Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

महाकवी नुस्रतीचा शिवकालातील शब्दालंकार

 



आलीनामा' या ग्रंथाचा महाकवी नुस्रती हा शिवछत्रपतींचा प्रतिस्पर्धी विजापूरचा द्वितीय आली आदिलशहा याच्या पदरी राजकवी होता. त्याने आपल्या ग्रंथात आदिलशाही बरोबरच मोगलशाही आणि शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या गडकिल्ल्यांचा सुद्धा उल्लेख केला आहे. कवींद्र परमानंद यांच्या संस्कृत काव्यातून(शिवभारत) गड-मोहिमांचे अप्रतिम वर्णन वाचायला मिळते तसेच सभासद व इतर बखरीतूनही मिळते. मात्र नुस्रतीची शैली काही औरच आहे. 


मराठ्यांच्या तेजतर्रार सैन्याचे आणि शौर्याचे बहारदार वर्णन करताना तो म्हणतो-

"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याश गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." 

पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."


औरंगजेबाचे नांव न घेता वर्णन करताना तो म्हणतो-


ठगाने च दुनिया कू मादर कहें


छिपा लोड ज़ाहिर हों ख़ाहिर कहें। बदी बाप सूं अपनी मीरास जान


विरादर का खू शीरे-मादर पछान देखे कुच है जां फाईदा आप कू


न छोडे सगे भाई हौर बाप । ।


अर्थात-

फसविण्यासाठीच मोगल जगाला आई म्हणतो. बाजूचा लोड लपवून उघड असलेल्या गोष्टीला तो बहीण म्हणतो, बापाशी दुष्टता करणे, हा आपला वारसा आहे व आईचे दूधच म्हणून भावाचे रक्त पिणे हा आपला धर्म आहे असे तो समजतो. जेथे त्याचा फायदा असेल, तेथे तो आपल्या सख्या भावाला व बापालाहि सोडीत नाही.


नुस्रतीने महाराष्ट्रातील सिंहगड, पुरंदर व पन्हाळा या गडांची अप्रतिम वर्णने केली आहेत. त्यांने दिलेले दाखले पार मिस्र आणि नाईलचे आहेत.

पुरन्दर किल्ल्याचे वर्णन पाहा- 

(अध्याय २२.४ ते ८)


सिवा का च यक गड जो अवगड अथा 

बुलंदी में अफलाक ते चड अथा | २२.४


देखत जिस की वसअत कहा दूर-बीं

फलक सिर पो ले ज्यूं खडां है जमीं । 


बसन्त गड पो चौ- गिर्द हो बे-करां

दिसे ज्यूं हवा पर बसे एक जहां। 


लगी हर गली अब अदिक सलसबील

हर यक ठार यक मिस्र यक रूदे-नील। 


उतर कर सरग ते कधी इंद्र आए

इसी गड पो रह वक्त अपना गमाए । २२.८


अर्थात-

शिवाजीचाच तो एक अवघड गड होता. तो ऊंचीमध्ये आकाशापेक्षा श्रेष्ठ होता. दूरस्थ पाहाणाऱ्याला त्याची विशालता पाहून असे वाटे की पृथ्वी डोक्यावर घेऊन जणू आकाश उभे आहे.! 

वसन्त ऋतु गडावर चोहीकडे मुसमुसत असतो, तेव्हां असे वाटते की हवेत एक दुसरेच जग वसलेले आहे. 

(गडावरील) प्रत्येक गल्लीत पाण्याचा उत्तम प्रकारचा कालवा वाहात आहे. प्रत्येक ठिकाण मिस्र-ईजिप्तसारखे संपन्न आहे. प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहात आहे. इंद्र स्वर्गातून उतरून, अधून मधून याच गडावर राहून, आपली सुखकालक्रमणा करीत असतो.

-आलीनामा: नुस्रती,दक्खनी हिंदीतील इतिहास


कवी आणि त्याचे काव्यालंकार कसे वैविध्यपूर्ण असतात, कवी परत्वे त्याची चव कशी बदलत जाते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शिवकालातील अनेक कवींमध्ये महाकवी नुस्रतीचेही एक विशिष्ट स्थान आहे.

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts