Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

स्वारी बुऱ्हानपुर...



मित्रांनो, स्वारी बुऱ्हानपुर म्हणजे शंभू छत्रपतींच्या शौर्याचा आणि गनिमी तंत्राचा अप्रतिम नमुना होय.

बुऱ्हानपूर... तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले बसना नावाचे खेडे जे नासिर फारुकीच्या कारकिर्दीत दौलताबादचा संत बुऱ्हानुद्दीन याची यादगिर म्हणून बुऱ्हानपुर असे प्रचलित झाले.  बुऱ्हानपुरचा प्रमुख किल्ला असिरगड जो फारुकीने अहिरांकडून बळकावला तो सन सोळाशे मध्ये अकबराने ताब्यात घेतला आणि खानदेशचा प्रदेश मुघलांच्या ताब्यात आला. अकबराने बुऱ्हानपुरात जामा मशीद नावाची भव्य वास्तू बांधली. हळूहळू हे शहर भरभराटीस आले आणि मुघलांच्या दक्षिणेतील छावणीच्या मुख्यालयाचे स्वरूप त्याला प्राप्त झाले. दक्षिणेतील मोहिमा अर्थात अहमदनगर असो वा विजापूर किंवा हैदराबाद, मोगली फौजांचे सर्व नियंत्रण व आक्रमण येथूनच संचलित होत असे. लष्करी व राजनैतिक हालचालींचे केंद्र बनल्याने बडे मोगल सुभेदार व अमीर-उमराव येथे वास्तव्यास राहिले. मुघल साम्राज्यातील क्रमांक दोन चे भाग बगीचे आणि उद्यानाचे शहर म्हणून ते प्रसिद्धीस आले. कलाकुसरीचे आणि चांदी- सुवर्णतारा गुंफण्याची सुबक कारागिरीची कमाल दाखविणारे हे शहर होते. नैसर्गिक जलसंपन्नता असल्याने हा मुलुख अतिशय भरभराटीस आला होता. 

अकबर, जहांगीर, शहाजहान यांच्या सामरीक व कौटुंबिक जीवनाशी निगडित भावभावनांचे हे शहर होते. औरंगजेबाची माता व शहाजहान ची पत्नी मुमताज महल ही बाळंतपणात येथेच वारली. औरंगजेबाचा धाकटा भाऊ शहासुजाची पत्नी येथेच वारली. औरंगजेबाच्या दोन्ही बहिणींचा जन्म येथेच झाला. औरंगजेबाची दोन्ही मुले आजम आणि मोअज्जम हे सुद्धा येथेच जन्मले. औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना तो बुऱ्हानपुरला थांबला असता त्यावेळी आपल्या मावशीच्या जनानखान्यातील एक गुलाम स्त्री हिराबाई हिला औरंगजेबाने जैनाबादी बागेत पाहिले व तो तिच्या प्रेमात पडला.

असे हे शहर मोगलांच्या प्रतिष्ठेचे व भावभावणांचे एक प्रतीकच बनले होते.


भौगोलिक व प्रशासकीय दृष्ट्या उत्तर व दक्षिणेला जोडणारे हे एक प्रसिध्द नाके होते व ज्यास मोगल आपल्या साम्राज्याचे दक्षिण द्वार मानत होते. आणि आता या द्वारावर धडक मारण्यासाठी मराठे दौडत येत होते.!

१६ जानेवारी १६८१, रायगडावर स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा शंभूराजांचा राज्याभिषेक पार पाडला होता. काही दिवस लोटत नाहीत तोच शंभू छत्रपतींनी नव्या मोहिमेची आखणी केली होती.

छत्रपती शंभूराजे आपल्या बुधभूषण या ग्रंथातील राजनीतीच्या अध्यात म्हणतात की, धनसंचय ज्याचे चिलखत आहे व हेर ज्याचे नेत्र आणि दूत ज्याचे मुख आहे असा हा राजा असतो. 

अर्थात आपल्या राज्याला बळकटी आणण्यासाठी स्वारी आणि ती यशस्वी करण्यासाठी तेज हेर यंत्रणा शंभूराजांनी कार्यास लावली होती.! 

मराठ्यांच्या हालचालींविषयी चोपड्याचे इंग्रज वखारवाले सुरतेच्या अधिकाऱ्यांना लिहितात की, मराठ्यांचे सैन्य बाहेर पडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी सुरतेकडे, दुसरी बुऱ्हानपुर कडे व तिसरी बहादुरखान जो दक्षिणेकडे गेला आहे त्यावर जात आहे.


३० जानेवारी १६८१ रोजी शंभूराजे सेनापती हंबीरराव मोहिते २०००० स्वारांच्या फौजेसह मोगलांच्या या खानदेश सुभ्याच्या राजधानीवर चालून गेले. बुऱ्हाणपुरचा मोगल सुभेदार खानजहान बहादुरखान हा यावेळी औरंगाबादेस होता. त्याचा नायब काकरखान अफगान हा जिझियाकर वसूली अधिकारी म्हणून बुऱ्हाणपुरास होता. काकरखानाकडे तीनशे पेक्षा जास्त सैन्य नव्हते. अर्थात ही खबर संभाजीराजांना असावी. शहर महत्त्वाचे असल्याने मजबूत तटबंदीने वेष्ठित होते. पण तटबंदीच्या बाहेरही शहराचा विस्तार मोठा होता. हंबीरावांच्या फौजेस तटबंदीमुळे शहरात शिरता आले नाही मात्र तटाबाहेरील अनेक संपन्न पुरे त्यांनी लूटावयास सुरुवात केली.


सुप्रसिद्ध मोगल इतिहासकार खाफीखान हा या हल्ल्याच्यावेळी नर्मदेवरील येणाऱ्या-जाणाऱ्या घाटांवर देखरेख अधिकारी या नात्याने ‘मीर बहर’ म्हणून काम पाहात होता. प्रत्यक्षदर्शी अनुभवलेल्या या हल्ल्याचे तपशीलवार वर्णन त्याने आपल्या ग्रंथात केले आहे. तो लिहीतो-

'सुमारे विस हजार स्वारांनिशी तो 'दुष्ट संभाजी' वऱ्हाडात उच्छाद घालीत फिरत होता. बुहाणपुरापासून वऱ्हाडचा मुलूख उद्ध्वस्त करून तो पस्तीस कोसांची मजल मारुन एकाएकी बुहाणपुरावर चालून आला. काफरांची फौज कुठल्याही दिशेने बुहाणपुरावर येईल अशी मुळीच कल्पना नव्हती. तशी बातमीही पसरली नव्हती. बुहाणपुरापासून दीड कोसावर बहादुरपुरा म्हणून एक पुरा आहे. तो अतिशय संपन्न होता. लक्षाधीश असे सराफ सावकार तिथे राहात.

देशोदेशीचे जिन्नस, जडजवाहीर, सोने, नाणे, रत्ने असा लक्षावधी रुपयांचा माल तेथील दुकानातुन साठविला होता. तो सर्व मराठ्यांनी लुटला. मराठे अगदी अनपेक्षितपणे आले. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादुरपुरा आणि इतर सतरा पुरे होते. त्यांना मराठ्यांनी घेरले. विशेषतः बहादुरपुऱ्यावर ते इतक्या अनपेक्षितपणेतुटून पडले की त्या पुऱ्यातून एक माणूस किंवा एक पैसा लोकांना हलविता आला नाही. पुऱ्यात आगी लागून त्यांचा धूर आकाशपर्यंत पोचला. तेव्हा कुठे बुहाणपुरचा नायब आणि शहरातील इतर लोक यांना मराठे आल्याची खबर कळली. काकरखानापाशी मराठ्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती नव्हतीच. त्याने शहराचे दरवाजे बंद केले आणि तो तट, बुरुज, वेशी इत्यादींचा बंदोबस्त करु लागला. हसनपुरा, शहागंज, शहाजहानपुरा, खुर्रमपुरा, नबाबपुरा इत्यादी सतरा पुरे शहराच्या तटाला लागून होते. ती जणू काही शहराची केंद्रे होती. प्रत्येक पुऱ्यात लाखो रुपयांचा माल सराफ, व्यापारी इत्यादींच्या पाशी होता. मराठ्यांनी ते सर्व पुरे ताब्यात घेतले. त्यांची लूट करू न त्यांनी आगी लावून दिल्या. काही अब्रुदार माणसांनी आपल्या बायकांना ठार मारले आणि ते स्वतः लढत लढत मारले गेले. कित्येक जण परमेश्वरावर हवाला ठेवून बसले. शहराच्या तटाला लागून असलेले अनेक लोक आपल्या बायकापोरांना घेऊन त्या भयंकर संकटातून मोठ्या कष्टाने निघून शहाराच्या आत पोचले. तीन दिवसपर्यंत मराठे निःशंकपणे हे पुरे लुटीत होते. त्यांना मुबलक लूट मिळाली. अनेक वर्षांची जमिनीखाली पुरलेली संपत्तीही त्यांच्या हाती पडली. या संपत्तीचा घरमालकांनाही पत्ता नव्हता. तो मरठ्यांनी शोधून काढून हस्तगत केली. मराठ्यांनी शिड्या लावून तटावर चढण्याचा प्रयत्न केला. शहरातील मन्सबदारांनी वेशी, तट, बुरुज इत्यादी ठिकाणी मोर्चे बांधून निकराने मराठ्यांचा प्रतिकार केला. त्यामुळे ते शहरात जाऊ शकले नाहीत. मराठ्यांनी सोने, चांदी, जडजवाहिर आणि मूल्यवान सामान घेतले. इतर जिनसांची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी भांडीकुंडी, कार्चेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे इत्यादी टाकून दिले व नंतर ते निघून गेले. ते गेल्यानंतर रस्त्यात जळलेल्या आणि इतर वस्तूंचा इतका सड़ा पड़ला होता की, त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.'


मराठे बहाणपुरच्या भागात पसरल्याची बातमी हेरांच्या द्वारे औरंगाबादेस सुभेदार खानजहानबहादुर कोकलताश याला कळली. त्याने ताबडतोब कूच करून तीन चार दिवसांचा मार्ग एका दिवसात आक्रमिला. तो फर्दापुरच्या घाटापाशी पोहोचला. औरंगाबादेहून हे ठिकाण ३२ कोसांवर आहे. सैन्य कूच करून येत होते. त्यांच्या हालचालीसाठी आणि जनावरांना विश्रांती देण्यासाठी म्हणून खानजहान तेथे तीन-चार प्रहर थांबला. पण खानजहानच्या हितशत्रूंनी उठविले की, संभाजीचा वकील खनजहानला भेटला. त्याने त्याला भक्कम पैसे चारले आणि चारपाच प्रहर आपण येथेच रेंगाळावे म्हणून खानजहानला विनंती केली. मराठ्यांच्यापाशी लूटीचे ओझे बरेच होते. खानजहान आपल्या पाठलागावर आहे याची बातमी त्यांना लागली होती. त्यांचे किल्लेही दूर होते. तेथपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य नव्हते. पण त्यातल्या त्यात जवळ असलेला त्यांचा किल्ला म्हणजे साल्हेरचा असून तो बागलाणात होता. मराठे परगणे चोपडा ऊर्फ मुस्तफाबादच्या वाटेने चालले होते.

अशा स्थितीत खानजहानने फर्दापूरहून डावीकडे वळून धरणगाव आणि चोपडा या गावांची वाट धरून काफरांचा मार्ग अडविण्यास हवा होता. पण गनिमाच्या वकिलाच्या विनंतीवरून तो सारासार विचाराच्या विरुद्ध वागून उजवीकडच्या वाटेने एदलाबादकडे रवाना झाला. गनिमांनी ही बातमी ऐकली. बरे झाले असे त्यांना वाटले. बरोबर असलेली सोने- चांदी इत्यादींची लूट जितकी त्यांना नेता आली तितकी त्यांनी नेली. त्यांनी सगळे कैदी बरोबर घेतले. खानजहान बन्हाणपुरला जाऊन पोहोचेपर्यंत मराठे चोपड्याच्या वाटेने तडक निघून चार-पाच दिसांत साल्हेरला पोहोचले.’

अर्थात खाफिखानही बहादुरखानाने लाच घेतल्याचे समजतो पण ते सत्य वाटत नाही. तो धीमा होता एवढे मात्र खरे. असो,

पुढे खाफिखान म्हणतो- “बुऱ्हाणपुरचे प्रतिष्ठित नागरिक, मौलवी, विद्वान इत्यादींनी बादशहाकडे एक अर्जी पाठविली. “काफरांचा जोर झाला, आमची अब्रु आणि संपत्ती नष्ट झाली. यापुढे शुक्रवारची नमाज बंद पडेल.” असे अर्जीत लिहले होते. यावर बादशहाने खानजहानला चिडून पत्र लिहून कळविले की, “दक्षिणेत काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे.” 

बादशहा खानजहानवर अतिशय चिडला. त्याला मन्सबीची वाढ झाली होती, ती त्याने वहिवाटीविरुद्ध नामंजूर केली. दक्षिणेतील उच्छाद आणि शहाजादा अकबर याचे पलायन या दोन्ही गोष्टींचा विचार करून बादशहाने आपले डेरे बऱ्हाणपुराकडे पाठविण्याचा हुकूम केला.”

खाफिखानाच्या या विस्तृत वर्णनातून बुऱ्हाणपुरच्या स्वारीची तीव्रता कळते. तसेच एवढी प्रचंड लूट आपल्या मूलुखात वाहून नेणे मराठ्यांना शक्य झाले नसते जर जवळच बागलाणचा मुलूख आणि त्यातील साल्हेरचा तो गगनचुंबी आणि बलाढ्य किल्ला शिवछत्रपतींनी कधीकाळी स्वराज्यात आणला नसता तर. 

एवढी प्रचंड फौज घेऊन मराठे बुऱ्हाणपूर पर्यंत दौडत आले याची काहीच पूर्व सूचना मोगलांना कशी नव्हती.? असा प्रश्न निर्माण होतो. तर याचे उत्तर म्हणजे शंभू छत्रपतींचा गनिमी कावा होय. अर्थात बुऱ्हानपूर मोहिमेची मागणी करताना आपण सुरतेवर चालून जात आहोत अशी वंदता खुद्द महाराजांकडूनच उठवण्यात आली होती. त्याचे पडसाद इंग्रजांच्या(चोपडा) पत्रातूनही उमटलेले दिसतात ते आधी सांगितले आहे.

खानजहान बहादुरखान गाफील राहण्याचे हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण होय. याशिवाय एकाच वेळी शंभूराजांनी मराठ्यांच्या इतर तुकड्या सुद्धा विविध ठिकाणी पाठविल्या होत्या त्यामुळे मराठ्यांना लूट घेऊन जाणे सोपे झाले.

अर्थात बेमालूमपणे आकस्मात शत्रूच्या मुलखात स्वारी करणे, शत्रुच्या मनात भय निर्माण करणे आणि शत्रु सावध होण्याआधीच आपले सैन्य सुरक्षितरीत्या आपल्या मुलूखात परत आणणे हे त्याच गनीमीतंत्राचा भाग होता.

जेधे शकावली यास्वारीबद्दल म्हणते- “बऱ्हाणपूर हंबीरराव यांणि मारीला.”

बादशाही अखबारातही याचा उल्लेख मिळतो. बादशहाला १९ फेब्रुवारी १६८१ रोजी बुहाणपुरच्या वृत्तपत्रावरून या लुटीची बातमी समजली तेव्हा त्याने खजण्यातून केवळ दहा हजार रुपये बुऱ्हानपुरच्या लोकांपैकी ज्यांची मालमत्ता सीवाच्या(शिवाजी महाराज) मुलाने(शंभुराजे) लुटली त्यांना जाऊन वाटण्यासाठी दिली.

खरे तर हे हास्यास्पद होते. या प्रचंड लुटीची तुलना केवळ सुरतेच्या लुटीशी करण्यासारखी होती हे खाफीखानाच्या वर्णनावरून लक्षात येते. बहादुरखानास मराठ्यांचा प्रतिकार करता आला नाही म्हणून बादशहाने त्यास भारी ठपका दिला आणि त्याला सुभेदारीवरून बडतर्फ केले. 

यावेळी औरंगजेबाचा बंडखोर शहाजादा अकबरही आपल्या बापाला उपहासाने पत्रातून म्हणतो-“वास्तविक पाहता विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भू-वरील स्वर्गच होय आणि बुऱ्हानपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ होय, पण ते शहर आज उध्वस्त होऊन गेलेले आहे.”

...असो, याच सुमारास शंभूराजांच्या दुसऱ्या फौजा प्रत्यक्ष बादशहाच्या नावाने वसवलेल्या -औरंगाबाद या शहरावर चालून गेल्या होत्या. खुद्द औरंगपुत्र अकबर जून(१६८१) महिन्यात आश्रयासाठी स्वराज्यात चालून आला होता.! कारण आलम हिंदुस्थानात आता आपले रक्षण केवळ शंभूराजेच करू शकतात हे त्याला समजले होते.!

संदर्भ:

शिवकालीन पत्रकार संग्रह

ऐतिहासिक फारशी खंड सहावा,

मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध (तारीखे खाफीखान), जेधे शकावली 

शौर्यशंभू-१८४

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

@chhaavaa_faktitihas

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts