Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

 


मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो.

आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.!

मित्रांनो, 

शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसतात. हा मंदिराचा सभामंडप. मंदिरातील स्तंभ साधारण नक्षीकामाचे आहेत. त्यांच्या कर्णीकांवर सुंदर नागफण कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस रिकामी देव कोष्टके आहेत. डाव्या बाजूची भिंत नव्याने बांधली असल्याने डाव्या बाजूचे देव कोष्टक अर्धवट भिंतीत दाबलेले दिसते. गर्भगृहाचे द्वार सुंदर कलात्मक असून दोन्ही बाजूस अर्धस्तंभ व त्यामध्ये समृद्धीचे प्रतीक असलेले रेखीव घटपल्लव आहेत. ललाटबिंबावर मध्यभागी श्री गणेश मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृह चौरसाकृती असून त्यामध्ये पंचमुखी शिवलिंग आहे. गर्भगृहाचे व सभा मंडपाचे छत दगडी चौरस तुळ्यांनी बनलेले आहे. एकूणच इतर उत्तरकालीन यादव देवालयाप्रमाणे हे सामान्य कलाकृतीचे देवालय आहे.

नागझरी शिवमंदिर





गर्भगृहाच्या दुसऱ्या द्वारातून बाहेर गेल्यास पायऱ्याने उतरून खोल खाली जावे लागते. पायऱ्याने उतरून खाली गेल्यास चौरसाकृती जलकुंड लागतो. या जलकुंडामध्ये तिथे असलेल्या मुखातून जलधारा पडत असते. आता मात्र उन्हाळ्यात हा जलकुंड व त्यातील धार अदृश्य झालेली आहे. या कुंडाच्या बाजूस शिवपार्वती आलिंगन मूर्ती व एक श्री गणेशाचे शिल्प ठेवलेले आहे. डोंगर कुशीत वसलेले हे ठिकाण दाट झाडाझुडपांनी व्यापलेले आहे. समयाचा विचार करता नेहमीप्रमाणे प्राचीन काळी या भागातील कुण्या अंमलदार जहागीरदाराने वा कुणी यादव राजाने केलेल्या दानातून देवालयाचे निर्माण झाले असे सांगण्यास कोणताही पर्याय नाही. तरी येथे क्षणभर थांबून २०२६ मधून किमान ६-७ शे वर्षे मागे जाऊन इतिहासाचा काळ अनुभवता येतो. येथील पाषाणाच्या स्पर्शाने गतकाळातील यज्ञ होम हवनांचे मंत्रोच्चार आणि वास्तु शिल्पिंच्या छन्न्यांचे टणत्कार कानी ऐकू येतात.

असो, येथून परत नागझरी फाटा व तेथून दरेगाव कडे निघालो. फाट्यावरून दोन किलोमीटर अंतरावर दरेगाव आहे. दरेगाव मध्ये प्रवेश करता डाव्या बाजूस माथ्यावर एक छोटेसे दगडी मंदिर दिसते. मंदिराकडे जाण्यापूर्वीच अगदी त्याच्या प्रांगणात विस्तीर्ण असा साधारणपणे २५ बाय २५ फूट लांबी-रुंदीचा बारवा नजरेस पडला. सहज डोळ्यांनी न दिसणारी ही विस्तीर्ण बारवा बघितल्यावर आश्चर्य वाटू लागते. बारवेच्या मनाने त्या काठावर असलेले शिवमंदिर अतिशय लहान आहे. कदाचित पूर्वी येथे भव्य मंदिर असावे जे कालौघात नष्ट झाले आहे. मंदिराच्या द्वारावर साधारण अर्धस्तंभ आहेत व आत शिवपिंडी आहे. हे काम साधारण इतर यादव मंदिरांच्या प्रमाणे आहे. 

दरेगाव येथील बारव

बारवेच्या दगडांच्या पायऱ्या आता निखळू लागल्या आहेत. गावातील सर्व माती वाहून बारवेत साचल्याने ती उथळ झाली आहे. निर्जीव निर्विकार तिच्या पायऱ्यांचे पाषाण म्हातारबांच्या दंतपंक्तीसारखे एकमेकांपासून दूर होत आहेत. अर्थातच एवढ्या प्रचंड बारावेच्या निर्माणासाठी विद्वान स्थपतींनी मृदा निश्चिती करूनच असंख्य कारागिरांच्या मदतीने हे भव्य निर्माण कार्य केले आहे. ज्याची केवळ आपण कल्पनाच करू शकतो. जल व्यवस्थापन, गुरुत्वाकर्षण, भूमिती-गणित आणि अध्यात्म सांगणारे विज्ञानाचे मूर्त स्वरूप प्रत्यक्ष आपल्या गावी असून सुद्धा अजान गावकरी याकडे दुर्लक्ष करून राहतात हे वास्तव आहे. सुंदर कलाकृतींकडे सारेच आकृष्ट होतात,, मात्र इतिहासाचा वारसा जपणारे सारेच सुंदर नसतात. अशाच अज्ञात आणि दुर्लक्षित वास्तुपुरुषांच्या दर्शणार्थ..!

असो, असा हा इतिहास काळातील अलौकिक अनुभूतींचा प्रवास येथेच संपतो.

३ मे २०२६.

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts