Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

सासनम्: निर्वासितांना मिळालेल्या अधिकाराची गोष्ट...



मित्रांनो, सासनम् अर्थात संस्कृत मधील शासनम् म्हणजे शासन किंवा अधिकार..!

...प्राचीन काळापासून दक्षिण भारतातील व्यापाराचे विस्तीर्ण जाळे अनेक व्यापारी संघटनांद्वारे नियंत्रित केले जात होते, ज्यांनी एकमेकांशी सहकार्य आणि सामंजस्याने काम केले. विशेष करून दक्षिण भारतात हे व्यापारी संघ म्हणजे अय्यावोले(आयहोलचे ५०० स्वामी), मणिग्रामम, नगरत्तर, अंजुवन्नम आणि वलंजियार याशिवाय इतरही नावाने अस्तित्वात होते.

बी.डी. चट्टोपाध्याय यांच्या मते , मणिग्राम प्रथम इसवी सन नवव्या शतकात केरळच्या किनारपट्टीवर दिसला. अंजुवन्नम हा गैर-भारतीय व्यापारी जसे ज्यू, सीरियन ख्रिश्चन, मुस्लिम आणि झोरोस्ट्रियन पारशी व्यापारी यांचा संघ होता. 

हे व्यापारी संघ सामान्यतः कोकण, मलबार किनारा आणि दक्षिण भारतातील कोरोमंडल किनाऱ्यावरील व्यापारी बंदरांवर याशिवाय जावासह दक्षिण पूर्व आशियामध्येही कार्यरत होते. 

खरे तर हे विविध व्यापारी संघ आणि स्थानिक भारतीय राजवटी चेरा, चोला हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय असल्याने तो स्वतंत्र निवेदनात अभ्यासता येईल.

मित्रांनो,

काही बंदरांमध्ये या गिल्डने(संघ) रॉयल चार्टर्स-विशेष राजकीय अधिकार प्राप्त केले होते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे केरळच्या चेरा राजवटीतील मणिग्रामम आणि अंजूवन्नम या व्यापारी संघाचे. या व्यापारी संघातील एका ज्यू व्यापारी प्रमुखाला केरळच्या राजाने दिलेली सनद म्हणजेच रॉयल चार्टर्स अर्थात ‘सासनम्’ ची ही गोष्ट..!

ज्यू निर्वासित होऊन भारतात आले. इ.स. ७०

मित्रांनो ज्यूंचा विचार करता, पी.एम जुसे म्हणतात की, भारतातील सर्वात जुने ज्यू हे राजा सोलोमनच्या काळातील नाविक होते. असा दावा करण्यात आला आहे की जेरुसलेमच्या वेढ्यात पहिल्या मंदिराचा नाश झाल्यानंतर (587 ईसापूर्व), काही ज्यू निर्वासित होऊन भारतात आले. इ.स. ७० मध्ये दुसऱ्या मंदिराचा नाश झाल्यानंतरच कोचीन जवळील प्राचीन बंदर क्रँगनोर(कोडुंगल्लूर) येथे असंख्य ज्यू स्थायिक झाले.

भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर पिढ्यानपिढ्या राहणारे ज्यू आता या संस्कृतीत मिसळून गेले होते. या भूमीने त्यांना आपलंसं केलं होतं आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याला जपलं होतं. त्याचाच पुरावा सांगणारा राज आदेश म्हणजे सासनमम् होय.!

आज भारतातील केरळ राज्यात त्रिस्सूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर हे एक प्राचीन ऐतिहासिक बंदर आहे. ९/१० व्या शतकात केरळच्या चेरा शासकांची राजधानी महोदयपुरम म्हणून ओळखली गेली. जिथे ज्यू, ख्रिश्चन, पर्शियन असे अनेक परकीय व्यापारी शतकांपूर्वी संघ रूपाने येथे स्थायिक झालेले होते.

त्या सुमारास हे शहर क्रँगनोर, शिंगली, मुयिरिक्कोडे या नावाने आणि मलासूर नदीच्या काठावर वसलेले असल्याने परकीय याचा मुझिरिस म्हणूनही उल्लेख करत.


सासनम्:कोचीनचा ज्यू ताम्रपट-

दहाव्या शतकात दरम्यान दक्षिण भारतातील केरळ येथे चेरा राजवटीतील पेरुमल राजा भास्कर रवि वर्मन हा शासक होता.

त्याने आपल्या राज्यातील कोडुंगल्लूरचा एक ज्यू व्यापारी जोसेफ रब्बन याला एक राजकीय सनद जारी केली होती. ही सनद मलबार किनाऱ्यावरील कोचीनजवळ कोडुंगल्लूर, (क्रँगनोर) येथील ज्यू वसाहतीची स्थिती आणि महत्त्व दर्शवते.

हा ज्यू ताम्रपट(कॉपर प्लेट्स) दहाव्या शतकातील असल्याचे मानली जाते परंतु काहींच्या मते ही तारीख त्यापूर्वीची आहे. ही सनद दोन ताम्रपटांच्या तीन बाजूंवर मध्ययुगीन केरळच्या स्थानिक भाषेतील ‘वट्टेझुथु’ लिपीत कोरलेली आहे. मर्चंट गिल्ड अंजुवन्नम च्या अधिकारांसह जोसेफ रब्बन (मल्याळम: इस्सप्पू इरप्पन) यांना राजा भास्कर रवि वर्मा (मल्याळम: परकरन इराविवनमन) यांनी दिलेल्या अनुदानाची यात नोंद केली आहे. 

रब्बनला मुयिरिक्कोडे(कोडुंगल्लूर) शहरातील इतर स्थायिकांनी केलेल्या सर्व देयकांमधून सूट देण्यात आली आहे. त्याचवेळी इतर स्थायिकांचे सर्व अधिकार त्याला दिलेले आहेत. हे अधिकार आणि विशेषाधिकार त्याच्या सर्व वंशजांना कायमस्वरूपी दिले जातात. ते दर्शवण्यासाठी या राज आदेशात म्हटले आहे- "जोपर्यंत जग, सूर्य आणि चंद्र टिकून राहतील" ज्यूंना मुक्तपणे राहण्याची, सभास्थान (सिनेगॉग) बांधण्याची आणि मालकीची मालमत्ता "विना शर्ती" दिली. या सनदेचा (ताम्रपटाचा) अनुवाद एमजीएस नारायणन यांनी केला आहे.

रब्बन, "शिंगलीचा राजा" (क्रँगनोरचे दुसरे नाव) याच्याशी असलेले कौटुंबिक संबंध दीर्घकाळापासून समाजातील पवित्रता आणि प्रतिष्ठा या दोन्हींचे लक्षण मानले जात होते. 

१६ व्या शतकात जोसेफ अझर नावाच्या दोन भावांमध्ये सरदारपदाचा वाद सुरू होईपर्यंत रब्बनच्या वंशजांनी या वेगळ्या समुदायाचे नेतृत्व केले.

असो, हा ताम्रपट संच शेवटी दक्षिण आणि उत्तर केरळमधील अनेक सरदार व सेनापतींच्या स्वाक्षऱ्यांनी प्रमाणित केला आहे.


भारतीय राज्यकर्त्यांनी ज्यू नेता जोसेफ रब्बन याला कोचीनच्या ज्यूंवर प्रिन्सचा (राजपुत्राचा) दर्जा दिला, त्याला क्रँगनोर जवळील अंजुवन्नममधील रियासतचे राज्य आणि कर महसूल आणि बहात्तर "मुक्त घरांचे" अधिकार दिले.

पिढ्यान पिढ्या भारतीय समुदायांमध्ये मिश्रित होऊन एका नवीनच बोलीभाषेचा- ज्यूडिओ-मल्याळम भाषेचा जन्म झाला होता. भारतीय संस्कृतीचे बरेच संस्कार त्यांनी आत्मसात केले होते.


सासनमम् ही सनद मत्तनचेरी(कोचीन) येथील परदेसी सिनेगॉगमध्ये काळजीपूर्वक जतन केली गेली. 

(संदर्भ-MGS Narayanan: perumals of Kerala, K.P. Padmanabha Menon: history of Kerala)


भारत-ज्यू नात्याला उजाळा-

2003 मध्ये, या ज्यू कॉपर प्लेट्सची(ताम्रपट) प्रतिकृती सरकार द्वारे तयार करण्यात आली व त्या प्रतिकृती इस्रायलचे पंतप्रधान एरियल शेरॉन यांच्या भारत भेटीदरम्यान भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भेट दिली. 

(Source-The Hindu: 10 Sept 2003)

तसेच पुढे अशा प्रतिकृती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये इस्रायलच्या भेटीदरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना देखील भेट दिल्या. (स्रोत पीएमओ इंडिया)

पंतप्रधानांनी इजराइल भेटीदरम्यान दिलेली कॉपर प्लेट्स ची प्रतिकृती, सोर्स:पीएमओ ऑनलाईन


त्यावेळी भारतीय पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले की, तांब्याच्या प्लेट्सचा दुसरा संच हा भारतासोबत ज्यूंच्या व्यापाराच्या इतिहासाचे सर्वात जुने दस्तऐवज असल्याचे मानले जाते. या प्लेट्समध्ये स्थानिक हिंदू शासकाने चर्चला दिलेली जमीन आणि कर विशेषाधिकार आणि कोल्लममधील पश्चिम आशियाई आणि भारतीय व्यापारी संघटनांच्या व्यापारावर देखरेखीचे वर्णन केले आहे. पश्चिम आशियाई संघटनेत मुस्लिम, ख्रिश्चन, झोरोस्ट्रियन, तसेच ज्यू-पर्शियन आणि शक्यतो अरबी आणि पहलवी (मध्य पर्शियन) मध्ये स्वाक्षरी केलेल्या ज्यूंचा एक गट समाविष्ट होता. क्रँगनोर(कोडुंगल्लूर) हे ते ठिकाण आहे जिथे ज्यूंनी कोचीन आणि मलबारमधील इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यापूर्वी शतकानुशतके धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्तता अनुभवली. स्थानिक ज्यूंनी एकदा प्रत्येक शवपेटीमध्ये शिंगली/क्रँगनोरची(कोडुंगल्लूरची) मूठभर माती ठेवली जी पवित्र स्थान आणि "दुसरे जेरुसलेम" म्हणून स्मरणात होती. प्लेट्स हे भारतातील कोचीनी ज्यूंसाठी एक प्रिय अवशेष मानले जातात आणि कोचीच्या मत्तनचेरी येथील परदेसी सिनेगॉगच्या सहकार्याने ही प्रतिकृती तयार केली गेली आहे.

पीएम मोदींनी सादर केलेला धातूचा मुकुट फुलांच्या अलंकार शैलीत सोन्याच्या पत्र्यांनी मढवला आहे, ज्यावर दक्षिण भारतातील दिवे आणि सजावटींचे वैशिष्ट्य आहे.

(स्रोत-इंडियन एक्सप्रेस पाच जुलै 2017)

पंतप्रधानांनी इजराइल भेटीदरम्यान दिलेला प्रिन्स क्राऊन सोर्स पीएमओ


असा लेख पंतप्रधानांच्या इजराइल भेटी संदर्भात इंडियन एक्सप्रेस मध्ये छापून आला. पंतप्रधानांनी दिलेला सोन्याचा मुकुट म्हणजे भारतीयां तर्फे (चेरा शासकातर्फे) जगात निर्वासित असलेल्या ज्यूंना (रब्बनला) मिळालेल्या राजपुत्राचा अधिकार दर्शवतो.!


क्रँगनोर/कोडुंगल्लूर हे ज्यू समुदायासाठी पौराणिक महत्त्व असलेले शहर ठरले. ते भारतातील एक पर्यायी जेरुसलेम ठरले. 

ज्या ज्यू समाजाला देशभर भटकावे लागले त्यांना भारताच्या केरळ भूमीमध्ये आपल्या धार्मिक स्वातंत्र्यासह आनंदाने राहता आले.!

1948 मध्ये ज्यूंसाठी इजरायल नावाचा देश निर्माण झाला. अगदी पुण्याच्या संस्कृतीत विरून गेलेले शनिवार तेली म्हणून ओळख असलेल्या ज्यूं पासून तर मलबारच्या किनाऱ्यावर पिढ्यांपासून व्यापारी म्हणून स्थायिक झालेले अनेक ज्यू कुटुंबे इजराइलकडे निघून गेली. त्या भागातील ज्यूंची अनेक प्रार्थना गृहेही हळूहळू नामशेष झाली. मात्र राहिला तो या सासनमच्या रूपात अव्यक्त आणि अद्वितीय ऋणानुबंधाचा इतिहास..!

असो,

हिंद भूमीने सर्वांचे स्वागत केले मग तो शत्रू का असेना. व्यापाराच्या निमित्ताने आलेले सर्वच व्यापारी ठरले असे नाही..! असो, पण काही व्यापारी बनून आले आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून गेले..! अशा या स्मरणात राहिलेल्या व्यापाऱ्यांसाठी असा हा ऐतिहासिक बंधनाचा ठेवा तसेच भारतीय संस्कृतीचा मोठेपणा..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts