Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

मुलतानचा आदित्य..

 


पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुलतान हे दक्षिण आशियातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. मुलतान मधील मंदिरापैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे सूर्यदेवतेचे आदित्य मंदिर, जे नवाजले गेले देशोदेशींच्या निसर्ग भक्तांच्या हृदयामध्ये. या मंदिराची कथा श्रीकृष्णाशी संबंधित आहे. कृष्ण आणि जांबुवतीचा पुत्र सांब याला त्वचेचा काही रोग झाला. त्या रोगाच्या निवारणार्थ सांबाने सूर्याची उपासना आरंभिली. सूर्याच्या वनात अर्थात मैत्रवण येथे त्याने बारा वर्षे उग्र तपश्चर्या केली. तेव्हा सूर्य देवाने प्रसन्न होऊन सांबला रोगमुक्त केले. अत्यंत आनंदित झालेल्या सांबाने कश्यपपूर येथे सूर्याचे आदित्य मंदिर बांधले. पुढे कश्यपपूर नगराचे नाव ‘सूर्याचे मूळ स्थान’ यावरून बदलून ‘मूलस्थान’ आणि पुढे मुलतान असे झाले.!

सांबाने बांधलेल्या आदित्य मंदिरात सूर्याची मूर्ती आली ती पर्शिया मधून. पर्शियन सूर्योपासकांनी भक्तीने सूर्याला म्हणजेच मित्राला मानवी रूप दिले. पर्शिया मधील मित्राच्या पुजाऱ्यांना पाचरण करून मुलतांनच्या आदित्य मंदिरात सूर्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. भारतातही पर्शियन प्रभावाने अलंकारिक सूर्यमुर्ती दिसतात. पर्शियन झगा, कमरेला कुस्ती व पायात उंच बूट घातलेले दिसतात.

येथे लोणारची सहज आठवण होऊन जाते. इराणचा सूर्य दैत्यसूदन मंदिरावर बघायला मिळतो.

इसवी सनाच्या सातव्या शतकात शवान झांग या चिनी यात्रेकरूने आदित्य मंदिराबद्दल बरेच लिहिले आहे. डोळे दिपवणारी येथील सूर्याची रत्नजडित सुवर्णमूर्ती व विविध देशीच्या सूर्यभक्तांचा उल्लेख त्याने केला आहे. दहाव्या शतकात आलेल्या अबू झैदने लिहिले आहे की, सूर्यभक्त अनेक महिने प्रवास करून या मंदिराला येत असत. तर अबू इशाक म्हणतो, भक्त येथे सूर्याला सोने अर्पण करतात. यावरून तिरुपतीच्या मंदिराची आणि वैभवाची आठवण येते.

मुलतानचे सूर्यभक्त दर रथसप्तमीला रथोत्सव साजरा करीत असत. सूर्याची प्रतिमा सात घोड्यांच्या रथातून नेत. या उत्सवाचे वर्णन सांबपुराणात आहे. अकराव्या शतकातील अल्-बरुनीने या यात्रेचे वर्णन केले आहे. तसेच ते पुढे उध्वस्त झाल्याचेही नोंदविले आहे.(मीरचंदानी मुलतान चे सूर्य मंदिर)

मोहम्मद बिन कासिम व मोहम्मद गजनी या मंदिराची बरीच लूट केली. कासिमने मंदिराला त्याच्या महसुलाच्या एक तृतीयांश अधिकाराच्या बदल्यात अभय दिल्याचे इब्न अल-जावझीने नमूद केले. यात्रेकरूंना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार एक लाख ते दहा हजार दिरहम दरम्यान रक्कम भरण्याची सक्ती करण्यात आली होती.

नवव्या शतकाच्या उमाय्याद राजवटीत मंदिराचा इतिहास ‘फुतुह अल-बुलदान’ ग्रंथात अल-बालाधुरीने स्थानिकांसाठी प्रथम तीर्थक्षेत्र म्हणून विख्यात असलेल्या या मंदिराच्या काही प्रमुख बाबी नोंदवल्या आहेत. जसे संपत्ती: तेरा हजार आणि दोनशे मण सोने, स्थानिक सिंधींसाठी "प्रथम तीर्थक्षेत्र" असलेल्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. प्रदक्षिणा करण्याआधी आणि धन अर्पण करण्यापूर्वी सिंधी लोक दाढी आणि डोके कसे मुंडवायचे हे देखील नोंदवले गेले आहे.

इसवी सन ९६५ च्या सुमारास फातीमीद खलिफांच्या पत्रात सूर्य मंदिर उद्ध्वस्त करून मशीद उल्लेख मिळतो.

इस्तखरी, अल-मकदीसी, अल-मसुदी, अहमद इब्न रुस्ताह आणि इब्न हवाकल यांसारख्या प्रवासी-इतिहासकारांपासून ते इब्न अल-नदीम सारख्या विश्वकोशकारांपर्यंत अनेक मुस्लिम स्रोत - मंदिराचे वर्णन करतात.

मुलतान मध्ये राज्य करणाऱ्या अरबांनी हिंदूंनी मुलतांवर आक्रमण करू नये म्हणून बरीच वर्षे येथील सूर्यमुर्ती ओलीस धरली होती. असो, परकीय आक्रमकांच्या लाटा ओसरल्या होत्या. १९ व्या शतकात जेव्हा महाराजा रणजीत सिंगाने मुलतान ताब्यात घेतले तेव्हा सूर्याची मूर्तीच काय सूर्य मंदिराचे अवशेष देखील उरले नव्हते...!

अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १८५३ मध्ये मुलतानला भेट दिली, मात्र कुणीही रहिवासी जागा ओळखू शकला नाही.!

असो, निसर्ग पूजकांची कथा संपली. बेमालूमपणे आपल्याच भूमीत गडप होऊन गेला मुलतानचा आदित्य.! काय कधी मुलतानचे लोक आपल्या पूर्वजांच्या कथांमध्ये शोधत असतील मुलतानचा आदित्य..? असो, बद्गुमान शासकांच्या बेनकाब गोष्टी.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts