मित्रांनो,
अहमदशहा अब्दालीने लाहोर आणि मुलतान हे सुभे मार्च १७५२ मध्ये जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केले. इ. स. १७५७ च्या मार्च महिन्यात त्याने सरहिंदचा सुभा मोगलांकडून घेतला. यामुळे सगळा पंजाब सुभा अफगाणांच्या अंमलाखाली आला. अफगाणिस्तानला परत जाण्यापूर्वी अहमदशहाने आपला मुलगा तैमूरशहा यास लाहोरचा सुभेदार म्हणून नेमले. तैमूरशहा हा त्या वेळी अकरा वर्षांचा असल्यामुळे, अहमदशहाचा सुप्रसिद्ध सेनापती जहानखान हा लाहोर येथे राहून प्रत्यक्ष कारभार पहात होता. पंजाबचा माजी सुभेदार मुइनुल्मुल्क याची विधवा मुगलानी बेगम हिला, आपल्याला सुभेदारी मिळेल अशी आशा होती. पण अहमदशहा अब्दालीने, तैमूरशहा हा तुझा मानलेला भाऊ आहे, तुला प्रत्यक्ष सुभेदारी हवी कशाला, असे बोलून तिची निराशा केली. ती लाहोरात राहू लागली. त्यानंतर मात्र जहाँनखानाने तिला जवळपास आपल्या ताब्यात ठेवले. तिच्या घरादारांची लूट केली.
मुगलानी बेगमचा कारभारी तहमासखान हा इ. स. १७५७ आणि १७५८ मध्ये लाहोरात होता. त्याने आपल्या आत्मचरित्रात त्या काळातील घडामोडींचे वर्णन केले आहे. हा ग्रंथ फारसी भाषेत लिहिला असून त्याचा अनुवाद सेतू माधव पगडी यांनी केला आहे.
त्यातील काही निवडक घटनांचा अभ्यास केल्यावर मराठ्यांच्या लाहोर, सरहिंद, दुआब या प्रांतातील हालचाली लक्षात येतील.
सन १७५७, नुकताच अबदाली दिल्ली लुटून अफगाणिस्तान कडे निघून गेलेला असतो. रघुनाथराव पेशवा मल्हारराव आणि इतर सरदारांसह प्रचंड सैन्य घेऊन दिल्लीमध्ये छावणी करून बसलेले असतात. आणि याच सुमारास वायव्येकडील आसमंतातील वातावरण बदलू लागते.
तहमासखान लिहितो-
'सरहिंदहून दोन अफगाण स्वार लाहोरकडे येत होते. वाटेत बोरा रामदास नावाचा किल्ला होता. किल्ल्याच्या हद्दीत असताना ते मारले गेले. ही खबर वजीर जहानखान (अब्दालीचा लाहोर येथील व्यवस्थापक) यास कळली. त्याने ताबडतोब काही स्वार त्या किल्ल्याच्या चौधरी विरुद्ध पाठविले. चौधरी हा शीख असून मातबर सरदार होता (सोधी बरभाग सिंग). तो लाखो रुपयांचे व्यवहार करी. अफगाणांनी त्याचा इतका भयंकर छळ केला (डिसेंबर १७५७) की तो आपले घरदार सोडून पळून गेला. अफगाणांना त्याचा शोध लागला नाही. त्यांना निराश होऊन लाहोरास परत यावे लागले. त्या दिवसापासून प्रांतातील शांतता नाहीशी झाली. शिखांनी चहूकडे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.'
आदीनाबेगखान-
पंजाबातील जालंधर दुआबाचा अधिकारी आदीनाबेगखान याला अफगाणांचे वर्चस्व नाईलाजाने मान्य करावे लागले होते.
वर्षाला, मी छत्तीस लाख रुपये दुआबा बाबत देत जाईन असे त्याने अब्दालीला कबूल केले होते. मात्र त्याने एक अट घातली होती. ती ही की, आपल्यावर लाहोरच्या अफगाण दरबारात हजर होण्याची सक्ती करण्यात येऊ नये. आपण ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या प्रमाणात रकमांचे हप्ते भरत जाऊ. यासंबंधी व्यवस्था करण्यासाठी आणि अफगाणांशी जाबसाल करण्यासाठी आदीनाबेगखान याने आपला वकील दिलाराम यास लाहोर येथे नेमला. अफगाणांनी या अटी कबूल केल्या होत्या. असे असूनही जहानखानाने आपल्या अधिकाऱ्यांना आदीनाबेग याजकडे पाठवून त्याला तातडीने लाहोरला येऊन हजर होण्याची आज्ञा केली. आदीनाबेग याने लाहोरास जाण्यास साफ नकार दिला. तो दुआबा सोडून दुर्गम अशा डोंगरात पळून गेला. हे पाहून जहानखान याने सरफराजखान अफगाण याची दुआब्याचा अधिकारी म्हणून नेमणूक केली. दुआब्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला पाठविण्यात आले. गुफरानखान यास काश्मीरच्या सुभेदारीवर पाठविण्यात आले. खाजा मिर्जाखान मोगल याची पण प्रांताच्या बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली. पण याचा काही उपयोग झाला नाही. सर्फराजखान आणि गुफरानखान यांच्या फौजा अपयश पत्करून आणि मार खाऊन परत आल्या. प्रांतात बंडाळी सुरू झाली. खाजा मिर्जाखान हा डोंगरातून कूच करीत आदीनाबेग याला जाऊन मिळाला आणि अफगाणांच्या सर्वच फौजा मार खाऊन परत येऊ लागल्या. बंडाळीची झळ खुद्द लाहोर शहराला जाणवू लागली. रोज रात्री एक एक हजार शीख लाहोरवर हल्ले करू लागले आणि शहराबाहेर असलेले पुरे जाळून फस्त करू लागले. पण त्यांचा प्रतिकार करण्यासाठी शहरातून अफगाणांचे सैन्य बाहेर पडेना. जहानखानाच्या आज्ञेने संध्याकाळ होताच एक तासाच्या आत शहराचे दरवाजे बंद करण्यात येऊ लागले.
सारांश, आदिनाबेग, मिर्झा खान आणि शिख यांनी अफगाणां विरुद्ध बंड पुकारले होते.
आदीनाबेग मराठ्यांना आमंत्रण देतो-
आदीनाबेगखान हा दुआब्याचा फौजदार होता, हे वर सांगितलेच आहे. पंजाबचा माजी सुभेदार अब्दुस्समदखान याच्या वेळेपासून तो दुआब्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या इलाख्याची व्यवस्था उत्तम ठेविली होती. त्याच्यापाशी दहा हजार स्वार आणि पायदळ असे सैन्य होते. त्याच्या इलाख्यात अव्यवस्था अशी कधीच दिसून आली नाही. न्यायदानात तो चोख होता. त्याच्या जागी अफगाण सरदार सर्फराजखान हा दुआब्यावर अधिकारी म्हणून आला. त्याच्या सैन्याचा पराभव होऊन त्याला परत जावे लागले. आदीनाबेग याने विचार केला की अफगाण माझ्याविरुद्ध आहेत. त्यांच्यासमोर आपण किती दिवस टिकाव धरू शकू, हा प्रश्नच आहे. अफगाणांचा काटा निघू शकेल अशी काहीतरी तजवीज केली पाहिजे.
त्या वेळी राघोबा आणि मल्हारराव हे दोन लाख सैन्यासहित दिल्ली येथे छावणी करून होते. आदीनाबेगखान याने त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. मराठ्यांनी आपल्या मदतीला यावे. ते कूच करतील तेव्हा प्रत्येक दिवशी त्यांना एक लाख रुपये देण्यात यावेत, आणि मुक्काम करतील तेव्हा त्यांना त्या त्या दिवसाचे रोजी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत असे ठरले.
सरहिंदचा ताबा-
१७५८ चा मार्च महिना उजाडला, कडाक्याचा हिवाळा ओसरला असला तरी हवेतला गारवा अजूनही कायम होता. १७५७ च्या उत्तरार्धापासून उत्तर भारतात असलेली मराठा फौज आता सतलज नदीच्या किनारी येऊन धडकली होती. पंजाबातील शिख सैनिक आणि आदीनाबेगखान हे सरहिंदजवळ मराठ्यांना सामिल झाले.
सरहिंद येथे अफगाणांच्यातर्फे समदखान हा फौजदार होता.
२१ मार्च १७५८. चंदीगढजवळ असणाऱ्या सरहिंदच्या किल्ल्याला शीख आणि अदिना बेगच्या सैनिकांनी दोन आठवडे वेढा दिलेलाच होता. मराठा सैनिक आल्यावर अंतिम चढाई झाली आणि सरहिंदचा किल्ला पडला.
जहाँनखानाची मराठ्यांच्या विरुद्ध तयारी-
तहमासखान म्हणतो'
मराठ्यांचे, सरहिंदचा फौजदार समदखान याच्याविरुद्ध युद्ध सुरू झाले हे ऐकून वजीर जहानखान याने समदखानाच्या कुमकेसाठी आपले सैन्य रवाना करण्याची तयारी केली. मुगलानी बेगम हिला आपण वाईट रीतीने वागविले. तिला मोकळी सोडणे बरोबर होणार नाही. नाही तर आणखी एखादे विघ्न उभे राहावयाचे, असा विचार करून जहानखानाने तिला तैमूरशहा (सुभेदार) याच्या वाड्यात कैद करून ठेवली.
...या सुमारास बातमी आली की मराठ्यांनी सरहिंद ताब्यात घेतले असून समदखान फौजदार यास कैद केले आहे. (२१ मार्च १७५८). हे ऐकताच आमच्या करावलीच्या पथकाचे धाबे दणाणले. त्यांनी माघार घेतली. दोन दिवसांत ते नदी ओलांडून परतले. वजीर जहानखान हा काळजीत पडला. त्यानेही कूच करून बियास नदी ओलांडली. काठावर तो थांबला. पण तेथेही टिकून राहाण्याचे त्याला धैर्य झाले नाही. तेथून निघून तो जलालाबादेच्या दिशेने रवाना झाला. तेथे त्याने नदीच्या काठी आठ दिवस मुक्काम केला. करावलीची पथके दहा दहा कोस मजला मारून शत्रूच्या फौजांच्या दिशेने जाऊन टेहेळणी करून येत.
सरहिंद घेतल्यानंतर मराठ्यांनी ते शहर मागे टाकले आणि ते सतलजच्या काठावर आले. वजीर जहानखान हा जलालाबावेहून निघून चार दिवसांत लाहोरला आला.
अर्थात पंजाबात आपल्याविरुद्ध कारवाया होत असलेल्या पाहून अब्दालीचा सेनापती जहान खान चालून येऊ आला. पण मराठा-मुगल-शीख अशा तिहेरी ताकदीसमोर आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात घेऊन जहान खाननं राजपुत्र तैमूरशहा याची आई आणि इतर सरदारांसह लाहोर शहरांतून निघून अफगाण लष्कराच्या छावणीत माघार घेतली.
यावेळी स्वतः अब्दाली अफगाणिस्तानातली अंतर्गत बंडाळी शमवण्यात व्यग्र होता.
मराठे लाहोर घेतात-
तहमासखान म्हणतो, 'याच सुमारास बातमी आली की, आदीनाबेगखान याने मराठ्यांची फौज बरोबर घेऊन दुआबा पार केला आहे. तो आता लाहोरकडे येत आहे. दुपारच्या वेळी (एकोणीस एप्रिल १७५८) राजपुत्र तैमूरशहा याने नदी (रावी) ओलांडली. वजीर जहानखान पण त्याच्या पाठोपाठ घोड्यावर स्वार होऊन निघाला. अफगाण छावणीतून सामान हलविण्यात येऊ लागले. वजिराच्या जनानखान्याचे खोजे होते. त्यांनी बायकांना उंटावर स्वार करून नेले. मी, बेगम आणि तिची मुलगी यांना रथात बसवून शहरांत घेऊन आलो आणि त्यांना वाड्यात उतरविले. मी परमेश्वराचे आभार मानले. बेगमेने तर मला खूप धन्यवाद दिले. ती इतरांसमोर म्हणाली, 'तहमासखानाने माझी फार मोठ्या संकटांतून सुटका केली आहे.
...त्यानंतर मी तेथून निघून बाहेर आलो. शहराचे सर्व दरवाजे मी बंद करविले. रात्रभर मी साऱ्या शहरात गस्त घालीत होतो.
वीस एप्रिल १७५८-
दुसऱ्या दिवशी (वीस एप्रिल) सकाळी एक प्रहर दिवस आला असता (नऊच्या सुमारास) मराठ्यांचे पाचशे स्वार व खाजा मिर्जाखान याचे शंभर स्वार आणि आशूरखान हे लाहोरच्या दिल्ली दरवाज्यावर पोहोचले. त्यांनी मला हुकुमाचा कागद दिला. मी त्याच वेळी लाहोरचा दिल्ली दरवाजा उघडला आणि शहर त्यांच्या हवाली केले. नंतर मी आपल्या घरी परतलो."
दुसऱ्या दिवशी (एकवीस एप्रिल १७५८) खाजा मिर्जाखान याचे एक हजार मोगल आणि दहा हजार मराठे स्वार (मानाजी पायगुडे याच्या नेतृत्वाखाली) हे लाहोरला लागून रावी नदी वाहात होती, तिच्या काठावर पोहोचले. त्याच दिवशी सकाळी राजपुत्र तैमूरशहा हा तेथून निघून गेला होता. पण त्याने आपला सरदार मीर हजारखान यास काही हजार स्वार बरोबर देऊन मागे ठेवले होते. न जाणो काय प्रसंग येईल, म्हणून त्याने ही व्यवस्था केली होती. खाजा मिर्जाखानाने रावी ओलांडली आणि तो हजारखानावर तुटून पडला. हजारखान याने शक्य तितके धावपळीचे युद्ध केले. शेवटी मराठ्यांनी त्याला चहूकडून वेढले आणि त्याच्यावर हल्ले करून त्याला कैद केले.
ही बातमी तैमूरशहा आणि जहानखान यांस कळली. ते अतिशय घाबरले. ते तडक पळत सुटले आणि वजिराबादेजवळ चिनाब नदी वाहाते तेथे ते पोहोचले. काही निवडक दुराणी पथकांसहित त्यांनी सुरक्षितपणे चिनाव नदी ओलांडली. पण त्यांची सर्व छावणी, सरंजाम इत्यादी नदीच्या अलीकडे राहिली. खाजा मिर्जाखान याच्याबरोबर दहा हजार मोगल आणि वीस हजार मराठे असे सैन्य होते. या सैन्यानिशी त्यांनी अफगाणांचा पाठलाग केला. थोड्याच दिवसांत त्याने अफगाणांचा सर्व सरंजाम लुटला. ही सर्व मालमत्ता लाहोरास आणण्यात आली. यांतील बराचसा भाग मराठ्यांच्या वाट्याला गेला. उरलेला भाग आदीनाबेगखान याने घेतला. अफगाणांची जी मालमत्ता आदीनाबेगखान आणि मराठे यांच्या हाती पडली ती अगणित होती. यामुळे मिर्जाखानाच्या सैन्यातील प्रत्येक मनुष्य गबर बनला. कित्येक दिवसपर्यंत रोज अफगाणांचे घोडे धरून आणण्यात येत. अफगाण सैन्यातील उजबेक आणि किजलबाश सैनिक बंदी होऊन आले होते. त्यांना आदीनाबेग याने आपल्या नोकरीत घेतले. ख्वाजा मिर्जाखान याचा भाऊ सईदखान याच्यापाशी बरेच घोडे जमले. त्यांपैकी चाळीस घोडे त्याने माझा मित्र कासिमखान यास दिले. आदीनाबेगखान, राघोबादादा, मल्हारराव होळकर हे काही दिवस लाहोरात राहिले. यानंतर मराठे सरदार राघोबादादा, मल्हारराव, तुकोजी होळकर, दत्ताजी पटेल हे मीर हजारखान यास घेऊन दक्षिणेकडे रवाना झाले (मे १७५८). "
लाहोरच्या सुभेदारीवर ख्वाजा मिर्जाखान याची नेमणूक झाली. आदीनाबेग आणि मराठे सरदार लाहोर सोडून निघाले.
अटकेवर झेंडा-
अशा रीतीने वीस एप्रिल १७५८ रोजी, लाहोर मराठ्यांच्या हाती पडले आणि अफगाणांना पंजाबातून हाकलून लावण्यात आले.
सरहिंद ते लाहोर हे सुमारे २१७ किलोमीटरचं अंतर आहे. या समग्र टापूत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाल. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखालची मराठा फौज पुढे ९ दिवसांत मराठ्यांनी 'अटक' गाठलं आणि जिंकलं.
पेशावरवर ताबा-
तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे या दोन वीरांच्या पलटणी शत्रूवर चालून गेल्या आणि पुढे पेशावरपर्यंत पोचल्या. मराठ्यांनी पेशावरही जिंकलं. मराठा साम्राज्याची ध्वजा अटकेपार नेली. अतुल्य पराक्रमाची उपमा म्हणून मराठी भाषेत असलेली 'अटकेपार झेंडे लावले' ही म्हण इथेच जन्माला आली.
मराठा मुलुखापासून इतक्या दूर पंजाबात बस्तान बसवणं मराठ्यांच्या प्राथमिकतांमध्ये बसत नव्हतं.
जहानखान तैमूरशहास घेऊन पळून स्वदेशी गेला होता. मराठ्यांनी अटकेला आपला अंमल प्रस्थापित केला. सर्व सामान-सुमान, संपत्ती व सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश हस्तगत करून तेथे आपला अंमल प्रस्थापित केला. नरसोजी पंडित याला अटकेस ठेवून तुकोजीला पेशावरला ठेवण्यात आले. रघुनाथरावाने लाहोरला एक महिना मुक्काम केला. आदिनाबेग मोगल त्या प्रदेशात प्रबळ व प्रामाणिक आहे. अशा समजुतीने रघुनाथरावाने लाहोर व मुलतान हे दोन मोगल सुभे पाऊण कोट रुपयांच्या कमाविशीने त्याला दिले. पाऊस सुरू झाल्यामुळे रघुनाथराव दक्षिणेकडे परतला.
सर्व भारतभर अपला अंमल बसवावा हे मराठ्यांचे स्वप्न अटकेपर्यन्त पोहोचल्यामुळे पुरे झाले होते खरे, पण ते टिकवणे अर्थातच कठीण होते. पंजाबमध्ये मराठ्यांची सत्ता प्रबळ नव्हती. मरठ्यांची सत्ता पंजाबमध्ये असणे हे दिल्लीच्या मर्जीवर असून तेथून मराठ्यांना काहीही मदत मिळत नव्हती. पंजाब, दुआब व आग्रा येथे पसरलेल्या मराठ्यांच्या सैन्याला पुरवठा करणारे व आसरा देणारे मुख्य केंद्र नव्हते. रजपूत मराठ्याच्यांविरुद्ध होते व आपल्या किल्ल्यांचा आधार घेऊन जाट जमीनदार मराठ्यांची सत्ता जुमानत नव्हते. आपल्याला सांभाळता न येणारे पंजाबचे निष्कारण लोढणे मराठयांनी गळ्यात अडकवून तर घेतले नव्हते.?
पंजाब महाराष्ट्रापासून अत्यंत दूर असा प्रांत होता. रस्ते चांगले नसल्यामुळे वाहतूक हळू असे व मधील इतर लोकांच्या राज्यातून महाराष्ट्र-पंजाब दळणवळण राखणे कठीण होते. अत्यंत कडक उष्ण व अत्यंत थंड अशा पंजाबच्या वातावरणात लढण्याची मराठ्यांना सवय नव्हती. त्वरित नद्या ओलांडणे हे उत्तम नावांच्या व सरावाच्या अभावी मराठे करू शकत नव्हते. त्यामुळे सैनिकी व्यवहारात मराठे असमर्थ होते. बंड करणाऱ्या स्वातंत्र्योत्सुक शिखांना कह्यात ठेवणे मराठ्यांना कठीण होते. पंजाबसारख्या अपरिचित प्रांतातून प्रबळ सेनेच्या अभावी उत्पन्न मिळविणे कठीण होते.
पंजाब हा सरहद्द प्रदेश असल्यामुळे परकीयांच्या सतत स्वाऱ्या तेथे होत. अहमदशहा अबदालीला उजाड अफगाणिस्तानाच्या शेजारीच असलेला सुपीक पंजाब आपल्या सत्तेखाली हवाच असे वाटत होते. त्या पंजाबचा ताबा मराठ्यांनी घेतल्यामुळे अबदालीच्या तोंडचा घासच पळविल्यासारखे झाले होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवा मुलुख टिकवण्यासाठी पेशवाई केंद्र सत्तेचे कमजोर नियोजन होय.!!!
रघुनाथराव दिल्लीवरून 'राजपुताना व माळव्यातून सप्टेंबर १७५८ त पुण्यात आला. वाटेत जोधपूर येथे जनकोजी व दत्ताजी शिंदे त्याला भेटले.
पंजाबमध्ये सुव्यवस्था प्रस्थापित केल्यानंतर पूर्वेकडे बिहार व बंगाल येथून खंडणी वसूल करावी, अशा शिंद्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. दक्षिणेत व उत्तर भारतात केलेल्या मोठ्या सैन्य भरतीमुळे पेशव्यांचे कर्ज सपाटून वाढलेले होते. आर्थिकदृष्ट्या रघुनाथरावांची स्वारी तुटीची झाल्यामुळे शिंद्याने धोरण कडक करून खंडणी गोळा करावी व निदान १ कोटी रुपये तरी पेशव्यास पाठवावे, अशी सूचना देण्यात आली.
दत्ताजींची पंजाबवर स्वारी आणि व्यवस्थापन : १७५९
जनकोजी शिंद्यांची सेना इ. स. १७५८ च्या मध्यात राजपुतान्यात आली. चार महिने मारवाड, जयपूर, कोटा व शहापूरा येथील खंडणी वसूल करण्यात गेले. नंतर जनकोजी दिल्लीकडे वळले. दत्ताजीही त्यांना येऊन मिळाले. वजीर इमादने दत्ताजींना ७ लाख रुपये देऊन पंजाबातील सरहद्दी बळकट करण्यास सांगितले. इ. स. १७५९ च्या मार्चच्या सुरुवातीस सतलज नदीजवळील मच्छीवाडा येथे ते आले. साबाजी शिंद्याकडून पंजाबची सर्व हकीगत दत्ताजींना कळली. शीख लोक सत्ता मिळविण्याच्या मागे असल्यामुळे त्यांच्या मदतीच्या बाबतीत दत्ताजींना अडचण निर्माण झाली. आदिनाबेगच्या मुलाने दत्ताजीला खंडणीचा काही भाग आणून दिला. साबाजी शिंदे यांना पेशावर येथे ठेवून तुकोजी शिंदे यांना अटक येथे तैनातीत ठेवण्यात आले. रोहटस येथे बापूराव व लाहोर येथे नारो शंकर यांची त्यांनी योजना केली.
साबाजीजवळ दहा हजार घोडेस्वार होते. साबाजीने पेशावर इ. स. १७५९ च्या मार्चमध्ये सोडले.
साबाजी शिंदे पेशावरात नाहीत हे पाहून मराठ्यांपुढे एकदा माघार घ्यावी लागलेल्या अब्दालीचा सेनापती जहानखानानं पुन्हा पंजाबची वाट धरली. पेशावर, अटक असं एक एक ठाणं पादाक्रांत करत जहान खानाचं सैन्य रोहतस किल्ल्यापाशी आलं. परंतु शिखांच्या मदतीने साबाजी शिंदेंनी झेलम नदीच्या पलीकडे जहानखानचा पराभव केला. जहान खानाला आपला मुलगा गमवावा लागला, तो स्वतःही जखमी झाला. मराठ्यांनी पेशावरपर्यंतचा मुलुख पुन्हा काबीज केला.!
साबाजींच्या पराक्रमाची शर्थ म्हणावी लागेल.!!
अर्थात मराठ्यांची या मुलाखात पकड नव्हती असे एकदम म्हणता येणार नाही. साबाजी सारखे मातब्बर शूर योद्धे मुख्य मुलूखापासून एवढे दूर सार्थ पराक्रम करीत होते.
अब्दालीची स्वारी : १७५९
मराठयांनी अहमदशहा अबदालीचा पुतण्या अबदुल रहिमखान याला अटक येथे पेशावरचा सुभा देण्याचे ठरविले. व पकडलेल्या समदखानास अबदालीकडे पाठवावे असेही ठरवले.
पंजाबमधील काम पुरे न करता दत्ताजी महाराज शिंदे परतले, याचे कारण पंजाब हे रघुनाथराव व मल्हारराव यांचे क्षेत्र आहे, आपले तेथें काम नाही, असा त्यांचा समज झाला असावा किंवा ठेवलेले स्वार सरदार आक्रमण थोपवण्यास समर्थ आहेत असे त्यांना वाटले असावे. शिवाय हा मुलगा टिकवण्यात केंद्र सत्तेचे नियोजन दिसत नाही.
असो, जहानखान व तैमूरशहा यांना मराठ्यांनी हुसकाविल्यामुळे अबदालीने मराठ्यांना प्रतिटोला देण्याचे ठरवून तो चालून आला. आपल्या सेनापतीचा पराभव पाहून चिडलेला अब्दाली एव्हाना अफगाणिस्तानातले बंड मोडण्यात यशस्वी झाला होता. आणि आता तो मराठ्यांच्या घशात गेलेला मुलुख परत मिळवण्यासाठी पंजाबवर पाचव्यांदा चढाई करण्यासाठी सज्ज झाला ते साठ हजारांचं विशाल सैन्य घेऊन!
पुरामुळे सिंधू नदी ओलांडण्यास त्याला वेळ लागला. नोव्हेंबर १७५९ च्या सुमारास त्याची पहिली तुकडी पंजाबमध्ये उतरली. अबदाली लाहोरवर आला व साबाजी शिंद्यांनी घाईघाईने माघार घेतली. ते ताबतोब दिल्लीस निघून आले. अंजलीच्या प्रचंड सैन्याला तोंड देणे शक्य नव्हते. २७ नोव्हेंबरला सरहिंद घेऊन मराठ्यांचा विरोध बाजूला करून दिल्लीच्या उत्तरेस चार ठिकाणी यमुना नदी ओलांडण्याचा अबदालीने प्रयत्न केला. पण मराठे त्याला अडवू शकले नाहीत. मराठ्यांचे तेवढे सैन्य या भागात राहिले नव्हते. शेवटी बुराडी घाटाच्या लढाईत दत्ताजी महाराज शिंदे ठार झाले आणि पानिपताच्या युद्धाचे बिगुल वाजले..!!!
मात्र आपल्या महत्त्वाकांक्षी वायव्य मोहिमेत पादाक्रांत केलेला पेशावर, अटक, लाहोर, सरहिंदचा प्रदेश मराठ्यांना १८ महिन्यांत गमावावा लागला.
खरेतर रघुनाथरावांच्या स्वारीत हा मुलुख ताब्यात आला खरा मात्र पेशवाई केंद्र सत्तेला तो टिकवण्यासाठी त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे होते तसे तिकडून झालेले दिसत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.!
पेशावर येथील साबाजी शिंदे, अटक येथील तुकोजी शिंदे, रोहटस येथील बापूराव, लाहोर येथील नारो शंकर हे सारे शूर सरदार होते. साबाजी शिंदे यांनी तर जहाँनखानाला पुरतेच परास्त केले होते! अर्थात मराठे शौर्यात कुठे कमी पडले नाहीत. अभाव होता तो केंद्र सत्तेच्या नियोजनाचा..! अफसोस, तलवारीच्या शौर्याला ढालीचे नियोजन प्राप्त झाले नाही.!
असो अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा..!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
#attok_fort, #panipat
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट