Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

"बाजीरावचा गोटा"


मित्रांनो,

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या तालुक्यातील हिवरा आणि परिसरात एक लोक कथा नांदते.

हिवरा या गावाच्या बाहेर एका डोंगरावर असलेल्या भव्य शिळेला 'बाजीरावचा गोटा' म्हणून संबोधले जाते. असे समजल्यावर वाटले,

काय खरंच प्रत्यक्ष बाजीराव पेशवा या भागातून गेले आणि कुठेतरी थांबले.? 

मित्रांनो, इतिहास जगायचा असेल तर भूगोल गाठावा लागतो.!

आणि म्हणून तोच इतिहास जाणन्यासाठी मी, माझे मित्र देवेंद्र देशपांडे आणि चि.रोहित खरात असे हिवरा येथे दाखल झालो.


हिवरा खुर्द-

हिवरा हे गाव अमडापूर ते जानेफळ या रस्त्यावर अमडापूर पासून आठ किलोमीटर तर जानेफळ पासून पाच किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

खुर्द अर्थात नवीन वसाहत. तसे या गावाला 'हिवरा बाजी' असे म्हणण्याचे वळण पडले ते बहुदा येथून बाजीरावच्या गोट्याकडे जाण्याचा मार्ग आहे म्हणून.!

असे हे लहान वस्तीचे गाव असून गावात जुन्या ठेवणीतील काही वाडे दिसत होते. नजर भिरभिरत होती त्यांच्या उंच खानदानी भिंतीवर, अक्कडबाज दरवाज्यावर, त्यावरील पारंपरिक गवाक्षावर.. मन शोधीत होते मराठेशाहीच्या कालखुना.. बाजीरावांच्या घोड्याच्या टापसूना.!!!

असो,

येथील स्थानिक डॉ. हनुमान लाहोटी यांच्या कडे जाऊन प्रथम माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. गावातील जुन्या जाणत्यांना त्यांनी बोलावून घेतले. त्यांच्या अनूभवी डोळ्यातून इतिहास मिळवण्याचा प्रयत्न मी करत होतो. पण फार काही साध्य झाले नाही. माळावर बाजीराव चा गोटा आहे हे आम्ही पूर्वापार ऐकत आलो एवढीच माहिती त्यांच्याकडून मिळू शकली.

असो, आता प्रत्यक्ष स्थळाकडे गेले पाहिजे.!

मार्ग-

बाजीराव च्या गोट्याकडे जाण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडील श्याम दहिभाते यांना सोबत दिले.

येथून बाजीरावाच्या गोट्याकडे जाण्यासाठी कच्च्या मार्गाने जावे लागणार होते. दोन किलोमीटर अंतरावर पर्यंत 'अंबाशी' या गावापर्यंत फोर व्हीलर कच्च्या रस्त्यावरून जाऊ शकत होती. मात्र अंबाशी या गावापासून पुढील रस्ता अतिशय खडतर आणि डोंगर कपारीचा आणि अरुंद असल्याने मोटरसायकलनेच जाणे शक्य होते.

याप्रमाणे आम्ही श्याम दहिभाते यांच्यासोबत अंबाशी या गावात पोहोचलो. हे सुद्धा जुने गाव आहे आणि त्याचा इतिहासही काही औरच आहे. खरेतर डांबरी रस्ते झाल्यामुळे येथील वसाहत रोड नजीक निर्माण झाली ती हिवरा खुर्द! आज या गावाला हिवरा गावाचा एक वार्ड म्हणून मान्यताप्राप्त आहे. मात्र मध्ययुगीन दळणवळण रस्त्यावरील हा एक प्रमुख गाव असल्याचे तेथील पांढरीच्या तटबंदीवरुन आणि आजही अस्तित्वात असलेल्या जमिनीतील धान्याच्या पेवांवरून समजते.

असो,

श्याम दहिभाते यांनी दोन मोटरसायकल ची व्यवस्था केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

मोटर सायकलवर स्वार होऊन आम्ही बाजीराव च्या गोट्याकडे सुसाट निघालो. गाडी रस्त्यावरून आणि मन इतिहासाच्या वाटेवर सुसाट दौडत होते. मात्र जसजशे पुढे जाऊ तसा रस्ता कठीण होत चालला. काही ठिकाणी मोटरसायकलवरून उतरून पायी चालावे लागत होते. पण मन रस्त्यात नव्हते. वेध इतिहासाचे होते. वेड म्हटलं तरी चालेल.!

मनात फक्त एकच प्रश्न काय खरंच बाजीराव पेशवे इकडे आले असतील..?? 

असो,

डोंगर चढून गेल्यावर उंच डोंगरावरून खाली पाहिल्यावर दूरवर लयदार वळण घेणारी मन नदी आणि त्यावरील धरणाचे अगदी छोटेसे दृश्य दिसत होते. धरणा शेजारी असलेला गाव सारंगवाडी आता अस्तित्वात नव्हता. काही पडके बुरुज आणि उजाड जोते राहिले होते.

असो,

डोंगराच्या कडेकडेने चालत जाऊन थोडं डोंगर उतरणीला लागलो. पुन्हा दुसरा डोंगर चढून गेल्यानंतर एका उंच ठिकाणी एक प्रचंड मोठी शिळा डोंगराच्या अगदी कड्यावर अलगत मांडावी तशी दिसली. हिच प्रचंड शिळा म्हणजे 'बाजीरावचा गोटा' असे श्याम दहिभाते यांनी सांगितले.! तेव्हा पाहून आश्चर्य वाटले!!


बाजीराव चा गोटा.??

प्रस्तुत शिळा अगदी निसर्गतः त्या ठिकाणी होती. त्यावर कोणतेही कोरीवकाम अथवा घडाई केलेली नव्हती. त्याला पाहून वाटले खरेच बाजीराव इतक्या दूर आले असतील..?

आणि जर आलेच तर या एका सामान्य पत्थरावर विराजमान झाले असतील..?

केवळ अशक्यच !! 

नाही..?

अशक्य नाही मित्रांनो, हे शक्य आहे.!

कसे.? तर सांगतो..


शक्यता-

-मराठ्यांनी मुघल बादशहा कडून दक्षिणेच्या सहा सुभ्यांमधून चौथ वसुलीचे आणि सरदेशमुखी चे अधिकार मिळवले होते. त्यासाठी शाहू महाराजांचे सेनापती विविध भागात चौथ वसुली करत. त्या सुमारास बाजीराव या मुलखात चौथ वसुलीसाठी थांबले असावे. गावातील लोक बाजीरावांनी येथे बसून सारा वसुली केल्याचे बोलतात.

-बाजीराव पेशवे सन १७२४ च्या साखरखेर्ड्याच्या निजाम-मोगल लढाई मध्ये निजामाच्या बाजूने उतरले होते. त्यासाठी साखर खेर्ड्याच्या मुलूखात त्यांची छावणी होती. कदाचित त्याच सुमारास थोरले बाजीराव या बाजूने जात असता येथे थांबले असावे.

डोंगरावर त्यांची छावणी आणि पायथ्याशी सारंग वाडी गाव. गावातील वतनदार मंडळी भेटीसाठी आली आणि हवेशीर उंच या शिळेवर त्यांनी बैठक मारून राजकीय चर्चा केली. बाजीरावांच्या जाण्यानंतर प्रस्तुत शिळा 'बाजीरावचा गोटा' म्हणून प्रचलित झाली.


-आता प्रश्न असा की बाजीराव पेशवे इकडे कसे आले..?

तर त्याबद्दल असे सांगता येईल की आज या ठिकाणी येण्यास कच्च्या रस्त्याने यावे लागते. म्हणून शंका येते की बाजीराव इतक्या अंतर्गत आड मार्गाने कशाला जातील.

पण आजचे प्रमुख डांबरी रस्ते हे पूर्वी नव्हते. जुने दळणवळणाचे रस्ते बऱ्याच प्रमाणात बदलले आहेत.

प्रस्तुत ठिकाण हे अगदी आत आड मार्गी असले तरीही पूर्वी येथे गाव होता आणि येथून तत्कालीन दळणवळणाचा रस्ता बाळापूर, पातूर अशा प्रमुख शहरांकडे जात होता.

म्हणून बाळापूर पातूर अशा प्रमुख ठाण्याकडे जाण्यासाठी किंवा तिकडून खामगाव मार्गे खानदेशात पुढे माळवा प्रांतात जाण्यासाठी असलेल्या या मार्गावरून बाजीराव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


-बाजीराव पेशवे याच मार्गावरून का जातील..?

प्रस्तुत ठिकाण हे सारंग वाडीच्या डोंगरावर आहे आणि सारंगवाडी वरून तत्कालीन दळणवळणाचा रस्ता होता असे मानल्यावर बाजीराव याच मार्गावरून का जातील असाही प्रश्न निर्माण होतो.

त्याबद्दल असे सांगता येईल की-

बाजीराव पेशवे यांना निजाम आणि शाहू महाराज यांचे कडून विदर्भातील काही गावांचा मोकासा मिळाला होता. शाहू महाराजांकडून मिळालेले ही मोकासा जागीर म्हणजे तनखा जागीर होय. त्यामध्ये तत्कालीन बाळापुर परगण्यातील मौजे सस्ती आणि मौजे खेटरी (अकोला जिल्ह्यातील) काही गावे तर गेरूमाटरगाव (बुलढाणा जिल्ह्यातील) अशी काही गावे बाजीरावांची मोकासा जहागीर होती. म्हणून कदाचित आपल्या जहागीर इकडे जाण्यासाठी बाजीरावांनी सारंगवाडी- देऊळगाव साकर्शा तेथून आंबेटाकळी- बाळापूर,शहापूर आणि पुढे खेटरी व सस्ती. असा मार्ग निवडला असावा. 

किंवा तिकडून या मार्गाने सारंगवाडी हून बुलढाणा जिल्ह्यातील आपले जहागिरीच्या गावांकडे व पुढे माळवा प्रांताकडे बाजीराव गेले असावे.

आणि म्हणून गावातील सामुग्रीची व्यवस्था आणि नदीमुळे पाण्याची व्यवस्था असल्याचे पाहून मध्यंतरीचा मुक्काम बाजीरावांनी सारंगवाडी गावाच्या या माळावर केला असावा.

सारंगवाडी जवळून वाहणारी मन नदी सुद्धा पुढे शहापूर बाळापुर कडे वाहत जाते.


अर्थात सारंगवाडी वरून देऊळगाव साकर्शा-आंबेटाकळी आणि तेथून एका मार्गाने शहापूर तर दुसऱ्या मार्गाने बाळापुर असे जाण्याचा हा तत्कालीन दळणवळणाचा शॉर्टकट मार्ग कदाचित बाजीरावांनी निवडून या मार्गावर प्रवास केला असावा आणि या माळावरच्या डोंगरावर छावणी केली असावी.

येथेच या नैसर्गिक आसनावर बसून बाजीरावांनी लोकांशी वार्तालाप केला असावा. त्याच स्मृति सारंग वाडी आणि परिसरात आजही दरवळतात 'बाजीरावचा गोटा' म्हणून !

मित्रांनो,

बाजीरावांच्या अनेक कथातून त्यांच्या साध्या राहण्याची आणि दिव्य पराक्रमाची जाणीव होऊन जाते. मोहिमेवर असताना बाजीराव शांतपणे शाही इतमामात छावणी करून छप्पन भोग घेत असे चित्र इतिहासात सापडत नाही. उलट आपल्या संघर्षमय आयुष्यात हिंदुस्तानभर मराठा साम्राज्याचा ध्वज फडकवणाऱ्या महा योद्ध्याने चालत्या घोड्यावर भाकरी खाऊन मोहीम फत्ते केल्याचे इतिहास चित्र आपणास ठाऊक आहे.

म्हणून आपल्या मोहिमेदरम्यान सारंग वाडीच्या माळावरील मुक्कामात बाजीराव पेशवे या सामान्य शिळेवर बसले असतील तर नवल काय..?

अखिल हिंदुस्तानात तमाम स्वराज्य शत्रूंना परास्त करणाऱ्या शौर्य निधी बाजीराव पेशवा म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा आणि मराठेशाहीचा सिंह.! असा सिंह जेव्हा एका सामान्य दगडावर बसतो तेव्हा तो एक सामान्य दगड उरत नाही.!!! म्हणून हे शौर्यनिधी आपल्या या वीरासनास आमचा मानाचा मुजरा.!!!

सारंगवाडी हा गाव आज नामशेष झाला असला तरी बाजीरावांच्या स्मृति आणि त्यांची निसर्गदत्त बैठक इतक्या वर्षानंतरही कायम आहे.!

शौर्यनिधी बाजीराव पेशवा यांच्या जंगबाज स्मृतीस मानाचा मुजरा.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

हिवरा-भौगोलिक स्थान-click here


या सफरीचा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा-

Comments

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts