Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

एरया: दख्खनचा महान सिंव्ह...



... सन ६१८ चा हिवाळा, भारतीय उपखंडात उत्तर- दक्षिण चा यज्ञकुंड भडकवणारा होता, नर्मदेच्या आणि विंध्य पर्वताच्या साक्षिने..!

पश्चिम किनारपट्टीच्या लताचा म्हणजे गुजरातचा लाभदायक प्रदेश जिंकून घेण्यासाठी दक्षिणेतील कर्नाटकाच्या पुलकेशीने प्रचंड कीर्ती पावलेल्या मोठ्या भारतीय सम्राटाला आव्हान दिलं होतं. ज्या हर्षवर्धन सम्राटाने पूर्वी पुलकेशीचं फारसं कधी नावही ऐकलं नसावं त्याच्याशी आता हे युद्ध घडणार होतं.

दक्षिणेचा पुलकेशी आणि उत्तरेचा सम्राट हर्ष साधारणपणे समकालीन होते. काही वर्षाच्या फरकाने असले तरी दोन्ही तरुण आपसात भिडण्यासाठी प्रचंड शक्ती लावून होते. 

उत्तरेतील अनेक राजांचा राजाधिराज सम्राट असलेला हर्ष त्यामानाने प्रचंड कीर्ती पावलेला नामांकित सम्राट होता. ज्याने हूणांचा पराभव केला असा महान योद्धा होता. 

त्यामानाने कमी जलसिंचनाच्या सोयी, अकृषक जमिनी पर्यायाने कमी समृद्ध असलेला चालुक्यांचा प्रदेश सतत संघर्षाखाली होता.

फारशी कीर्ती न पावलेल्या पुलकेशीने आपला काका मंगलेश याच्याशी युद्ध करून चालुक्यांचे राजपद मिळविले होते. कदंबांचा पाडाव करून व कोंकण जिंकून आता तो गुजरातची महत्त्वाकांक्षा बाळगून होता.

हर्षवर्धन हा अनेक शतकांमध्ये होऊन गेलेल्या अनेक सम्राटांपैकी उत्तर भारतातील सर्वाधिक शक्तिशाली युद्धदेवता मानला जात होता. प्रगत, सुसंस्कृत आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत अशा मध्य भारत ते पंजाब पर्यंत पसरलेल्या अफाट प्रदेशाचा तो अभिषिक्त सम्राट महाराजाधिराज होता. असा हा पुष्यभूती वंशश्रेष्ठ आपल्या कनोज राजधानीतून राज्य करत असे. त्याच्याविषयी असलेल्या प्रचंड दराऱ्यामुळे उत्तरेत त्यास तोड म्हणून कोणी उरला नव्हता. पूर्वेकडे बंगाल पर्यंत आपला प्रभाव वाढवून पूर्व किनारपट्टीवरच्या बंदरांवर सम्राट हर्षची अधिसत्ता होती. त्याला आता पश्चिम किनारपट्टीवरही(गुजरात) सत्ता कायम करायची होती. आणि दक्षिणेच्या पुलिकेशीला त्याच्या उदंडपणाची शिक्षा द्यावयाची होती.

नर्मदेच्या दक्षिण काठावर विंध्य डोंगररांगांच्या जंगलांमध्ये जमलेला प्रचंड सैन्य समुदाय, गरजणारे ढोल आणि आसमंत थरारून सोडणारी रणशिंगे विनाशकारी भासत होती. हा होता पुलकेशीचा युद्धसमुदाय.

याउलट नर्मदेच्या उत्तर काठावर हर्षवर्धन सम्राटाचा फिरत्या शहराप्रमाणे भासणारा भपकेबाज डौलदार नानाविध दुकानांनी युक्त असंख्य अश्वगज दलाने भरलेला प्रचंड मोठा युद्ध समुदाय खडा होता. 

तो सन ६१८ मधील हिवाळ्याचा हंगाम होता. दुसऱ्या पुलकेशीच्या राज्याभिषेकाला त्यावेळी आठ वर्षे होऊन गेली होती. सम्राट हर्षवर्धन च्या राज्याला बारा वर्षे लोटली होती. 

(विजापूर-मुंबई ताम्रपट/भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र/श्रीनंद बापट-प्रदीप सोहोनी)

समग्र उत्तरेचा सम्राट आता दक्षिण गुजरात वर अधिकार गाजवू पाहणाऱ्या कुण्या तरी पुलकेशीला शिक्षा करण्यासाठी निघाला होता. 

हर्षचा राजकवी बाणाभट्ट म्हणतो- सगळे प्राणी मात्र झोपेत असताना रात्री बारा ते तीन या दरम्यान फौजेने सज्ज होण्यासाठी रणवाद्ये वाजू लागली. ढोल बडवण्याचा आवाज घुमला. त्यानंतर क्षणभराच्या उसंतीनंतर ढोलावर आठ जोरदार प्रहार करण्यात आले. दिवसा कूच करणाऱ्या तुकड्यांच्या संख्येइतके ते प्रहर होते.

गाढ रात्रीच्या वेळी हर्ष च्या छावणीत अचानक हालचाल सुरू झाली. तुताऱ्यांचे आणि शिंगांचे आवाज घुमू लागले. सेनाधिकारी त्यांच्या सैनिकांच्या तुकड्यांना आदेश देऊ लागले. लढाऊ हत्तींना बाहेर काढण्यात आले. घोडदळातील घोडेस्वार घोड्यांना हलवू लागले. तंबू उखडण्यात आले आणि त्यांची बांधा बांध करण्यात आली. तंबूचे सामान वाहतुकीसाठी असलेल्या हत्तींच्या आणि उंटांच्या पाठीवर लादण्यात आले. रसदीच्या मार्गांची योजना करण्यात आली. रात्रभर धुळीचे लोट उठत राहिले. दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत हजारो लोकांचा, जनावरांचा अगणित समुदाय कुच करण्यासाठी सज्ज झाला होता. 

त्यांच्या सुंदर हत्तींवर बसलेले हर्षवर्धनचे मांडलिक होते, त्यांच्याकडे दर्जा दर्शवणाऱ्या सोन्याच्या पानांचे पट्टे असलेली धनुष्ये होती. त्यांच्या सेवकांकडे तलवारी होत्या. सोबत विडे घेऊन निघालेले अनेक सेवक चामर ढळीत होते. मागच्या बाजूस भाल्यांचे गठ्ठे घेतलेले सेवक होते. सगळ्यात उंच आणि अतिशय सुंदर हत्तीवर सुवर्ण मुकुट घातलेला सम्राट हर्षवर्धन स्वर्ण हौद्यात शिरावर मोठ्या पांढऱ्या छत्राखाली शोभून दिसत होता. मांडलिक सामंत राजे आपल्या सम्राटाला झुकून मानवंदना देत होते. 

हर्षवर्धन कडे उत्तर भारतात लढायासाठी उपयुक्त असलेलं पायदळ, घोडदळ आणि गजदळ प्रचंड प्रमाणात उपलब्ध होतं. उत्तरेत भारताबाहेरील घोड्यांच्या व्यापारामुळे मुबलकता होती.

दक्षिणेत पुलकेशीकडे मात्र मोठे पायदळ पोसू न शकणारे सामंत, दर्जेदार परदेशी घोड्यांची कमतरता होती.

पुलकेशीकडे प्रसिद्धी आणि वैभवाचं वलय नव्हतं. बलशाली पण थोडासा कृष्णवर्णी आणि दक्षिणात्य साध्या राहणीचा पुलकेशी हर्षवर्धनच्या मानाने किमान वाटत होता.

दक्षिणेतील अनेक राज्यांशी अखंड संघर्ष करत आता मात्र तो नर्मदेच्या तीरावर हिमालयाकडे मुख करून उत्तरेच्या या युद्धदेवतेच्या प्रतीक्षेत खडा होता, स्वतःच्या मृत्यूच्या वा जयाच्या वाटेत.!

पुलकेशीकडे प्राचीन जगाचे रणगाडे म्हणजे हत्ती उपलब्ध होते. आपल्या प्रदेशातील काही स्थानिक आदिवासी समुदायांच्या टोळ्या सोबत होत्या. मांडलिक सामंतांची पथके होती. 

तत्कालीन युद्धतंत्रामध्ये भारतीय सैन्य हत्तींचा विविध प्रकारे उपयोग करू शकत होते. काही वेळा हे हत्ती म्हणजे धनुर्धरांसाठी एक फिरते पीठ होते. हत्तींच्या सुळ्यांना तिक्ष्ण टोकं असत. जवळच्या द्वंद युद्धात हत्तीच्या पीठावरून भल्यांचे युद्ध चालत असे. हत्ती शत्रूच्या पायदळात सोडला जात असे त्यावेळी त्याच्या पायाच्या आणि मागील भागाच्या रक्षणासाठी सैनिकांना तैनात केलं जात असे. विंध्य पर्वतरांगांच्या पायथ्याजवळ हिवाळ्यातील समृद्ध हिरव्यागार जंगलातून निघालेल्या चालुक्यांच्या हत्तींनी ओलसर गवतातून मार्ग काढला होता. मैलो गणित प्रवास करत लुंग्या नेसलेली हजारो सैन्य पथके पुलकेशीच्या नेतृत्वात ‘वराह ध्वज’ हाती धरून चालत होती. 

हर्षवर्धनच्या सैन्याचा माग काढण्यात आला. खुल्या मैदानातील युद्धप्रसंग टाळत पुलकेशीने चलाखिने हर्षवर्धनाला विंध जंगलात छापे मारून हैराण केले. उत्तरेच्या सपाट मैदानी प्रदेशात अजिंक्य असणाऱ्या हर्षवर्धनच्या शाही सैन्याला जंगलातून प्रवास करणे अवघड होऊन बसले होते.

अनेक दिवस भयंकर हिंसाचार घातपाताची युद्धे घडून आली. हत्तींच्या टकरीने समग्र जंगल दणाणून सोडले. हत्तींच्या सुळ्यांना अखंड रक्त स्नान घडून आले.

परंतु अखेरीस काही महिन्यानंतर सतत चालणाऱ्या युद्धात आपल्या सैन्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हर्षवर्धने मोहीम आटोपती घेतली. कदाचित पुन्हा मोठ्या तयारीने यावे असे त्याला वाटले असावे पण ते कधीच घडू शकले नाही. दख्खनला जबरदस्तीने आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी संपूर्ण लष्कराचा बळी देणे योग्य होणार नाही असे वाटल्याने त्याने माघार घेण्याचा आदेश दिला आणि त्याचे सैन्य परतीला निघाले.

मात्र

पुलकेशींने भारतीय उपखंडाच्या या महाशक्तीला पराभूत केलं होतं..! नर्मदा आता दोन्ही साम्राज्याची ऐतिहासिक सीमा ठरली होती. उत्तरेकडे हर्षवर्धन आणि दक्षिणेकडे पुलकेशी.!

अनेक वर्षांपासून सत्ता संघर्षाच्या काळोखात बुडालेल्या दख्खनचा आता उदय झाला होता. दख्खणेला एक नवीन युद्धदेवता प्राप्त झाला होता. गुजरात हे आता त्याच्या अधिपत्याखाली होते तर नर्मदेच्या खालील संपूर्ण दक्षिण भारत आता त्याच्या नजरेच्या टप्प्यात.!!

वातापी चालुक्यांच्या वंशातील पहिल्या पुलकेशीचा नातू आणि पहिल्या कीर्तीवर्माचा पुत्र ‘एरया’ जो नावाप्रमाणे भाग्यशाली ठरला आणि जगविख्यात झाला पुलकेशी (द्वितीय) म्हणून..! 

होय पुलकेशी, ..अर्थात महान सिंव्ह..! 

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts