Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

मधुर आंब्याची कटू फळे..!

 


मित्रांनो, _Mangifera Indica_ अर्थात आंबा,

उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन. देशभरात विविध भागात विविध प्रकारचे रसाळ आंबे प्रसिद्ध आहेत, तसा त्यांचा इतिहासही प्रचंड मोठा आहे. चिनी प्रवाशांनी आपल्या ग्रंथात आंब्याचे केलेले वर्णन, शिवछत्रपतींनी लावलेली फर्मासी आंब्याची झाडे, जहांगीर ने आंब्याला दिलेली विविध नावे, पोर्तुगीजांचा अल्फान्सो, रघुनाथरावांनी केलेली आंब्याची लागवड, फरुखाबादच्या बंगश पठाणाने दिल्लीच्या बादशहाकडून कोय नेऊन लावलेली आंब्याची बाग, औरंगजेब बादशहाने इराणचा बादशहा शहा अब्बासला पाठवलेली आंब्याची देणगी, हैदराबादी आंब्याचा उत्सव, असा कितीतरी मोठा इतिहास आहे.

मोगलांचा विचार करता जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब हे तिघे आंब्याचे शौकीन होते.

अलाउद्दीन खिलजीचा राजकवि अमीर खुसरो(मृत्यू इ.स.१३२५) या आंब्याला “नागजा तरिन मेवा हिंदुस्थान” हे हिंदुस्थानचे सर्वात सुंदर फळ म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादेजवळील दौलताबाद येथील आंब्यांना अमीर खुस्त्रौ हा मोहित झाला होता. तो म्हणतो, 'दौलताबादेचे आंबे हे आंबे नव्हत, ती म्हणजे मधाने भरलेली सोन्याची अंडी आहेत.' 

या दौलताबादच्या आंब्यापायी राजपुत्र औरंगजेबाला आपल्या बापाची, शहाजहान बादशहाची नाराजी ओढवून घ्यावी लागली. दरवर्षी नित्य क्रमाने दौलताबादेचा आंबा बादशहाला पुरेसा न मिळाल्याने त्याची औरंगजेबावर खप्पा मर्जी झाली. औरंगाबादेत सुभेदार म्हणून काम करीत असता त्याने शहाजहान बादशहाला खालील पत्र लिहिले (इ.स.१६५३-५४)

"आम्हा एकनिष्ठांना पूज्य असलेले (किब्लादारीने मुरीदान सलामत)' आपल्याकडून माझ्या वकीलाला आज्ञा

करण्यात आली होती त्याप्रमाणे मी कच्चे आंबे गोळा करण्यापूर्वीच त्यांच्या रक्षणासाठी ठिकठिकाणी माणसे नेमली होती. त्यांना सक्त ताकीद करण्यात आली होती. पण यावर्षी दक्कनमध्ये आंब्याला चांगला बहर आला नाही.

''विशेषत: 'बादशहापसंद' या जातीच्या आंब्याला चांगला बहर आला नाही. सुभ्याच्या वाकेनवीसांकडून ही हकीकत आपल्याला कळली असेलच. तरीपण शक्य तितके आंबे रवाना करण्यात मुळीच कसूर होणार नाही. मीर साबिर आणि दाराब खेश मुल्तफतखान हे बऱ्हाणपूर येथे आहेत. त्यांनाही बऱ्हाणपुराहून आंबे पाठविण्याची आज्ञा आपल्याहून‌ झाली आहे. अत्यंत काळजीपूर्वक डाकचौकीच्या द्वारे आंबे पाठविण्यात येत आहेत. चांगल्या स्थितीत पोहोचतील अशी आशा आहे.


यानंतरच्या पत्रात औरंगजेब लिहितो- “परमपूज्य (पीर दस्तगीर सलामत), आंबे मागविण्याच्या कामावर आपण एक स्वतंत्र व्यवस्थापक नेमीत आहात हे उत्तमच झाले. या मोसमात बादशहा-पसंद झाडाचे तीन आंबे

माझ्याकडे व्यबस्थापकांनी आणले ते आपल्याकडे पाठविण्यायोग्य आहेत की नाहीत हे पाहावयाचे होते. जे काही हाती लागले ते हुजूरांकडे पाठविण्यात आले. बादशहा-पसंद आंबे इतके कमी का आले याची कारणे मी मागे

कळविली आहेत. कारण हे की त्या झाडाच्या एकाच फांदीला या खेपेस फळे लागली. इतर फांद्या तीव्र वान्यामुळे मोडून पडल्या. आपल्या योग्य असलेली फळे मी येथेच उपयोगात आणण्यास कसा बरे कबूल होईन."


तरी बादशहा शहाजहानची कुरबुर चालूच होती. औरंगजेबाची बहीण जहानआरा बेगम हिने औरंगजेबाला तसे लिहून कळविले. यावर औरंगजेब तिला लिहितो -

'तू लिहितेस' बादशहा म्हणतात 'दक्षिणेहून चांगले आंबे येत नाहीत. कदाचित अवेळी आणि कच्चे काढीत

असतील, किंवा डाकचौकाची व्यवस्था उशीरा होत असेल. कदाचित वाटेत आंब्यांच्या टोपल्या जमिनीवर ठेवीत

असतील. किंवा आंबे ठिकठिकाणाहून प्रथम दौलताबादेस आणवून घेत असतील आणि नंतर इकडे पाठवीत असतील.'

'प्रिय भगिनी (मुशफका सलामत), अद्यापपर्यंत चांगले आंबे आले नाहीत. महंमद ताहिरने यापूर्वी बऱ्हाणपुराहून

जे आंबे पाठविले असतील ते कदाचित वेळेवर झाडावरून काढलेले नसावेत. आता जे आंबे पोहोचले ते अवेळी

आणि कच्चे असे काय म्हणून काढलेले असतील. डाकचौक्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे की सात

दिवसात,शिकस्त नऊ दिवसात आंबे तिकडे पोहोचलेच पाहिजेत. माझा वकील तेथे दरबारात आहे, त्याला किंवा

कुणालातरी आज्ञा व्हावी. तेथून आंबे केव्हा पाठविण्यात आले त्याची तारीख आणि वेळ पत्रात नमूद केली आहे.

आंबे तेथे केव्हा पोहोचले हे त्याने लक्षात ठेवावे. जर दिरंगाई दिसून आली तर लोकांना तंबी देण्यात यावी. वाटेत

सिरोंज आणि अकबराबाद इत्यादी ठिकाणी माणसे नेमून त्याना ताकीद करण्यात आली आहे की कोणत्याही

परिस्थितीत टोपल्या जमिनीवर ठेवण्यात येता कामा नये.'

दक्षिणेकडून बादशहाकडे आंबे येतात, ते दोन ठिकाणांहून होत. एक बऱ्हाणपूर, दुसरे म्हणजे दौलताबाद. बऱ्हाणपूर आणि तेथील परिसरात पाठविण्यायोग्य आंबे आढळतात. ते महंमद ताहिर हा काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे पाठवितो. दौलताबादचे प्रदेशातील आंबे हा नम्र सेवक(औरंगजेब) पाठवितो. बऱ्हाणपूरचे आंबे दौलताबादेत मागवून घेऊन नंतर हुजूरांच्याकडे पाठविण्याचा प्रश्न कोठे उपस्थित होतो हे समजत नाही. यापुढे मी ठरविले आहे. की, आंब्यांच्या डाली (टोपल्या) बरोबर जो कागद पाठविला जाईल, त्यावर आंबे कोठे कोठे पोहोचले हे नमूद करण्यात यावे.

'मेहरबान भगिनी, काळजी घेण्यात मी कोणतीही कसून केली नाही आणि करणार नाही. बादशहांच्या उपयोगात येणाऱ्या वस्तू पाठविण्यात मी निष्काळजीपणा करीन हे कसे शक्य आहे?'


प्रस्तुत पत्रव्यवहारावरून शहाजान बादशहाची नाराजी आणि ती दूर करण्यासाठी औरंगजेब पोट तिडकीने स्पष्टीकरण देताना दिसतो.

औरंगजेबाच्या या पत्राने शहाजहान बादशहाचे समाधान झाले की नाही हे समजण्यास मार्ग नाही. पण आंब्याच्या शौकामुळे औरंगजेबाला शहाजहानचा रोष बराच काळ सहन करावा लागला. एव्हाना मधुर असणारा आंबा काही काळ तरी औरंगजेबाला कटूच झाला होता हे नक्की.! म्हणजे मधुर आंब्याची कटू फळे..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts