Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

पांढरी: प्रत्येक मातीला इतिहास आहे..



मित्रांनो, कधी गाव खेड्यातून जाताना अंग चोरून किलकिल्या केविलवाण्या नजरेने पाहणारी पांढऱ्या मातीची उघडी-बोडखी घरे बघितली काय..? आत्मविश्वास हरवलेली गतकाळातील बुलंद गढी ढासळणाऱ्या अवस्थेत बघितली काय..?

मनुष्याच्या वेगवान जीवनात या गतकालीन वास्तूंकडे बघण्यास कुणाला वेळ..!

कधीकाळी मनुष्याचा आश्रय आणि त्याचा अभिमान बनून वावरणारी आज खुद्द आपणच काँक्रीटच्या या जंगलात हरवून गेली आहेत !

असो,

मित्रांनो 'पांढरी' हा शब्द गाव खेड्यात रूळलेला आहे पांढऱ्या माती प्रमाणे. काळी म्हणजे कसदार जमीन व पांढरी म्हणजे वस्ती योग्य जमीन. यावरूनच पांढरपेशा या शब्दाचा अर्थ शेती कामाव्यतिरिक्त व्यवसाय करणारा. शेतासाठी काळी आणि वस्तीसाठी पांढरी जमीन शेकडो वर्षांपासून वापरली जात असे. म्हणूनच या पांढऱ्या मातीखाली आपल्याला जुन्या वस्त्यांचे अवशेष सापडतात. गावांच्या जुन्या जमिनीवर नवीन घर बांधताना उत्खननात भांडी मटकी सुद्धा आढळतात.

मित्रांनो,

प्रत्येक मातीला रंग त्यातील रासायनिक घटकांमुळे येत असतो हे आपणास माहीत आहे. जसे लाल मातीत लोहाचे प्रमाण, पांढऱ्या मातीत सिलिका वा कॅल्शियम चे प्रमाण तर काळ्या मातीत सर्व सेंद्रिय घटकांचे अधिक्य असते. पण इतिहास कालातील वाड्यांना, वस्त्यांना वापरण्यात येणारी पांढरी माती ही विशेष करून घर बांधणीसाठी तयार केली जात असे अशी माहिती मिळते. सर्वसामान्य मातीमध्ये राख, भुसा, लीद, बेल, गुळ आधी पदार्थांचे योग्य प्रमाण टाकून काही दिवस त्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन बांधणीची चिवट पांढरी माती तयार होत असे. शिवकालातील गड कोटांमध्ये मातीच्या मिश्रणात चून्याचे विशेष महत्त्व असे.

असो, माती तयार केल्यानंतर या मातीच्या विटा बनवून दगडी पायावर बांधणी केली जात असे. अगदी आजही गावांमध्ये काही पांढऱ्या मातीची घरे बघायला मिळतात पण क्वचितच.!

पूर्वी गावोगाव पांढऱ्या मातीच्या वस्त्या आणि त्या वस्त्यांवर हुकूमत गाजवणारे टोलेजंग बुरुजबंदीवाडे मोठ्या दिमाखात वावरत असत. मातीची जाड भिंतीची घरे, चौसेपी वाडे आणि दिमाखदार गढ्या इतिहास जमा होत चालल्या आहेत. आणि त्याचबरोबर गडप होत आहे त्यांचा इतिहास सांगणारी पांढरी माती..!

आपल्या शुभ्र धवल कांतीने गढी, वाडे आणि गाव वस्त्यांना सजवणारी ती माती आता लोप पावत आहे. जी माणसाच्या प्राचीन स्थापत्याचा इतिहास सांगते.! त्याचबरोबर गाव-गाड्याचा, दळणवळणाचा आणि सरंजामशाहीचा राजकीय इतिहास दृष्टी समोर मांडते..!

आजही खेड्या गावामध्ये अपवादानेच ती बघायला मिळते एखाद्या पडक्या वाड्याच्या भिंतीवर वा ढासळणाऱ्या बुरुजावर.!!! 

गावो गाव इतिहास घडलेला आहे, वाऱ्यावर स्वार होऊन तो धूलीकण अदृश्य होत आहे..

म्हणूनच थोडं थांबून बघा..प्रत्येक मातीला इतिहास आहे.!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।



Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts