Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

शेंदुर्जन-इतिहासाच्या जबानीतून



साखरखेर्डा येथून दुसरबीड रस्त्याने नऊ किलोमीटर अंतरावर शेंदुर्जन हे लहानसे गाव आहे.

या गावातील विशेष वास्तू म्हणजे येथील कुंड, देशमुख घराण्याची गढी आणि वाडा.

ही गढी गावाच्या मधोमध स्थित असून सर्व बाजूंनी तटबंदीयुक्त आहे. मात्र तटबंदी जीर्णशीर्ण झालेली आहे. गढीचा आकार साधारणपणे १८० फूट औरस चौरस असून चार कोपर्‍यावर चार गोलाकार बुरुज आहेत. तटबंदीची रुंदी साधारणपणे ७/८ फूट एवढी आहे.

गढीचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. गढीच्या आतील भागांमध्ये सर्वत्र दाट झाडी वाढल्याने मुक्त वावर करता येत नाही. गडीच्या आत पाण्याची विहीर आहे. पूर्वी आत बरीच घरे होती. आता ती नष्ट झाली आहेत.

पूर्वी गोपाळराव देशमुख हे आपल्या वतनाचा कारभार गढी मधून करत असत. त्यांच्या पश्चात एकोणिसाव्या शतकात उत्तमराव देशमुख हे प्रसिद्धीस आले. त्यांनी आपल्या गावावर पडलेले अनेक दरोडे यशस्वीरीत्या परतवून लावल्याने त्यांना दोन पिस्तुले गौरवार्थ मिळाली होती.

त्यांनी गढीच्या शेजारी विस्तीर्ण वाडा बांधून पुढे वाड्यात वास्तव्य केले. 

या दुमजली वाड्याचा पाया चिरेबंदी दगडाचा आहे. वाड्यासाठी मध्यप्रदेशात इटारसी येथून उत्तम प्रतीचे लाकूड आणले गेले. या वाड्यातील नक्षीदार लाकडी खांब आणि संपूर्ण लाकडी बनावटीचे छत आकर्षक कलावस्तू आहे.


वाड्याच्या मधोमध झरोका आहे. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. ते मोठे लाकडी असून त्यावर श्री गणेश कोरलेला आहे. दारातून आत गेल्यावर डाव्या बाजूस उत्तमरावांची बैठकीची खोली आहे. 

उत्तमराव देशमुख हे रामानंद महाराज (रामदासी) यांचे शिष्य होते. अर्थात साखर खेड्याचे प्रल्हाद महाराज आणि उत्तमराव देशमुख हे गुरुबंधू.!

याच वाड्यात रामानंद महाराजांचे अधून मधून वास्तव्य असे. वाड्यातील एका लाकडी दिवानावर त्यांची बैठक असल्याचे देशमुख सांगतात. 

रामानंद महाराजांच्या भक्तीत विलीन होऊन उत्तमरावांनी आपली सर्व जमीन जुमला व मालमत्ता महाराजांना अर्पण केली, परंतु महाराजांनी प्रसाद म्हणून त्यांना ती परत दिली. या घटनेचा उल्लेख रामानंद महाराजांच्या आरती मध्ये केलेला आहे-

...

राजाने अर्पिली संपदा मुळि नच ती घेसी। 

उत्तम धनवंताने सर्वहि अर्पियले तुजसी। 

सर्वहि माझे समजुनि तुम्ही उपभोगा म्हणसी 

समर्थापरी वैराग्यचि हे दिसले जनतेसी 

याशिवाय प्रसिद्ध कवी ना.ग. देशपांडे यांचे हे आजोळ. उत्तमराव देशमुख हे ना.ग. देशपांडे यांचे मामा. त्यांचे प्राथमिक शिक्षण येथे मामाकडेच झाले. सध्या देशमुख घराण्याचे वंशज श्री राजू भाऊ देशमुख हे या वाड्याची देखभाल करतात. त्यांनी पूर्वजांची शस्त्रे आणि भांडी जतन करून ठेवली आहेत.

गावाच्या बाहेर पाण्याचा कुंड आहे. तो बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असून त्याला तीन बाजूने पायऱ्या आहेत. याला लोक 'सितान्हानी' संबोधतात. शेजारीच तीन लहान हेमाडपंथी मंदिर आहेत. मंदिराच्या आवारात भग्नमूर्ती शिल्प आणि मंदिराचे स्तंभ ठेवलेले आहेत. यावरून पूर्वी येथे मंदिर समूह असावा असे वाटते. 



मंदिराच्या दुसऱ्या बाजूस एक वीरगळ ठेवलेली आहे. वीरगळ भग्नावस्थेत आहे. त्यावर कैलासाचे प्रतीक शिवपिंडी आणि मनुष्य अशा आकृत्या दिसतात. गावाच्या इतिहासात कुणी पुरुष वीरगतीस गेल्याचे ते प्रतीक आहे. जो कोणी असावा त्या वीर पुरुषाचा गौरवशाली इतिहास वीरगळीच्या माध्यमातून जिवंत आहे.

असो,

असा या गावाचा एकूण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. जो आम्हास कधी पुराणकाळ, तर कधी सरंजामशाही, तर कधी गुरुभक्ती असा प्रवास घडवून आणतो. !

इतिहास व्यक्त होतो तो येथील हेमाडपंथी मंदिरातून आणि तग धरून राहिलेल्या कुंडातून, वीर पुरुषांच्या वीरगळीतून, एका घराण्याच्या भव्य वृद्ध वाड्यातून, वाड्याच्या नक्षीदार लाकडातून, खानदानी तलवार अन् परशुतून, भव्य अजस्रकाय गढीतून आणि काळाने झिजवलेल्या तटबंदीतून, निर्विकार बघणाऱ्या तटबंदीच्या पाषाणातून आणि बुरुजाच्या पांढऱ्या मातीतून..! बोलो पाहते हर एक घटना निर्जीव वाटणाऱ्या घटकातून.!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।


Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts