Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

पारसिक देशा...

 


मित्रांनो,

फारसी म्हटले की आपल्याला मुगलकाल आठवतो. कारण तत्कालीन राजवटीमध्ये राजभाषा म्हणून फारशीचाच वापर होताना दिसतो. खरे पाहता फारशी ही मोगलांची नसून कधीकाळी स्वतंत्र असलेल्या पारस देशाची मूळ भाषा होय. भारतीय प्राचीन संस्कृतीशी बंधुत्व असणाऱ्या पर्शिया अर्थात इराण येथून परागंदा झालेली पारसीबाबा मंडळी आमच्या देशात टाटा, मिस्त्री, लोखंडवाला, बंदूक वाला अशा विविध नावाने राहू लागली हे आपल्याला माहीत आहे. मात्र या पर्शियनांचा शोध भारतीय पुराणातून घेतला तेव्हा विष्णुपुराण, विशाखदत्ताचे मुद्राराक्षस आणि गुप्तकालीन कालिदासाने 'पारसिक' म्हणून केलेली संस्कृत वर्णने आढळतात.

मुद्राराक्षस काव्यग्रंथात विशाखदत्ताने पर्शियन सुदृढ अश्वबला बद्दल म्हटले आहे-

'मेधाक्ष: पंचमो-अश्मिन् पृथुतुरगबलपारसीकाधिराज:'

तर

कालिदासाने आपल्या काव्यात भारतातून पारस देशाला जाण्यासाठी असलेल्या स्थलमार्ग तसेच जलमार्गाचा उल्लेख केला आहे-

'पारसीकांस्ततो जेतुं प्रतस्थे स्थलवर्त्मना ।


मित्रांनो, मुंबई मराठी इतिहास संशोधन मंडळाच्या लेखमालेत देवीसिंग चौहान यांनी भारत व ईराण संबंधावर प्रकाश टाकताना तत्कालीन पर्शियन राजाच्या शिलालेखाचे उदाहरण मांडले आहे.

ईराण या देशाची आपणा सर्वसामान्य भारतीयांना फारच कमी माहिती आहे, आहे ती केवळ एक इस्लामी राष्ट्र म्हणून. सध्याचे ईराण राष्ट्र हे इस्लामधर्मी आहे. या देशाची भाषा फार्सी होय. ही भाषा अरबी लिपीत लिहिली जाते. इस्लाम धर्माची नव्याने स्थापना केलेल्या अरबांनी ईराण देशाच्या ४०० वर्षे चालत आलेल्या सासानी साम्राज्यावर सन ६५२ (शक ५७४) मध्ये आक्रमण केले. यज्दगिर्द तिसरा या राजाचा रणांगणावर पराभव झाला. तो पळून गेल्यावर त्याचा वध झाला. ईराणी लोकांचे स्वराज्य नष्ट झाले. अरबांनी सर्व ईराण देश व्यापला. पुढील १०० वर्षांत सर्व ईराण देश मुसलमान झाला. तत्कालीन ईराणचा धर्म जरतुष्ट्र होता. ईराणी जनतेवर अनन्वित अत्याचार झाले. धर्मावर संकट आले. पहलवी (फासींचे पूर्ववर्ती रूप) भाषेचा वापर निषिद्ध ठरला. या परिस्थितीतून आपला धर्म, भाषा व संस्कृति यांचे जतन करावे म्हणून काही ईराणी लोक शक ६७२ च्या सुमारास गुजरातमधील संजान या ठिकाणी येऊन ठेपले. ते आलेले लोक म्हणजेच मुंबई, बलसाड, सुरत येथे प्रामुख्याने वसत असलेले पार्सी लोक होत.

प्राचीन इतिहास व भाषाशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना हे माहीत आहे की, ईराणचे लोक आर्यवंशीय आहेत. आपल्याला ते आर्य व आपल्या भाषेला ते आर्यभाषा म्हणतात. ईराण हा देश लोकसंख्येने लहान असला तरी त्याची संस्कृति, भाषा इत्यादि श्रेष्ठ होती. निरनिराळ्या कलाकोशल्यांत ईराणी लोक अग्रेसरत्व पावलेले होते. भारताच्या बरोबरीनेच ईराणी लोकांनी इसवी सनपूर्व ५५९ पासून साम्राज्य चालविलेले होते. या वर्षी हखामनिश राजवंशाचा सायरस (कुरु) राजा राज्य करीत होता. हखामनिश शब्दाचा उच्चार ग्रीक लोकांनी अकामेनी असा केला. याच वंशात दारयवहू (DARIUS) हा मोठा प्रभावशाली सम्राट (५२१-४८६ इ. स. पूर्व) होऊन गेला. त्याने पर्सिपोलिस (इस्तखर ) या आपल्या राजधानीजवळील एक प्राचीन नेक्रोपोलिस निर्मिला आहे जो पर्सेपोलिसच्या वायव्येस १२ किमी अंतरावर स्थित आहे. 

नेक्रोपोलिस अर्थात कबर स्मारकांसह निर्माण केलेली स्मशानभूमी. हे नाव प्राचीन ग्रीकांकडून आले आहे, ज्याचा शब्दशः अर्थ "मृतांचे शहर" असा होतो.

असो,

येथे दारयवहू राजाने पर्वतावर मोठमोठे शिलालेख कोरून आपले व आपल्या लोकांचे नाव अजरामर करून ठेवले आहे. त्याच्या राज्याचे २२ प्रांत वा सुभे होते. इजिप्तचा भाग, अरबस्थान व सिंध हे त्यांतील विशेष होत. तो आपल्या नक्शे-रुस्तुम येथील शिलालेखात म्हणतो-

 

"मी दारयवहू, मोठा राजा, राजांचा राजा, अनेक राज्ये व वंश यांचा राजा या मोठ्या आणि विस्तीर्ण भूप्रदेशाचा राजा, विस्तास्प याचा पुत्र, हखामनिश राजवंशात जन्मलेला पर्सदेशवासी (पार्सेय ), पार्सेंयाचा वंशज, आहे. मी एक आर्य आहे, मी आर्यवंशात जन्मलेलो आहे.'


दारयवहूच्या लेखाची भाषा अवेस्ता अर्थात प्राचीन फार्सी म्हणून ओळखली जाते. दारयवहू स्वतःला व आपल्या वंशाला आर्य म्हणतो. क्षत्रिय म्हणजे राजा. दारयवहूच्या या शिलालेखाचा डॉ. होडीवाला यांनी केलेला संस्कृत अनुवाद असा-


अहं दारयवहुः, महान् क्षत्रियः, क्षत्रियाणां क्षत्रियः, क्षत्रियः बहुराज्यानां वंशानां च, क्षत्रियः अस्य महाविस्तीर्णभूमेः, विश्तास्पस्य पुत्रः, हखामनिशियः,

पार्सेयः, पार्सेयपुत्रः, आर्यः अहम् । आर्यवंशजातः अहम् ।


हिंदु आणि ईराणी हे एकाच आर्यवंशाच्या दोन शाखा आहेत. या दोन गटांची भाषा, संस्कृति, रीतिरिवाज इत्यादि प्राचीनकाळी एकच होती. कालान्तराने हे गट जीवन साधनांकरिता वेगळे झाले. भारतातील आर्यांचे लिखित उल्लेख हे आयवंशातील प्राचीनतम लेख होत. त्यांच्या मागेमागे ईराणी आर्यांचेही लिखित उल्लेख आहेत. हिंदूंचे वेद आणि ईराणी वंशाचा अवेस्ता हे ग्रंथ आर्यवंशाचे प्राचीनतम सांस्कृतिक तोंडवळे होत. हिंदु, ईराणी लोक हे स्वतःला आर्य म्हणवून घेतात. ही आर्य म्हणवून घेण्याची ऐतिहासिक परंपरा निश्चित रूपाने गेल्या ३ हजार वर्षांची तरी आहे. शिलालेखनाची कला आर्यवंशीय ईराणी लोकांनीच सर्वप्रथम स्वीकारली असे आढळून येते. 

दारयवहूने अनेक एकप्रत्तरस्तंभ (Monolith Pillar) उभारले होते. त्या स्तंभावर शिरोभागी चौकोनी शिखरभूत भागावर चार सिंहांच्या आकृति कोरलेल्या आहेत. असे एकप्रस्तरस्तंभ ईराणात जागोजागी आजही उभे असलेले दिसून येतात. भारताने मानचिन्ह म्हणून स्वीकारलेला धर्मचक्रांकित स्तंभ सम्राट अशोकाने उभारलेला होता. दारयवहूनंतर साधारणतः दोनतीनशे वर्षानंतर अशोक झाला होता. अशोकाने दारयवहूच्या कोरलेल्या लेखांची कीर्ति ऐकून आपले शिलालेख कोरविले असा विद्वानांचा कयास आहे. दारयवहूचा प्रस्तरस्तंभ पाहूनच अशोकाने आपले स्तंभ उभे केले असेहि काही विद्वान मानतात. याशिवाय इराणचे भारतातील रामायण महाभारत आदींशी त्याचे असणारे साम्य हासुद्धा संस्कृतिक समानता दर्शवणारा एक धागा आहे.

ईराणात इ.सन १९२१ च्या सुमारास रजाशाह पहलवी याची राजवट सुरू झाली. 

रजाशाह पहलवीने या चंद्रमानावर आधारित हिजरी कालगणनेत सौरमानाधिष्ठित नवीन सुधारणा केली. या सौर हिजरीचे वर्ष सौर कालगणनेप्रमाणे २१ मार्च रोजी सुरू होते. ही ईराणी व भारतीयांची प्राचीन वर्षप्रतिपदा होय. याच दिवशी भारतात वसंतोत्सव किंवा गुढीपाडवा व ईराणात नौ - रोज जशन होत असे.

याशिवाय,

रजाशाह पहलवी याच्या मुलाने- मोहम्मद रजाशाह पहलवी याने लावलेल्या अनेक बिरूदांपैकी 'आर्यमेहेर' अर्थात 'आर्यांचा प्रकाश' अशी एक पदवी होती. एकूणच समान सांस्कृतिक सहसंबंध जोडणारा हा विषय आहे.

असो, पर्शियन भाषा ही इस्लामी राष्ट्रांनी स्वीकारली असली तरीही ती इस्लामी नाही.! महाकवी फिरदौसीने पर्शियन भाषा आणि संस्कृती आपल्या काव्य ग्रंथात जोपासली आहे. रूप बदलले तरी हिंद भूमीच्या बंधुत्वाचा इतिहास आहे, म्हणूनच तिला समजण्याचा आणि आत्मसात करण्याचा अट्टाहास आहे..! पूर्वजांना जोडणारा तो दुवा आहे..!


-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts