Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी १६८१:

 

‘राजा शंभू दोन्ही शिवांना(शंकर आणि शिवाजी) शोभणाऱ्या निर्भय आणि सुकर अशा राजछत्राच्या तेजाने लखलखणाऱ्या राजसिंहासनावर विराजमान झाला. राजाने मंगलकारक रेशमी वस्त्रे परिधान केली होती. अंगावर तेज आलेला, केशरयुक्त त्रिपुण्ड्रामुळे त्याचा भालप्रदेश सुंदर दिसत होता. सोन्याच्या चकाकणाऱ्या त्याच्या जीरेटोपाने सर्व दिशा वेढून टाकल्या होत्या. शौर्याचे आश्रयस्थान जणू असा तळपणारा तो दुसरा सूर्यच भासला. चिलखत, ढाल, कृपाण आणि धनुष्य धारण करत, उत्तरीयामुळे तो शोभून दिसत होता. राजछत्र धारण केलेल्या, सुंदर चवऱ्यांनी त्याला वारा घातला जात होता. दोन्ही बाजूंनी श्रेणीनुसार आसनस्थ झालेले राजेसरदार लोक हात जोडून स्तुती करीत होते.'

असे रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याचे मोठे रसभरीत वर्णन अनुपुरानकाराने आपल्या काव्य ग्रंथात केलेले आहे.


जेधे शकावली प्रमाणे - 

‘शके १६०२ रौद्र संवछरे, माघ सुध ७ रायेगडी संभाजीराजे सिव्हासनी बैसले.’

क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि अधिराज्य गाजविण्यासाठी त्यांची राजमुद्रा अस्तित्वात आली होती.


'श्री शंभो शिवः जातस्य मुद्राद्यौ रिव राजते यदं कसे विनो लेखा वर्तते कस्यनो परि'


अर्थात - संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे शोभते आणि राजमुद्रेची आश्रीत असलेली लेखा कोणावरही अंमल गाजविते अशी ही शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित आहे.


अशी ही उभी पिंपळपानी, सात ओळींची राजमुद्रा स्वतःची अस्मिता आणि रुबाब व्यक्त करते.


बुधभूषण या आपल्या ग्रंथातील राजनितीच्या अध्यायात सामान्य राजनितीची तत्वे सांगतांना शंभूराजे म्हणतात की, ज्यावेळी प्रजेमध्ये अराजक माजून सगळीकडे भय पसरते. अशावेळी प्रजेच्या व योगीजनांच्या रक्षणासाठी परमेश्वराने राजास निर्माण केले.


आदर्श राजबद्दल शंभुराजे म्हणतात की, ‘भयापासून मुक्त असलेला जो बोलण्यात चतूर आहे, शरीरयष्टीत उंच व बलशाली आहे, ज्याचा स्वतःच्या इंद्रियांवर ताबा आहे व जो दण्डनितीमध्ये निपुण आहे असा चांगले आचरण करणारा व योग्य गोष्टींसाठी दृढनिश्चयी राहून युद्ध आणि तह करणारा तो राजा असतो.'


शत्रूच्या हल्यास कठोरपणे टक्कर देण्यास समर्थ असणारा, प्रतिकाराचे तंत्र आणि दुसऱ्याची मर्मस्थाने जाणणारा आणि वेळप्रसंग पाहून शत्रूशी तह व भेद करणारा तो राजा असतो."


“जनांच्या अपराधांची माहिती घेऊन व शिष्ट व विद्वानांकडून त्यावर साकल्याने विचार करुन दण्डनीय व्यक्तिस दंड करावा. पापकर्माचे याप्रमाणे शमन करावे"


शंभूराजे म्हणतात, 

“ज्याप्राणे यम देव चांगल्या लोकांचा द्वेश करणाऱ्या लोकांसाठी जसा उचित समयास बाहेर पडतो तसे राजानेही प्रजेसाठी योग्य वेळी बाहेर पडून शत्रुचा काळ बनुन यमव्रत अनुसरावे.” 

आणि 

“वायू जसा प्राणीमात्रांत प्रवेश करून राहतो तसे राजाने गुप्तहेराकडून सगळीकडे प्रवेश करावा. याला मारुतव्रत म्हणटले आहे."

 

तसेच 

“वर्षांतील चार महिन्यात जसे वरुणराजा पाऊस पाडत राहतो. त्याप्रमाणे प्रजेमध्ये राजाने कृपेचा पाऊस पाडून जलव्रत अनुसरावे." 

पण 

“सूर्यदेवता ज्याप्रमाणे जल शोषून घेतो तसे राजाने प्रजेकडून नेहमीच कर वसूल करुन अर्कव्रत अनुसरावे." 

मात्र 

“प्रजेवरील अन्यायाने जो राजा आपला खजिना भरत राहतो तो, ते वैभव संपल्यावर आपल्याच बांधवांसह नष्ट होतो. म्हणून निव्वळ प्रजेच्याच संपत्तीवर आपले वैभव वाढवू नये. 


आदर्श राजाचे गुण व कर्तव्ये सांगतांना शंभूराजांनी राजाचे दोष सांगितले आहेत. ते म्हणतात, अत्यंत कठोर राहणे, टोचून बोलणे, मृगया करणे (गरीब प्राण्याची हत्या करणे), दूरच दूर जाणे, सुरापान करणे(मद्यादींचे सेवन), द्यूत(जुगार) आणि स्त्रीचे व्यसन. हे सप्त दोष म्हणजे राजाची संकटे आहेत. त्याने त्यांपासून दूर राहावे.


शंभूराजे म्हणतात, राजाच्या राज्यांगामध्ये स्वामी (स्वयं राजा), अमात्य, देश, दुर्ग, कोश, बल (सैन्य), शासन आणि मांडलिक राजे वा मित्र यांचा समावेश होतो. 

प्रधान वा मंत्रिमंडाळातील लोकांविषयी शंभूराजे म्हणतात, माता पित्यांच्या वंशातील पूर्वज जाणणारा, स्मृतीग्रंथातील सिद्धांत ज्ञात असणारा, तह व आक्रमण अशी तडजोड करण्यात प्रविण असलेला मंत्री राज्याच्या वृद्धीसाठी योग्य आहे. तसेच राजाने वंशपरंपरागत सेवा करणारे स्थिर व शिलवान अशा मंत्र्यांची नेमणूक करून त्यांच्याबरोबर राष्ट्रविषयक बाबींची चर्चा करावी.

शौर्यशंभू पृ.१७४

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

#faktitihas #sambhajimaharaj

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts