Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

शंभू छत्रपतींच्या स्वराज्य मोहिमांमध्ये जैनांचे योगदान..



अल्पसंख्यांक असणारा जैन समाज कर्नाटकाच्या काही भागामध्ये बहुसंख्येने आढळतो. 

जैन धर्माचा कर्नाटकाशी ऐतिहासिक संबंध ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातील आहे.[१][२] आचार्य भद्रबाहू यांनी उत्तर भारतातून जैन संघासह दक्षिणेकडे स्थलांतर केले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य होते. संघ चंद्रगिरी टेकडीवर थांबला. श्रावणबेळगोळा येथे आल्यावर आचार्य भद्रबाहू यांनी आपल्या अनुयायांना निरोप दिला. येथूनच अनेक अनुयायी कर्नाटकातील कोप्पळ, लक्ष्मेश्वर, लक्कुंडी व इतर भागात स्थलांतरित झाले.[२] मागे राहिलेल्या आचार्य भद्रबाहूंनी समाधि घेतली. त्यांच्या सेवेत राहिलेल्या चंद्रगुप्त मौर्यांनी आपल्या गुरूचे अनुसरण करत समाधि घेतली असे मानले जाते.

असो,

कर्नाटकातील जैनबहूल भागांमध्ये गाव पाटीलकी व देशमुखी या समाजाकडे असल्याने त्यांची आडनावे पाटील, देसाई अशी आढळतात. महाराष्ट्रातील देशमुखीचे अधिकारपद कर्नाटकामध्ये देसाई नावाने वापरले जाई. तसेच कन्नड भाषेमधील ‘गौडा’ शब्द वापरण्याचाही प्रघात असे. याचाही अर्थ गाव प्रमुख असाच होतो. 


अगदी विजयनगरच्या साम्राज्यातील सरदार सामंत असलेली बरीच जैन घराणी पुढे विजापूरच्या आदिलशाहीचा भाग बनून राहिली. शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजया नंतर कर्नाटकातील कोप्पळ, गदग, बेल्लारी, चिक्कबळापूर असा बराच भाग स्वराज्यात सामील झाला. त्याचबरोबर तेथील बरीच देसाई मंडळी स्वराज्यात आली. शिवछत्रपतींच्या महानिर्वाणानंतर सन १६८१ मध्ये खुद्द औरंगजेब बादशहा लक्षावधींची फौज घेऊन दक्षिणेत उतरला. अखंड ७-८ वर्षे स्वराज्यातील विविध किल्ल्यांशी झुंज देऊन हरलेला मोगल बादशहा आपले लक्ष दक्षिणेतील विजापूर आणि गोवळकोंडा या सल्तनतींकडे वळवतो. 

आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचे व विजापूरच्या आदिलशाहीचे राज्य समूळ नष्ट करतो. यावेळी विजापूरच्या हद्दीतील किल्ले व मुलूख ताब्यात घेण्यासाठी तो आपल्या सैन्याला रवाना करतो. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते व कवी कलश हे कोल्हापूर, मिरज, कोप्पळ, बहादूरबंडा, हूक्केरी, लक्ष्मेश्वर या मुलखातील देसाई मंडळींना बादशाही सैन्याला शरण न जाण्याचे आवाहन करतात. तर काही देसाई स्वतःहून शंभूराजांना एकनिष्ठ राहून किल्ल्याचे रक्षण करतात. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे लक्ष्मेश्वरचा खानगौडा देसाई..! 

आज लक्ष्मेश्वर म्हणजे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण होय. शिवाच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाणारे लक्ष्मेश्वर जैनांच्या प्राचीन मंदिर व शीलालेखांसाठीही प्रसिद्ध आहे.

शिवकालातील येथील प्रमुख देसाई म्हणजे खानगौडा होय.!

खानगौडा देसाई हा कर्नाटकातील जैन समुदायापैकी असून त्याचे स्वराज्य कार्यात महत्त्वाचे योगदान आहे.

समग्र दक्षिणेला औरंगजेब बादशहाच्या सैन्याचा विळखा पडला त्यावेळी अनेक सरदार, देसाई मंडळी शंभूराजांना सोडून मोगलांकडे गेली. मात्र या सुमारास लक्षमेश्वरचा खानगौडा हा देसाई छत्रपती संभाजी राजांशी एकनिष्ठ होता हे तत्कालीन राजपत्रां वरून लक्षात येते. त्याने कर्नाटकात मोगल आक्रमण थोपण्यासाठी प्रयत्न केला होता. म्हणून राजांनी आनंदाने मौजे ‘नरती’ हे गाव त्याला इनाम दिले. १९ मार्च १६८६ चे ते राजपत्र ज्यामध्ये शंभूराजांच्या गदग प्रांताच्या सुभेदाराने शंभूराजे यांनी दिलेल्या इनामाची माहिती खानगौडाला कळविली -


गोविंद रघुनाथ सुबेदार कारकून सुभा प्रांत गदग- खानगौडा परगणे लक्ष्मेश्वर


“राजश्री खानगौडा देसाई परगणे लक्षमेश्वर यानी येकनिस्टतीने माहाराज राजेश्री छत्रपतीसाहेबांचे कार्येभागास वर्तणूक करून मसलहत केले. माहाराजसाहेब हरुशीत होऊन मौजे नरती (बु) इनाम करून दिल्हे..”

[२]


पुढे याच खानगौडा देसायाने आणि किल्ले कोपलच्या नाडगौडा देसायाने सन १६८७ च्या जून-जुलै महिन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. औरंगजेबाने बादशहाने विजापूर घेतल्यावर या विजयाचा लाभ घेण्यासाठी व भोवतालचा प्रांत जिंकण्यासाठी सैन्याची नेमणूक केली. कासीमखान किरमाणी हा प्रमुख मोगल सरदार या कामासाठी मुक्रर केला होता. मोगल सैन्याने कोपळ, भुजबळगड या प्रांतात ठाणी बसविली व मुलूख जिंकला. पाळेगारांनीही कित्येक गडकोट हस्तगत केले. पडलेल्या विजापूरच्या मुखातील सरदार मोगलांच्या बाजूने जाऊ लागले. रजबखान नावाच्या सरदाराने असाच उद्योग केला. या गडबडीत शंभूराजांच्या ताब्यातील कोपळ आणि बहादूरबंडा हे मराठ्यांचे किल्ले मोगलांच्या ताब्यात जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा खानगौडा आणि नाडगौडा या लक्षमेश्वर आणि कोपळच्या देसायांनी कोपळ आणि बहादूरबंडा या दोन्ही किल्ल्यांवर हल्ला चढविला. त्या किल्ल्यांवरचे कित्येक हशम पळून गेले. तेव्हा देसायांनी आपले हशम किल्ल्यात घालून किल्ल्याची मजबुती केली. तेथे स्वार ठेवले. या सर्व गोष्टी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहून केल्या. संभाजीराजे आपले सैन्य घेऊन तेथे गेले तेव्हाही देसायांनी मदत केली. ही एकनिष्ठता पाहून छत्रपती संभाजी राजांनी किल्ले कोपळजवळचे ‘अलवंडी’ गाव देसायांना इनाम दिला. गाव इनाम दिल्याची बातमी शंभूराजांचे कर्नाटकातील सूबेदार रायाची सामराज यांनी देसाई मंडळींना लिहून कळविली ते राजपत्र-


रायाजी सामराज – खानगौडा देसाई परगणे लक्ष्मेश्वर व नाडगौडा किले कोपल

“तांब्रांनी विजापूर घेतले आणि कोपल भुजबलगड प्रांतीं तांब्राची ठाणी येउनु कितेक मुलूक कबज केला व कितेक गड पालेगारांनी घेतले. रजबखान याणेही कितेक महाल कबज करून ठाणी गडकोट घ्यावे यैसी धूम करूं लागला ते प्रसंगी किले कोपल व किले बहादुरबंडा हे दोन्ही किल्याची बहुत जबुनाई जाली होती. तैशामध्ये तुम्ही आपणाकडून कांहीं गला दोही किल्यावरी घातला. दोही किल्याचे हशम होते ते कितेक पलोन गेले. म्हणून तुम्ही आपणाकडून हशमं पाठऊन मजबुदी केली. स्वार ठेविले. आणि छत्रपतींच्या पायासी येकनिस्टता धरून हें केलें. उपरी आमच्या लस्कराच्या फौजा घेऊन आम्ही आलो. आणि किल्यांची बेगमी करावी तसी केली. तुम्ही बहुतच येकनिस्टपणे वर्तोन दोन्ही किल्यांची मदती केली यैसे पूर्ण कलों आलें. त्यावरून कृपाळू होऊन अलवंडी किले कोपल हा गांव म-न्हामत करून इनाम दिला. ”

[४]




अशाप्रकारे धामधुमीच्या या काळात खानगौडा देसायाने स्वराज्यासाठी केलेले कार्य महत्त्वाचे ठरते. खरेतर इतिहास जातीय दृष्टिकोनातून बघू नये. पण येथे जात-धर्मावरून इतिहास मांडणे हे प्रयोजन नसून स्वराज्य कार्यात सर्वांचाच कसा सहभाग होता हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. खरेतर इतिहासाला बंधने नाहीत.! म्हणून तो वर्तमानात अभ्यासला जातो भविष्यासाठी!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

लेखक- ‘शौर्यशंभू’

मालेगाव, जिल्हा- वाशीम

९६५७५२५५२५

।।फक्तइतिहास।।


संदर्भस्रोत-

१- डेक्कन हेराल्ड/ "कर्नाटक जैन धर्माचे केंद्र" .18 जून 2006.

२- SOCIO-ECONOMIC CONDITIONS OF JAINS IN KARNATAKA: A STUDY OF DIVERGENCE BETWEEN DIGAMBAR AND SVETHAMBAR JAINS -Dr R G Desai

३-शिवचरित्र साहित्य २ ले. ७५

४-शिवचरित्र साहित्य २ ले. ७६


Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts