस्त्रे-धनादी दाने देण्यात आली. शहाजीराजांकडून मिळालेल्या ४० हजार होन उत्पन्नाच्या पुणे महालाच्या जहागीरीपासून प्रारंभ करून शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्या सुमारास स्थूलमानाने १ कोटी होन म्हणजे तीन-चार कोटी रुपये एवढ्या उत्त्पन्नाचे राज्य निर्माण केले. आपल्या राज्यास बळकटी देण्यासठी अनेक किल्ले बांधले. सागरावर सत्ता निर्माण करण्यासाठी किनाऱ्यावरील अनेक जलदुर्ग जिंकले वा निर्माण केले. प्रचंड आरमार उभारून सिंद्दी, पोर्तुगीज व इंग्रज अशा दर्यावर्दी शत्रुच्या मनात भय उत्पन्न केले. विजापूरला यावेळी सिकंदर अदिलशहा राज्य करीत होता तर मोगल बादशहा औरंगजेब काबूलच्या मार्गावर रावळपिंडीकडे होता. बहादुरखानाने त्याला पत्रातून राज्याभिषेकाची खबर कळविली तेव्हा त्याने खेद केला. याबद्दल सभासद म्हणतो-


"खुदाने मुसलमानाची पादशाई दूर करून, तक्त बुडवून मराठीयास तक्त दिले. आता हद्द जाली!"


अनेक वर्षांनी पुन्हा एकदा स्वतंत्र हिंदू सिंहासनाची स्थापना या हिंद भूमित झाली होती आणि हे हिंदुस्थानातील तमाम सुलतान बादशहांना रुचण्यासारखे नव्हते पण आता ते काय करु शकत होते. राज्याभिषेकाने वंशपरंपरेचे राजपद निर्माण झाले व ते टिकवण्याणे लोकांनी कर्तव्य समजले. रयतेच्या मनात महाराजांची प्रतिमा आता एका हिंदू एतद्देशीय बादशहाची झाली. म्हणून सभासद म्हणतो-


"या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट कांही सामान्य जाली नाही." 


सुलतानाच्या आशीर्वादाने नव्हे तर स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पूर्णपणे धार्मिक अनुष्ठाणात महाराज हिंदवी स्वराज्याचे अभिषिक्त छत्रपती झाले होते. भोसले घराण्यातील सर्व पुत्र आतापर्यंत सरदार वा जहागिरदाराचे पुत्र म्हणून गणले गेले. मात्र संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज झाले!

-शौर्यशंभू या ग्रंथातून

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

  1. खुपच् छान लिहिले आहे

    ReplyDelete

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts