Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

'एक पैसा लोटा और एक रुपया गोता.'

सिकंदर लोदी हा इ. स. १५१० मध्ये दिल्लीस राज्य करीत होता. बापाच्या म्हणजे बहलोल लोदीच्या हयातीत तो कुरुक्षेत्र येथे प्रशासक म्हणून काम पहात होता. त्यावेळी त्याच्या नजरेत कुरुक्षेत्र येथील ब्रह्मसरोवर, स्थानेश्वराचे मंदिर ही सारखी खटकत असत. पर्वणीकाळात हजारो, लाखो लोक येथील सरोवरात स्नान करतात, ह्याचा त्याला राग. कुरुक्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचे हृदयच आहे.

आपल्या शरीराचा एकेक अवयव टाकून देऊन हा प्रदेश विष्णूकडून वसाहतीसाठी कुरू राजाने मागून घेतला म्हणून ह्याला कुरुक्षेत्र म्हणतात. येथील ब्रह्मसरोवराच्या कथा वेदवेदांगाशी आणि पुराण-कथांशी निगडित आहेत. त्या सरोवराच्या जवळ महाभारताचे युद्ध खेळले गेले. युद्धापूर्वी स्थानेश्वर आणि कालिकामाता यांची पांडवांनी दर्शन घेतली. ती देवळे अद्यापी आहेत. कौरवांच्या आणि पांडवांच्या तळांच्या जागा अद्याप शोधून काढता येतात. सरस्वती नदीचा काठ अद्याप आहे. शरपंजरी पडलेल्या भीष्माच्या जवळचे सूर्यकुंड अद्याप आहे.

'हे अर्जुन, रथाचे चाक मला काढू दे,' अशी आर्त ‘हाक' जेथून कर्णाने दिली, ती जागा अद्याप ‘राजा कर्ण का टीला' म्हणून कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या मागे आहे. अभिमन्यू जेथे चक्रव्यूहात सापडला तीही जागा तेथे आहे. जनमेजयाचा सर्पयज्ञही ह्या जिल्ह्यात घडला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याच कुरुक्षेत्रात ज्योती सरोवराच्या काठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. ह्याहून ह्या स्थानाचे महत्त्व आणखी काय सांगायचं ? आणि ही कुरुक्षेत्राची सरोवरे सिकंदर लोदी फोडण्यास निघाला.!


'कुरुक्षेत्र क्या चीज है?'

आपल्याला अनुकूल असलेला निर्णय विद्वान मुसलमानांनी द्यावा, ह्यासाठी त्याने अनेक विद्वानांना बोलावले आणि त्यांच्यासमोर कुरुक्षेत्राची यात्रा मोडून काढावी आणि सरोवरे फोडावी असा प्रस्ताव मांडला. सभेत विद्वानांचे मुगुटमणी मिया अब्दुल्ला अजोधनी हे उपस्थित होते. इतर सर्व विद्वानांनी सिकंदर लोदीला सांगितले की ह्या बाबतीत मिया अब्दुल्ला ह्यांचे जे मत तो आमचा शेवटचा शब्द समजावा. त्यानंतर बादशहा मिया अब्दुल्लाकडे वळला आणि म्हणाला, 'आपले काय मत आहे?' मिया अब्दुल्ला म्हणाले, 'कुरुक्षेत्र क्या चीज है?' म्हणजे कुरुक्षेत्र म्हणजे काय वस्तू आहे? बादशहा म्हणाला, 'अहो कुरुक्षेत्राला एक मोठे सरोवर आहे. येथे गावोगावाचे हिंदू येतात आणि स्नान करतात.' मियां अब्दुल्लाने विचारले, 'ही पद्धत कधीपासून चालू आहे?' बादशाहाने सांगितले, 'ही अतिशय जुनी परंपरा आहे.' यावर मिया अब्दुल्ला ह्यांनी आपले मत दिले, 'ज्याप्रमाणे जुनी देवळे नष्ट करणे अयोग्य त्याचप्रमाणे जुन्या परंपरा नष्ट करणेही अयोग्य!'


मिया अब्दुल्ला ह्यांचे मत सिकंदर लोदीला पटणे शक्य नव्हते. त्याला वाटले की, केवळ आपली अवज्ञा करावी म्हणूनच त्यांनी ते आपल्याविरुद्ध मत दिले आहे. सिकंदर लोदी क्षुब्ध झाला. त्याने आपल्या कट्यारीवर हात ठेवला आणि मिया अब्दुल्लाना म्हणाला, 'हे मत म्हणजे पक्षपातीपणा आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला ठार करीन आणि नंतर कुरुक्षेत्र उद्ध्वस्त करून टाकीन.' मिया अब्दुल्ला यांनी छातीठोकपणे निर्भीड उत्तर दिले, 'परमेश्वराच्या आज्ञेशिवाय कोणी मरत नाही. मी मृत्यू स्वीकारायला तयार आहे. जे होईल ते होवो. तुम्ही मला अशा प्रश्नावर धर्मशास्त्रात ('शरीयत') काय आज्ञा आहेत, हे विचारलेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला जर धर्मशास्त्राच्या आज्ञांची पर्वाच नाही तर मला विचारण्याची आवश्यकताच काय होती?'


मिया अब्दुल्लांचे हे उत्तर ऐकून बादशहा सर्दच झाला ! शांतपणे विचार केल्यावर त्याला त्यांचे म्हणणे पटले. दरबार संपल्यावर सगळे जाऊ लागले, तसे तो अब्दुल्लांपाशी आला आणि अतिशय नम्रपणे म्हणाला, 'आपण माझ्यावर कृपा करावी. आणि अधूमधून का होईना आपल्या सहवासाचा मला आनंद देत जावा !'


एका नि:स्पृह आणि विद्वान मौलवीच्या परखड बोलाने त्या काळी कुरुक्षेत्र वाचले. पण औरंगजेबाच्या काळात पुन्हा तेथील सरोवरावर आपत्ती कोसळली. मध्यंतरीच्या काळात कधीतरी तेथील ठाणेसर मंदिराचे शून्यालयात आणि महासिद्धी निलीयात (मशिद) रूपांतर झाल्याचे म्हणतात. 

औरंगजेबाच्या दरबाराच्या बातमीपत्रात ३० मे १६६७ व १ जून १६६७ अशा दोन दिवसांची बातमीपत्रे नोंदली गेली आहेत. १ जूनचे बातमीपत्र म्हणते - 'ठाणेसर परगण्याचे दोन जानवेधारी (ब्राह्मण) ह्यांनी येऊन पुढीलप्रमाणे तक्रार केली – 'मरहूम शेख मीर ह्यांची मीर इब्राहीम वगैरे मुले लाहोरहून परत येत असता त्यांनी तेथील (स्थानेश्वर म्हणजे कुरुक्षेत्राचे सरोवर) सरोवरावर अतिशय जुलूम केला. साधू-संन्याशींच्या रहाण्याच्या खोल्या पाडून टाकल्या' ह्यावरून तेथील काझीला बोलावून घेण्यात आले. त्याने सांगितले की, 'येथे सर्व धर्माविरोधी कृत्ये चालतात, यावर काय आज्ञा? बादशहाने तेथील फौजदार अब्दुल अझीज खास ह्यास आज्ञा केली की, 'ते सरोवर चारी बाजूकडून फोडून टाकावे म्हणजे तेथे हिंदू लोक यात्रेला गर्दी करणार नाहीत.'


३० मेच्या पत्रावरून हा हुकूम बहुधा अमलात आला नसावा, असे वाटते. कारण त्यात असे म्हटले आहे की, शेख मीरच्या मुलांच्या तक्रारीवरून बादशहाने आज्ञा केली, 'तळे उद्ध्वस्त करावे म्हणजे त्यात पाणी साठणार नाही.' पण ते गाव फौजदार खानाच्या जहागिरीत होते. त्याच्या वकिलाने विनंती केली की. 'तळे उद्ध्वस्त केल्यास शेतीचे उत्पन्न कमी होईल.' पण ह्या बातमीची तारीख ३० मे आणि उद्ध्वस्त करा ह्या हुकूमाची तारीख १ जून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कदाचित फौजदार खान जहागिरदार ह्याच्या विनंतीवरून शेतीचे उत्पन्न बुडेल ह्या भीतीने ब्रह्मसरोवराला धक्का लागला नसावा !

मोगलांच्या कारकिर्दीत यात्रेकरूंवर कर बसवणे ही सामान्य गोष्ट होती, त्याचे अनेक पुरावे सापडतात. काशी आणि प्रयाग येथील यात्रेकरूंवरील कर उठविण्यासाठी काशीच्या ब्राह्मणांना दारा शुकोहच्या मदतीने शहाजहानकडे धाव घ्यावी लागली हे सर्वश्रुत आहे.


कुरुक्षेत्रात तांब्याभर पाणी घेऊन काठावर आंघोळ करणाऱ्यांना एक पैसा कर आणि पाण्यात बुडी मारणाऱ्यांवर एक रुपया कर म्हणून कुरुक्षेत्रात म्हण पडली. 'एक पैसा लोटा और एक रुपया गोता.' मोगल राजवटीतील या परिस्थितीचे आणि तेही कुरुक्षेत्रावर म्हणजे भारताच्या हृदयावर होणाऱ्या आघाताचे अधिक विदारक वर्णन ते काय करावे!


हा न्याय वर्तुळाचा-

पण इतिहास जणू चक्राकार फिरतो. वर्तुळाची दोन टोके मिळायची होती. काळ पालटू लागला आणि मराठ्यांची विजयी घोडदौड सुरू झाली. राजकारणाला मराठ्यांनी धर्मकारणाची तितकीच जोड दिली. एकवेळ दिल्ली घेणे लांबणीवर पडले तरी चालेल, पण काशी, गया, प्रयाग, अयोध्या, मथुरा, कुरुक्षेत्र ही आपल्या हातात आली पाहिजे, हा धोशा त्यांना सारखा लागला होता. ह्या बाबतीत ते कोणतीही संधी दवडीत नसत. 


प्रथम कुरुक्षेत्र-

इ. स. १७५२ मध्ये अब्दालीचे आक्रमण परतवून लावण्यात पुढाकार घेण्याचे मराठ्यांनी मान्य केले. या संदर्भात मराठे हरियानामध्ये सरकले. त्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी हिंगण्यांना बजावून ठेवले की प्रथम कुरुक्षेत्र ताब्यात घ्या. नानासाहेबांच्या सूचनेवरून बादशहाने कुरुक्षेत्राचा प्रदेश मराठ्याच्या हवाली केला. तेथील उत्पन्न, सगळी व्यवस्था ही मराठ्यांच्या ताब्यात आली. कुरुक्षेत्र ताब्यात घेऊन ब्रह्म सरोवर सुरक्षित केले.

मध्यंतरी काही काळ मराठ्यांची पकड त्या भागात (पानिपतोत्तर) कमी झाली होती; पण इ. स. १७८४ पासून १८०३ पर्यंत मराठ्यांचे राज्य हरियानात चालू होते. नंतर ते इंग्रजांकडे आले.

त्या काळातील प्रमुख घटना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधून काढलेले कुरुक्षेत्रातील स्थानेवराचे मंदिर ही होय.

शिवछत्रपतींच्या कालातील उदाहरण द्यायचे तर त्यांनीही गोव्याच्या आसमंतातील पोर्तुगीजांनी नष्ट केलेले सप्तकोटेश्वराचे देवालय बांधून पोर्तुगीजांच्या धार्मिक जुलूमशाहीला उत्तर दिले होते.

असो,

अशा रीतीने इतिहासात ब्रह्मसरोवराला आणि स्थानेश्वर मंदिराला न्याय मिळाला.

आणि हो, इतिहास चक्राकार फिरतो. म्हणूनच जेथे मानवतेला झुगारून त्यांची निष्ठा पायदळी तुडवली जाते... एक दिवस त्याच मातीतून ती निष्ठा पुनश्च खडी राहते.! दोन भिन्न टोके जोडली जाऊन इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होते.! हिच, श्री राम मंदिरा सारखीच एक कथा कुरुक्षेत्राची.!

संदर्भ:औरंगजेबाच्या दरबारचे आखबार-संपादक : ग. ह. खरे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे पृ. ४५

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

  1. Review of Gambling - Casino Slot Games Online
    Gambling 승인전화없는 꽁머니 사이트 is a very popular activity for the whole family and 오공슬롯 the casino players, as 3 3 토토 we will 식보 show you how many different 다 파벳 모바일 casino games are available on Gambling

    ReplyDelete

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts