Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

सह्याद्रीच्या खोऱ्यात वास करणारी एक बलिदान कथा चित्तोडच्या घराण्यातली..

 


मेवाडच्या राजघराण्यातील एका बलिदानाची कथा सर्वश्रुत आहे. चित्तोडचा महाराणा संग्राम सिंग यांच्या मृत्युपश्चात चितोडच्या गादीसाठी अंदाधुंदी माजली. संग्रामसिंगाचा एक दासीपुत्र बलबीर लहानग्या उदयसिंगाला ठार मारून सिंहासन काबीज करण्याच्या तयारीत असतो पण पन्नादाई ही आपल्या मुलाला पाळण्यात ठेवून, त्याचा बळी देऊन छोट्या उदयसिंगला वाचवून राजवाड्याबाहेर काढते. पुढे ती कुंभलगडाचा आश्रय घेते आणि महाराणा संग्राम सिंहाचा वंशज पुनश्च मेवाडच्या गादीवर विराजमान होतो.

उदयसिंग- महाराणा प्रतापाचा पिता पुढे उदयपूर वरून राज्य करू लागतो.

अशीच एक बलिदानाची कथा सह्याद्रीच्या खोऱ्यात वास करते...

कारीचे जेधे वतनदार घराणे, ज्यांची निष्ठा शिवशंभु प्रती अखंड राहिली, यांच्या घराण्यातील दस्तावेज "जेधे शकावली" हा एक महत्त्वाचा तत्कालीन पुरावाच ठरला, त्याच घराण्यातली एक उदयपूरच्या घराण्याशी समांतर अशी कथा.

कान्होजी जेधे शहाजी महाराजांसोबत कर्नाटकात होते, महाराष्ट्रात पुण्याच्या जहागिरीत स्वराज्य निर्माण करताना शिवाजीराजांना मदत म्हणून शहाजी महाराजांनी जे निष्ठावान पाठविले त्यात कान्होजी जेधे होते.

अफजलखान चालून आला तेव्हा खानाच्या धमकावणी ला न घाबरता आपल्या सर्व पुत्रांसह वतनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ राहणारे निष्ठावान म्हणजे कान्होजी जेधे.!

अशा या कान्होजी यांच्या जन्माची कथा अगदी मेवाडच्या महाराणा उदयसिंग यांच्या कथेशी समांतर आहे..

... कान्होजी जेधे यांचे वडील नाईकजी जेधे हे आपले वतनाचे देशमुख होते. तो कालखंड आदिलशहाचा अर्थात वतनासाठी चाललेल्या भाऊबंदकीचा.!

नाईकजी यांचे बंधू सोनजी आणि भिवजी यांनी असेच वतनाच्या हव्यासापोटी नाईकजी यांची हत्या केली. नाईकजींची पत्नी त्यावेळी गरोदर होती. मात्र तिने वतनाच्या दोन्ही दावेदारांना खंबीरपणे तोंड दिले. सुमारास तिने मुलाला जन्म दिला नाव कान्होजी.!

कान्होजी च्या नावाने तिने सनद तयार केली आणि वतनाचे दोन्ही दावेदार सोनजी आणि भिवजी हात चोळत राहिले...

..नाईकजी हा मारून वतन ताब्यात घ्यावे तर आता त्याचा पुत्र जन्मला, त्यालाही आपल्या मार्गातून हटविले पाहिजे म्हणून त्यांची कारस्थाने सुरू झाली..

मात्र कान्होजीची आई खंबीर मनाची तर दाई हुशार होती. एकदा बाका प्रसंग येऊन ठेपला... कान्होजी असुरक्षित पाहून कान्होजी चे दोन्ही काका त्यांच्या वाड्यावर चालून गेले. मात्र खबर लागताच दाईने मोठ्या हुशारीने लहानग्या कान्होजीला घराबाहेर काढून शेजारच्या देव महालांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. वाड्यात परत येऊन तिने कान्होजीच्या पाळण्यात आपल्या लहानग्या मुलीला गुंडाळून ठेवले.!!!

... रात्रीचा अंधार दाटत होता... सोनाजी आणि भिवजी हत्यारबंद होऊन नागव्या तलवारीनिशी वाड्यात शिरले.. दाईला बाजूला सारले आणि एकच तलवारीने पाळण्यातील लहानग्या जीवावर वार केले. पाळणा रक्ताने लाल झाला...

झाला नाईकजीचा वारसा ठार झाला!!! आता वतन आपलेच!

अशा भ्रमात दोघे बंधू निघून गेले. मात्र दाईने आपल्या बलिदानाने नाईकजी जेधे यांचा वारस जिवंत ठेवला होता.!

इकडे लहानग्या कान्होजीला घेऊन देव महाला हे अतिशय गुप्तपणे कान्होजीच्या आजोळी मांढरदेवास जातात. मात्र मृत्यूच्या भीतीने तेसुद्धा कान्होजींचा सांभाळ करण्यास नकार देतात. मग आता या लहानग्या बाळाचा सांभाळ करणार कोण..? तेव्हा देव महाला कान्होजीला मोसे खोऱ्यात बाजी पासलकरांकडे घेऊन जातात. सर्व व करून कहाणी व्यक्त करतात. कान्होजीच्या वतनाची सनद दाखवतात.. तेव्हा खात्री पटल्यावर पासलकर लहानग्या कान्होजीला आपल्याकडे ठेवून घेतात. पासलकर यांच्या तालमीत कानोजी मोठे होतात. पुढे कान्होजी पासलकर यांचे जावई होतात.

कान्होजीचे वतन भोगणारे सोनोजी आणि भिवजी काका बेमालूम होते. वतनाच्या लालसेत दुष्कर्म करणाऱ्या या दोन्ही काकांच्या डोळ्याची पट्टी उतरवण्यास एक दिवस पुतण्या दस्तुरखुद्द कान्होजी जेधे मोठ्या सैन्यासह वतनाचा ताबा घेण्यासाठी गावावर येऊन धडकले.! आपल्या पित्याचे वतन कान्होजीस परत मिळाले. लहानपणी आपले प्राण वाचवणार्‍या देव महाला यांना कान्होजींनी शेत जमीन इनाम म्हणून दिले. देव महाला यांनी आपला मुलगा कान्होजीच्या सेवेत रुजू केला. पुढे कान्होजीचे पुत्र बाजी जेधे यांच्या तैनातीत देव महाला यांचा नातू जीवा महाला राहिला. तोच जिवा महाला अफजल प्रसंगी छत्रपतींचा अंगरक्षक होता. ज्याने सय्यद बंडाचा हात कापून काढला होता.

असो,

हीच कथा जी कधी चितोडच्या राजवाड्यात घडली होती. पन्ना दाईने आपला पुत्र पाळण्यात ठेवून लहानग्या उदयसिंगला वाचविले होते.

काय वाटले असेल त्या स्त्रीला जिने ममतेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले..!

... इतिहास आम्हाला हेच सांगतो की प्रसंगी मोह त्यागून अर्जुनाने भावांशी युद्ध केले, पन्ना दाईने पुत्र बलिदान देऊन मेवाडचा राजवंश वाचविला, कान्होजीच्या दाईने आपल्या कोवळ्या मुलीचे बलिदान देऊन कर्तव्य प्रमाण मानिले... का तर कर्तव्य हे ही श्रेष्ठ असते.!!!

श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,"तुझ्या हातून घडणारं युद्धासारखं कर्मसुद्धा ‘कर्तव्य व स्वधर्मपालन’ असल्याने त्याचं तुला पातक लागणार नाही."

म्हणून कर्तव्य पालन करताना आपल्याच बाळाला मृत्यूच्या दाढेत ढकलणे हे सुद्धा पातक नसून बलिदान ठरत!

आणि हो इतिहास चक्राकार फिरत असतो,, वारंवार सांगत असतो कारण त्याला ठाऊक आहे एकदा सांगितलं की भागत नाही, मनुष्य वृत्ती बदलत नाही..!

नाईकजीला ठार करून कान्होजीला ठार मारू पाहणारे सोनजी व भिवजी काका, गादीसाठी नारायणरावांचा बळी घेणारे राघोबा काका किंवा महाराणा उदयसिंगाचे ज्येष्ठ बंधू बलबीर... कुठे सत्तेच्या मोहात माणूस आंधळा होतो तर कुठे त्याग आणि बलिदान देऊन निष्ठा आणि कर्तव्याची परिभाषा बोलून जातो..! असा हा इतिहास..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।


Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts