Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

इतिहासाच्या काळजातून अमडापूर-

 


अमडापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील प्राचीन गाव. येथील अनेक मंदिरातून, भंगलेल्या अवशेषातून आणि तलावातून इतिहास प्रकट होतो.!

अंबिकेश्वर (शिव) मंदिर-

अंबडापुर गावाच्या लव्हाळा मार्गावर डाव्या बाजूस हे मंदिर आहे. हे शिवाचे यादवकालीन हेमाडपंथी मंदिर असून समोर प्रचंड मोठा नंदी भग्नावस्थेत आहे. आवारामध्ये सभामंडपाचे अवशेष पडलेले आहेत. शेजारीच एक पाय विहीर आहे जिचे द्वार बुजविण्यात आले आहे. मंदिराचा सभामंडप असावा. कारण मंदिराला प्रवेशद्वार नसून तो अंतराचा भाग आहे हे स्पष्ट जाणवते. अंतराळामध्ये दोन्ही बाजूने देव कोस्तके आहेत. एका कोष्टकात सती स्टोन ठेवलेला आहे. मंदिराच्या द्वारा शाखेवर दोन्ही बाजूस अर्धस्तंभ, कीर्तिमुखे आहेत. स्तंभाच्या वरील भागात छताचे भारवाहक कीचक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे द्वाराच्या वर देवनागरी शिलालेख!

प्रस्तुत शिलालेखांचे वाचन वा.वी मिराशी यांनी केलेले आहे. त्यानुसार-

शके ११३३ (इ.स. १२११-१२१२) मध्ये श्रीमत् प्रताप चक्रवर्ती सिंघणदेव याच्या प्रभावी कारकीर्दीत देउनायक(प्रादेशिक अधिकारी) हा अमडापूरच्या सभोवतालच्या प्रदेशाचा राज्यपाल होता. या वर्षी, प्रजापती संवत्सर असताना अमडापूरनिवासी पदुमन (प्रद्युम्न) सेठी'(व्यापारी) याने बांधलेल्या मंदिरात (कीर्तन) भाईदेवपुत्र मंगल या व्यक्तीने तोरण बांधले.

संदर्भ-मिराशी, वा. वि., इ. आय., खंड २१, पृ.१२७-१२८, १३१-१३२. 

विशेष म्हणजे हा वऱ्हाड प्रांतात सापडलेला यादवांचा पहिला शिलालेख आहे.

अंबिकेश्वर मंदीर

अंबिकेश्वर मंदीरातील यादवराजा सिंघणदेवाचा लेख


बल्लाळी देवी-

अंबिकेश्वर (शिव) मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर बल्लाळी देवीचे विस्तीर्ण मंदिर आहे. 

देवीच्या प्रमुख मंदिरासमोर लहान मंदिर बांधून त्यामध्ये अनेक देवी देवता प्राचीन मूर्ती ठेवलेल्या आहेत.

पेशवाईच्या कालखंडात प्रस्तुत देवस्थानाची व्यवस्था पेशव्यांतर्फे खंडो बल्लाळ यांच्याकडे लावण्यात आली. म्हणून या देवीस बल्लाळी देवी असे संबोधले जात असावे. परंतु आज येथे बल्लाळ कुटुंब राहात नाही. येथील ट्रस्ट मध्ये सुद्धा त्यांचे नाव नाही. ते कुटुंब बुलढाणा स्थायिक झाल्याचे लोक सांगतात.

असो,

खरेतर देवीच्या प्रमुख दगडी मंदिरासमोर इतर देवी-देवतांच्या मंदिरांचा समूह असावा. 

प्रस्तुत मंदिराच्या समोर दगडी अवशेष ठेवलेले आहेत. त्यामध्ये देवीच्या पावलांची जोडी खंडीत अवस्थेत आहे. पावलांवर सुंदर रेखीव पैंजण कोरलेले आहेत. त्यावरून अनुमान काढता देवीची मूर्ती पन्नास फूट असावी, हे बघता क्षणी कुणीही सांगू शकेल. शेजारी देवी चे हात आहेत. एका हातात खड्ग(खंडित) आणि दुसऱ्या हातात लाडू असे आहे.

प्राचीन काळी यादवांकडून बांधण्यात आलेल्या या मंदिर समूहामध्ये प्रस्तुत देवीची मूर्ती म्हणजे किती मोठे आकर्षण असेल.? यादवांनी प्रस्तुत तिर्थ क्षेत्रा साठी प्रचंड खर्च केला असेल. यादवांवर अखेर समयी खीलजी आणि मलिक काफुर यांची आक्रमणे झाली. या सुमारास मंदिरातील संपत्ती लुटणे आणि 'बूतशिकन' म्हणून मुर्त्यांवर अत्याचार करणे हा शिरस्ता होता. हा तत्कालीन चष्मा आहे!

असो,

मंदिर समूहामध्ये शिवमंदिर- नंदी व बिजपुरक घेतलेला गण, बालाजी मंदिर, शेजारी मंदिराचे स्तंभ, द्वार शिल्प यांचे अवशेष आहेत.

भैरव मंदिर-गळ्यात मुंड माळ आणि वाहन कुत्रा स्पष्ट दिसतो, सप्तमातृका आणि गणेश, गज शिल्प याशिवाय इतर अनेक शिल्पावशेषांनी हा परिसर व्यापलेला आहे. त्यावरून प्रमुख देवीच्या मंदिरा शिवाय येथे मंदिर समूह असावा असे स्पष्ट अनुमान काढता येते. देवीचे प्रचंड रूप तिच्या पावलांमध्ये सामावलेले आहे.. आणि आजूबाजूची देव शिल्पे क्वचित ब्रह्मांडाचा भास निर्माण करतात.! इतिहासातून अवकाशात जाता येते, तो हाच अनुभव!!

बल्लाळी देवी


देवीच्या चरणांवरून मूर्तीची उंची पन्नास फूट असावी

सप्तमातृका आणि गणेश

बालाजी

भैरव मुर्ती


शिव मंदिर आणि दगडी मंडप-

अमडापूर मध्ये नदीकाठी चिखली रस्त्याने जाताना डाव्या बाजूस सतराव्या शतकातील मंदिर आणि दगडी मंडप आहे. प्रस्तुत मंदिर शिवाचे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करून ते मध्ययुगीन बनावटीचे असल्याचे त्याच्या चार कोपऱ्यावरील मिनार सदृश्य स्तंभा वरून आणि कमानी वरून जाणवते. अर्थात प्रस्तुत मंदिर हे यादव काळातीलच आहे.!

या मंदिराची पायरी ही पायरी नसून कुणीतरी विष्णू मूर्तीचे पीठासन ठेवलेले आहे. येथील विष्णू मंदिर नष्ट झाले असावे. आणि ज्या पीठ आसनावर विष्णुमूर्ती ठेवली जाते त्या पीठासनावर गरुड कोरलेला असतो. प्रस्तुत शिव मंदिराची पायरी हे कनी- पीठ प्रकारातील आसन असून त्यावर गरुड शिल्प कोरलेले आहे. यावरून येथे सुद्धा मंदिर समुह असावा. त्यातील विष्णू मंदिर नष्ट झालेले आहे.! 

याशिवाय आवारात बरेच वीरगळ आणि मंदिराचे अवशेष पडलेले आहेत. येथील नंदी सुद्धा आकाराने मोठा आहे. 

शिव मंदिर: पायरी हे श्री विष्णूचे पीठासन आहे

प्राचीन दगडी मंदिराचा जिर्णोद्धार


दगडी मंडप: मंदिराच्या समोरील चौथरा उतरल्यानंतर नदी कडे जाताना एक प्राचीन चार दगडावर मांडलेला मंडप दिसतो. प्राचीन काळी नदीच्या काठावर मंदिर तसेच होम हवन विधी करण्यासाठी मंडप नियोजित असे. आता या मंडपामध्ये शिवपिंडी आहे. 

मंडपाच्या भव्य शिळा कशा रचल्या असाव्यात..? याशिवाय तत्कालीन स्थापत्य शास्त्र इतके जास्त अवगत होते की निर्माण कार्यात गणितीय अचूकता, भूमितीय बद्धता आणि गुरुत्वाकर्षण शक्यता अशी हाताळली गेली की साधारणपणे आठशे वर्षा नंतरही ह्या वास्तु येथील इतिहासाची व्यापकता, वैज्ञानिकता आणि नैतिकता थंड मनाने विकृतीचे घाव सहन करत प्रतीक्षेत आहेत आपल्या सर्वांच्या..!!!


... पाषाणाचे खडे, त्यावरील नक्काशीचे वेढे, किर्तीमुखाचे डोळे, वीरगळीतील घोडे, मंदिराजवळील जलस्रोतांचे खळे आणि मातेश्वरी च्या पावलावरील पैंजणाचे जिवंत जोडे आदी मध्य आणि अंताचा प्रवास घडवून आणते.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।



Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts