Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

लक्ष्मीनरसिंह-हम्पी: विजयनगर

विजयनगरच्या सम्राटांपैकी राजा कृष्णदेवराय हे विष्णू भक्त होते. त्यांची भक्ती ही मूर्ती कलेतून तर कधी नाण्यांवरील गरुड आणि राज चिन्ह वराह यातून व्यक्त झालेली आहे.

हम्पी (विजयनगर) शहरात अखंड एकशिला निर्मिती नरसिंहाची मूर्ती विजयनगरची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. ६.७० मीटर एवढी उंच असलेली ही नरसिंहाची मूर्ती इसवी सन १५२८ मध्ये कृष्णदेवराया यांच्या आज्ञेने निर्माण करण्यात आली व पुरोहित कृष्णभट्ट यांच्याद्वारे प्रतिष्ठित करण्यात आली.

नरसिंह हा विष्णूचा चौथा अवतार आहे.

येथे नरसिंह आदी शेषाच्या कुंडली आसनावर विराजमान असून सात मुखी शेषाने त्यांच्या डोक्यावर छत्र धरले आहे. प्रस्तुत मूर्ती सर्व अलंकाराने अलंकृत आहे. या प्रचंड मूर्तीला मोठी प्रभावळ असून दोन्ही स्तंभावर सिंहाचे अंकन केले आहे. स्तंभ मध्यात वेलीसदृश्य अंकन केले आहे. स्तंभ शीर्ष वलयकार होऊन उच्च स्थानी मध्यभागी किर्तीमुख आहे.

अलीकडच्या काळात नरसिंहाचे मुख तुटल्याने ती उग्र स्वरूपात दिसत असे म्हणून स्थानिक लोकांद्वारे या नृसिंह मूर्तीला उग्र नृसिंह असेही म्हटले गेले. मात्र डाव्या बगलेत विष्णूची सहचरणी लक्ष्मी देवीचा उजवा हात दिसत असल्याने ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाले.

हस्त मुद्रा: प्रस्तुत मूर्ती चतुर्भुज आहे. अर्थात आज ह्या भुजा नष्ट झाल्या आहेत. मूर्तीचे मागील दोन्ही हात उद्बाहू असून पुढील हातांपैकी उजवा हात ’अभय’ मुद्रेत तर डावा हात ‘कट्यावलंबीत’ मुद्रेत आहे. मागील उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख ही आयुधे आहेत.



नरसिंहाच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मी नष्ट झाली आहे. तिचा फक्त एकच हात नरसिंह मूर्तिच्या डाव्या बगले जवळ दिसतो. म्हणून या मूर्तीस लक्ष्मी नृसिंह संबोधले जाते.

एकूणच नरसिंहाला त्यांची पत्नी लक्ष्मी, त्यांच्या डाव्या मांडीवर बसवलेली आहे. त्याच्या उग्र (भयंकर) पैलूच्या उलट, जिथे त्याचा चेहरा विकृत आणि क्रोधित आहे, तो या स्वरूपात शांत दिसतो. तो सुदर्शन चक्र आणि पांचजन्य यांचे पैलू धारण करतो आणि त्याची मूर्ती दागिन्यांनी आणि हारांनी सजलेली आहे.

नरसिंहाच्या आख्यायिकेनुसार, त्याने हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर, त्याचा राग अजूनही अखंड आहे. नरसिंह देवता क्रोधित आहे, त्याचा सद्गुणी भक्त प्रल्हाद आणि देवी लक्ष्मी त्याचे गुणगान गातात. देवी लक्ष्मी नरसिंहाला शांत करते आणि त्याला खात्री देते की त्याचा भक्त आणि जग दोघांचेही तारण झाले आहे. पत्नीचे बोलणे ऐकून नरसिंह देवता शांत होते आणि त्याचे रूपही अधिक सौम्य होते. परिणामी, लक्ष्मी नरसिंहाला सौम्यता आणि शांततेचे प्रतिनिधित्व म्हणून पूजले जाते.


योगपट्टासन:

उत्कुटितासनामध्ये (मांडी स्वरूपात दोन्ही पाय गुडघ्याच्या आत) बसलेला जेव्हा दोन्ही गुडघे योगपट्टाने बंद करतो तेव्हा हे आसन होते. प्रस्तुत मूर्ती ही योगपट्टाने बद्ध असल्याने योग पट्टासनात आहे. याला योग नरसिंह असेही म्हणतात.

पूर्वी मूर्ती भोवती मंदिर असावे पण सध्या मूर्ती उघड्या स्वरूपात आहे.

विष्णूधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण, अग्निपुराण, रूपमंडलम, हरिवंश अशा ग्रंथांमध्ये नृसिंहाचे वर्णन येते.

संदर्भ स्रोत: भारतीय मूर्तीशास्त्र; प्रदीप मैसेकर

South Indian images of gods and goddess:H Krishna Sastri, Rao saheb

हम्पी: विजयनगर/Hampi-Vijaynagar/narasimha 

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts