Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

इतिहासकालीन ‘सिंह’...

 


मित्रांनो १० ऑगस्ट २०२५, अर्थात जागतिक सिंह दिवस या निमित्ताने इतिहासातील सिंह शोधूया.

घनदाट जंगलात दबा धरून शिकार करणारा वाघ अव्वल शिकारी ठरतो. याउलट आपली केसाळ आयाळ मिरवत सिहिनींना सोबत घेऊन सिंह निधडा उघड्या मैदानावर फिरताना दिसतो.! अर्थात, यामुळेच सिंह हे शौर्याचे व सामर्थ्याचे प्रतीक बनले आहे. प्राचीन ऋग्वेदात सुद्धा सिंहाचा उल्लेख आढळतो. सप्तसिंधू प्रदेशात सिंहाचा मागमुस नसला तरी सिंधू नदीच्या पश्चिमेकडे भरपूर सिंह होते. बलुचिस्तानात सापडलेल्या सुवर्णचषकावरील सिंहाच्या चित्राचा अर्थ यावरूनच निश्चित होतो.

सिंगापूर शहराचे नाव सिंहावरून पडले. श्रीलंकेतल्या सिंहली लोकांची मूळ दंतकथा व पाली महाकाव्य ‘महावंश’ या ग्रंथात सिंहली लोक हे राजपुत्र विजय व त्याच्या अनुयायांचे वंशज आहेत असे सांगितले आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात हा राजपुत्र विजय आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आजच्या ओडिशा व पश्चिम बंगाल या प्रदेशातून समुद्र मार्गे दक्षिणेस श्रीलंकेत आला. कथानकांप्रमाणे विजय हा एका राणीला सिंहापासून झालेला पुत्र होता. श्रीलंकेतील बहुसंख्या जनता स्वतःला सिंहली म्हणून घेते त्याचे हेच कारण आहे. म्हणूनच श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावर खडकधारी सिंहाचे चित्र विराजमान आहे.

भारतीय पंजाबी, रजपूत व इतर काही जमातीमध्ये सिंग किंवा सिंह लावण्याचा प्रघात सिंहाच्या शौर्यादि गुणांमुळेच पडला आहे.

सिंह हा राजशक्ती व शौर्याचे प्रतीक बनला व वर्चस्वासाठी सिंहासन शब्द रूढ झाला.

इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्त्रकात मेसोपोटेमियात सिंहाची शिकार फक्त राजे-महाराजेच करू शकत होते. तिथे तो शाही खेळ होता. प्राचीन इजिप्त मध्ये सुद्धा सिंहाची शिकार राजेच करू शकत होते. अर्थात तो एक विशेष अधिकार होता. 

अमेंटोहेप राजा (इ.पू.१३९१ ते १३५२) आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या दशकात १०२ सिंहाची शिकार करतो. अस्सिरीयन राजा अशूरबनीपाल दुसरा याच्या शाही दस्तावेजांमध्ये मजकूर आढळतो-

“माझ्या धर्मोपदेशक पदाचे कौतुक असणाऱ्या नम्रता व नेग्रल या देवतांनी मला मैदानात आढळणारे जंगली प्राणी दिले व त्यांची शिकार करण्याची आज्ञा केली. (त्याप्रमाणे) मी ३० हत्तींना सापळ्यात पकडून ठार मारले, २५७ थोराड जंगली बैलांना माझ्या शस्त्रांनी धारातीर्थी पाडले व रथारूढ होऊन भाला वापरून ३७० सिंहांना ठार केले.”

असो, खरे तर शौर्यपण मिरवणारे हे राजे शूर नसून हत्यारे ठरतात.

असो, प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या देशात अनेक शिल्पांमध्ये राजवाड्यांमध्ये सिंहाला भरपूर स्थान दिले गेले ते प्रतिमा स्वरूपातच. 

अर्थात सिंह त्याच्या गुणामुळे आदरस्थानी पोहोचला तो केवळ प्रतिमान मध्येच.!

इसवीसन पूर्व भारता बरोबर इराणात सुद्धा प्राचीन राजवट सुरू होती. दारयवहू (DARIUS) हा मोठा प्रभावशाली सम्राट (५२१-४८६ इ. स. पूर्व) होऊन गेला.

दारयवहूने अनेक एकप्रत्तरस्तंभ (Monolith Pillar) उभारले होते. त्या स्तंभावर शिरोभागी चौकोनी शिखरभूत भागावर चार सिंहांच्या आकृति कोरलेल्या आहेत. असे एकप्रस्तरस्तंभ ईराणात जागोजागी आजही उभे असलेले दिसून येतात. भारताने मानचिन्ह म्हणून स्वीकारलेला धर्मचक्रांकित स्तंभ सम्राट अशोकाने उभारलेला होता. दारयवहूनंतर साधारणतः दोनतीनशे वर्षानंतर सम्राट अशोक होऊन गेला. अशोकाने दारयवहूच्या कोरलेल्या लेखांची कीर्ति ऐकून आपले शिलालेख कोरविले असा विद्वानांचा कयास आहे. दारयवहूचा प्रस्तरस्तंभ पाहूनच अशोकाने आपले स्तंभ उभे केले असेहि काही विद्वान मानतात.

सिंह आणि चंद्रगुप्त यांचा समन्वय साधणारी एक आख्यायिका मोरयांच्या इतिहासात बोलली जाते.

अलेक्झांडरच्या मृत्यूमुळे वायव्य भारतात राजकीय शक्तीचा समतोल बिघडला. या परिस्थितीचा फायदा घेऊन चाणक्य व त्याचे अनुयायांनी एक बंडखोर सेना तयार केली. मगधाच्या नंदराजाला पदच्युत करण्याचे त्यांचे प्रयत्न असले व नंदाच्या तावडीतून सुटण्यासाठी चंद्रगुप्ताने जंगलात पलायन केले. तेथे अति थकव्यामुळे तो गाढ झोपेत पडून राहिला मग एका सिंहाने त्याला चाटून साफ केले व त्याला जाग येईपर्यंत त्याच्या संरक्षणासाठी तेथेच कसा उभा राहिला. जागा झाल्यावर आपल्या रक्षणासाठी सिंह उभा असलेला चंद्रगुप्ताला दिसला व हा शुभ शकुन मानून नंदराजाला पदच्युत करण्याचे त्याचे ध्येय अजूनही दृढ झाले, असे वर्णन एका आख्यायिकेत आहे. ही कथा मौर्य शासनाच्या प्रचाराकांनीच सर्व दूर पसरवली असू शकते. असो, तरी सिंह येथे राजसत्तेचे प्रतीक म्हणून अधोरेखित होते.

भारतीय संस्कृतीतील दुर्गा या देवीप्रमाणे सुमेरियन देवता नना, सिरीयन देवी इस्टर व पर्शियन देवी अनाहिता या देवतांना सिहारूढ दाखविले गेले आहे.

असो,

पौराणिक ते प्राचीन असा सिंहाचा प्रवास आता संपुष्टात आला आहे. त्याच्या शौर्य-साहसी गुणांप्रमाणेच तो दुर्लभ झाला आहे. एक प्रभावशाली इतिहास होण्याच्या मार्गावर..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts