Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

एक तीरसे दो शिकार: शहाजी राजे आणि औरंगजेब बादशहा..

 


मित्रांनो,

तो तीर कोणता आणि तो कोणी सोडला आणि त्यातून कोणत्या दोन शिकार साध्य झाल्या हे बघण्यापूर्वी आपण त्याची पार्श्वभूमी बघूया.

सन १६९९ पासून सन १७०३ पर्यंत औरंगजेब बादशहाने मराठ्यांचे सातारा, सज्जनगड, पन्हाळगड, विशाळगड आणि सिंहगड असे महत्त्वाचे किल्ले घेतले. पण या पायपिटीत मोगल सैन्याची अतोनात प्राणहानी झाली. मराठ्यांचे प्रतिहल्ले, अक्रांदून पडणारा पाऊस, पूराने फुगलेले नदी-नाले आणि सह्याद्रीची ती कब्रगाह इत्यादींमुळे एका विशाळगडाच्या वेढ्यातच हजारो माणसे मोगलांना गमवावी लागली.

औरंगजेब हा स्वत: सैन्य घेऊन कित्येक महिने एकेका किल्ल्याला वेढा घालून बसून राहू लागला. पर्यायी मराठ्यांना चौफेर उधळण्यास मुलुख उपलब्ध झाला. मोगलांची पांगलेली सैन्ये आणि भांबावलेले सेनापती मराठ्यांच्या निरर्थक मागे लागून शेकडो मैलांची पायपीट करीत फिरत. या धावपळीच्या लढाईत मराठे हाती लागत नव्हते.

तुटपुंजी पथके बाळगणाऱ्या प्रादेशिक आणि प्रांतीय मोगल अधिकाऱ्यांवर मराठे तुफान होऊन बरसत. मोगलांच्या ताब्यातील प्रदेश अक्षरश: धुऊन काढीत.

मराठ्यांना लाच देऊन मोगल अधिकारी त्यांचे किल्ले तात्पुरते ताब्यात ठेवीत! औरंगजेब पुढे सरकला की मराठे पुन्हा किल्ले परत घेत. या सर्व गोष्टींमुळे मोगल अगतिक बनले आणि कुणीकडून का होईना, मराठ्यांशी तडजोड करावी आणि पंचवीस वर्षे सतत चाललेले युद्ध एकदाचे संपवावे, असे मोगलांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना वाटू लागले. औरंगजेबही आतून पुरता हैराण झाला होता. पण अहंकारामुळे तो बोलणार कसा? शेवटी औरंगजेबाचा लाडका मुलगा शहाजादा कामबक्ष याने मराठ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाला हे कळत होते, पण तुमचे प्रयत्न तुम्हांला करायचे असल्यास करा अशी वरपांगी भूमिका त्याने घेतली.

या मध्यस्थीसाठी मराठ्यांवर प्रभाव पाडील असा मराठा राजकुटुंबातील एखादा मनुष्य मोगलांना हवा होता. त्यांची ही अडचण दूर करून मोगल दडपणापासून आपला कायमचा बचाव करून घेण्याचा मुत्सद्दीपणा एका मराठा राजाने दाखविला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतण्या आणि व्यंकोजी राजांचा मुलगा तंजावरचा राजा शहाजी.! (१६८४-१७१२)

तंजावरकर शहाजी राजांनी आपला सावत्र भाऊ रायभान भोसले याला मध्यस्थीसाठी औरंगजेबाच्या दरबारात पाठवून ‘एक तीरसे दो शिकार’ साध्य केले.

यात मराठे आणि मोगल यांच्यात मध्यस्थीचा देखावा करावा हा हेतू होता. दुसरा हेतू म्हणजे औरंगजेबाजवळ रायभान भोसले संधान बांधून आहेत तोपर्यंत मोगलांना तंजावरला त्रास देता येणार नाही असा होता. 

असो, हे राजकारण सार्थ करण्यासाठी शहाजीराजे तंजावरकर यांच्याकडून रायभान भोसले बादशाकडे येण्यास तयार झाले. ११ जून १७०३ च्या नोंदीप्रमाणे- 

“मोहम्मद मुरादखान याचा भाचा मोहम्मद हुसेन हा बादशहाच्या आज्ञेने व्यंकोजी याचा मुलगा रायभान याला नवरोजबेगखान याच्या काफिल्यातून बादशहाच्या हुजुरात घेऊन येत होता. हा काफिला लोहगडाजवळ (पुण्याजवळ) येऊन उतरला तेव्हा शत्रूचे सैन्य सुमारे ३०० स्वरांचे होते. त्याने काफिल्यावर हल्ला केला. उभय पक्ष्यांची काही माणसे मारली गेली. त्यातून शत्रूने काफीला लुटला.”

अर्थात रायभान भोसले मध्यस्थीसाठी येत आहे हे समजल्यावर प्रत्यक्ष मोगल छावणीतून रायभान भोसले यांना आणण्याची शाही व्यवस्था करण्यात आली हे समजते.


मध्यस्थीसाठी रायभान भोसले मोगल छावणीत येत आहेत हे ऐकून औरंगजेब बादशहाला मोठा आनंद झाला. त्याने रायभान भोसले यांचे किती कौतुक करावे? रायभान भोसले यांना बादशहाकडून सहा हजारी मनसब देण्यात आली. त्यांच्या सहकाऱ्यांनाही लहानसहान

मनसबी मिळाल्या. औरंगजेब बादशहाने रायभान भोसले आणि छावणीत असलेले शंभूपुत्र शाहू यांना परस्पर भेटीची मुबलक संधी दिली., ती मराठ्यांशी तडजोड व्हावी या उद्दिष्टानेच.!


मोगल दरबारच्या बातमीपत्रांत रायभान भोसले यांचे लालन चांगुलन करण्यासंबंधी अनेक मनोरंजक नोंदी आहेत. त्यांवरून रायभानाचा भाव किती वाढला होता याची कल्पना येईल. यापैकी काही नोंदी पुढे दिल्या आहेत :

१९ जून १७०३-

बादशहांना पुढीलप्रमाणे कळविण्यात आले की, “आज्ञेप्रमाणे व्यंकोजी (तंजावरकर)

यांचा मुलगा रायभान, शंकराजीच्या बिरादरीचे प्रतापजी वगैरे मंडळी बादशहांना मुजरा करण्यासाठी न्यायकचेरी सुरू होण्यापूर्वी हजर झाली आहेत.” त्यावर बादशहाने आज्ञा केली की, नेकनामखान याने त्याला (रायभानाला)

हुजुरात आणावे. “त्याप्रमाणे त्याने (रायभानाने) न्यायकचेरीच्या मार्गाने बक्षी रुहुल्लाखानाच्या तळाजवळ बादशहाची

भेट घेतली. रायभानाने पन्नास मोहरा निसार (ओवाळणी) म्हणून पुढे ठेवल्या. रायभानाला खिलातीची वस्त्रे, एक हत्ती, सोनेरी खोगीर व ताज चढवलेला घोडा आणि दोन हजार रुपये रोख एवढे देण्यात आले. त्याला सहा हजार

जात व दोन हजार स्वार अशी मनसब देण्यात येऊन ध्वज व नगारे यांचा मानही देण्यात आला. (१९ जून १७०३, मोगल दरबारची बातमीपत्रे)

मुहंमद मुरादखान (इतिहासकार काफीखान याचा मित्र) याचा भाचा सुलतान हुसेन हा रायभानाला आणण्यासाठी गेला होता. तो येऊन बादशहाला भेटला. त्याची मनसब वाढविण्यात आली. (२३ जून १७०३)

“बादशहाने अशी आज्ञा केली की, रायभान (भोसले) याला शहाजादा मुहंमद कामबक्ष याच्या भेटीस न्यावे. शहाजादा जे देईल ते त्याने घ्यावे.”

अशाप्रकारे रायभान संदर्भात जे मोगल अधिकारी काम करीत त्यांना सुद्धा खिलती व बक्षिसे मिळू लागली, एवढे बादशहाला रायभानचे महत्त्व.!


मुघल दरबाराच्या १० जुलै १७०३ च्या बातमी पत्रानुसार- बादशहा हमीदुद्दीनखान बहादूर यास म्हणाले : “तुम्ही रायभान (भोसले) याला बोलवा आणि त्याची व राजा शाहू यांची भेट घडवून आणा.” आज्ञेप्रमाणे हमीदुद्दीनखान याने दिवाणे खासमध्ये राजे शाहू आणि रायभान यांची भेट घडवून आणली. ही हकीकत बादशहाला कळविण्यात आली. बादशहाने राजा शाहू आणि रायभान यांस एक रत्नजडित पदक दिले.


रायभान यास याआधी सरकारातून मनसब मिळाली होती. या वेळी बादशहाने त्याला एक चोगाही (रत्नजडित शिरपेच) बक्षीस म्हणून दिला आणि आज्ञा केली की, "तुम्ही मुजऱ्यासाठी दिवाणे खासमध्ये येत जावे.” (२४ जुलै १७०३)


९ ऑगस्ट १७०३ रोजी ची मोगल दरबारातली नोंद-

“बादशहाने पुढील प्रमाणे आज्ञा केली की तंजावरचा जमीनदार शहाजी याच्यासाठी खिलतीची वस्त्रे देण्यात आली आहेत. ती इनायतुल्लाखान यांनी शहाजी कडे पाठवावी.”


अर्थात शहाजीराजांच्या राज्यावरील आक्रमण तर दूरच, उलट पक्षी औरंगजेब बादशहाची त्यांच्यावर मेहेर नजर होऊ लागली.


१८ ऑगस्ट १७०३ रोजी तंजावरचा जमीनदार व्यंकट हा शहाजीचा पुतण्या रायभान याला आणण्यासाठी गेला होता त्याला खिलतीची वस्त्रे देण्यात आली रायभान याला 283 रुपये किमतीची पोच बक्षीस म्हणून देण्यात आली.


२० ऑगस्ट १७०३ च्या नोंदीप्रमाणे- “बादशहाने आज्ञा केली की एक रत्नजडिक खंजीर (मोत्यांनी युक्त मिनीचे काम केलेला) एक हजार रुपये किमतीचा रायभानसाठी काढून ठेवावा.”


२५ ऑगस्ट १७०३ रोजीच्या नोंदीप्रमाणे- “तंजावरकर राजे व रायभान भोसले यांना बादशाही जनावरांच्या खुराकाची व पथकातील घोड्यांना डाग देण्याची माफी देण्यात आली.”


अर्थात इतर मोगलकरांपासूनही तंजावरची सुटका झाली.


मोहम्मद कामबक्ष शहजादा याचा दिवान विजारतखान याने एक यादी रहुल्लाखान बक्षी याकडे पाठविली. त्यात असे म्हटले होते की शिवाचा(महाराज) पुतण्या रायभान याला सहा हजार जात आणि दोन हजार स्वार अशी मनसब देण्यात आली. त्याचा जामीन माफ करण्याबद्दल काय आज्ञा.? बादशहाने आज्ञा केली-“जामीन माफ” 

अर्थात रायभान भोसले यांना बादशहाकडून मिळालेल्या मनसबीच्या मोबदल्यात जामीन देण्याचे कारण नाही, एवढी बादशहाची मेहरनजर..!


एकूणच रायभान भोसले यांनी सुद्धा या बदल्यात रणांगणावर मोगलांशी लढत असणाऱ्या सरसेनापती धनाजी जाधव आणि मराठा सरदारांशी बोलणी चालवली. पण हे सगळे करूनही मराठ्यांनी तडजोड स्वीकारली नाही.!

याबद्दल मोगल छावणीतील अधिकारी भीमसेन सक्सेना हा आपल्या आत्मचरित्रात म्हणतो- “शिऱ्याचा गोळा अलगद घशात घालावा तसा मराठ्यांनी मोगलांचा दक्षिण सुभा गिळला होता. त्यांनी काय म्हणून मोगलांशी तडजोड करावी?”

अर्थात भीमसेन म्हणतो ते खरेच होते कारण पंचवीस वर्षांपूर्वी दक्षिणच्या भूमीत रणकुंड पेटवणाऱ्या बादशहाचे हात चांगलेच पोळले होते. शिवाय छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती राजाराम यांच्या आहुती व्यर्थ थोड्याच ठरणार होत्या..! या बलिदानातूनच अफाट मोगल साम्राज्याशी लढण्याची प्रचंड बारूद मराठ्यांना प्राप्त झाली होती. आणि ती आता समग्र मोगल साम्राज्यावर कहर बनून बरसत होती.! म्हणूनच समग्र दख्खन त्यांच्या कवेत होती, तडजोडीची सुतराम शक्यता नव्हती..!

असो, बादशहाचे रायभान तर्फे प्रयत्न चालू राहिले.


४ मे १७०४, यावेळी रायगड आणि तोरणा जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने भीमेच्या काठी खेड या गावी आपली छावणी घातली होती. मराठे चहुकडे पसरले होते. त्यांच्याविरुद्ध जी पथके पाठविण्यात आली त्यात रायभान भोसले यांचेही पथक असावे असा उल्लेख मोगल दस्तावेजात पुढील प्रमाणे येतो-

“चोर (मराठे) हे निंब गावच्या दिशेने बादशाहीतील छावणीच्या प्रदेशात पसरले होते त्यांचे परिपत्य करावे म्हणून सरफराज खान याला बरोबर पथके देऊन पाठविण्यात आले. त्याच्याबरोबर रायभानला पाठविण्यात आले, साहेबांच्या संरक्षणासाठी दोन बंदुकीची आणि जल्लूखासची (बादशहाच्या खाशीची माणसे) देण्यात आली त्यांना निरोप देण्यात आला.”

अर्थात कदाचित मराठ्यांशी तडजोड करण्यासाठी रायभान यांची उपस्थिती असावी. विशेष म्हणजे रायभानजी भोसले यांच्या संरक्षणाची मोठी काळजी मोगल वाहत असल्याचे दिसते, एकूणच ‘झेड+’ सुरक्षाच म्हणावी.!

असो,

यानंतर रायभान भोसले यांचा लवकरच मृत्यू झालेला दिसतो, ही नोंद समकालीन इतिहासकार भीमसेन सक्सेना यांनी करून ठेवली आहे. रायभान भोसले सन १७०६ च्यासुमारास मोगल छावणीतच वारले. रायभान भोसले यांच्या मध्यस्थीला मराठ्यांनी भिक घातली नाही पण शहाजीराजे तंजावरकर हे या निमित्ताने औरंगजेबाला खेळवीत राहिले त्यामुळे त्यांच्या हयातीत मोगलांना तंजावरशी सौम्यपणे वागावे लागले आणि तंजावरचे राज्य सुरक्षित राहिले.

या घटनेने आपल्याला शिवकालातील असाच एक प्रसंग आठवतो. ज्यावेळी महाराज आग्र्याहून निसटले त्यानंतर मोगल आक्रमणाचा धोका ओळखून त्यांनी औरंगजेब बादशहाशी समोपचाराचे धोरण स्वीकारले. तसेच पुढे बाल शंभूराजांना शहजादा शहाआलम याच्या भेटी दाखल औरंगाबाद पाठवून त्यांना मोगल मनसबदार बनवून आपले स्वराज्य मोगल आक्रमणापासून सुरक्षित राखले तसेच पुरंदरच्या तहात गेलेले राज्य मिळवण्यासाठी शक्ती संपादन केले.

यानंतर याच पद्धतीने स्वराज्य सुरक्षेसाठी औरंगजेब बादशहाला हूल देण्याचा प्रयत्न शंभूराजांकडून सुद्धा झाला होता. त्यावेळी बंडखोर शहजादा अकबर हा शंभूराजांच्या आश्रयाला आलेला होता. त्याच्या माध्यमातून अकबराच्या माणसांनी बादशहाची भेट घेतली त्यावेळी अशीच तडजोडीची बोलणी शंभूराजां तर्फे अकबराच्या मध्यस्थीने चालवण्यात आली. मात्र यावेळी औरंगजेब स्वराज्यात उतरून केवळ पाच वर्षे झाली होती, त्यामुळे तो म्हणाला ‘कापरबच्च्याशी’ तह शक्य नाही.! त्या युद्धाला आता पंचवीस वर्ष लोटल्यानंतर मराठ्यांशी अखंड झुंज देत औरंगजेबाची अकड आणि अहंकार दख्खनच्या भूमीत पार विरून गेला होता. त्यामुळे तो आता तहासाठी वाटेल ते करत होता. आणि यातच शहाजीराजांनी साधलेले राजकारण.! अशाप्रकारे तंजावरकर शहाजी राजांनी आपली मुत्सद्देगिरी सार्थ केली. औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणि नंतरची तीन वर्षे (सन १७१०) पर्यंत दाऊदखानाच्या कारकीर्दीत तंजावरचे राज्य सुरक्षित राहिले. तंजावरच्या इतिहासात या शहाजी राजांचा काळ म्हणजे सुवर्णयुगच समजले जाते. या काळात साहित्य, संस्कृती, कला इत्यादींना तंजावरात मोठा उठाव मिळाला. या कलांना आश्रय देऊन आणि स्वत: अनेक ग्रंथ लिहून तंजावरचे शहाजी राजे म्हणजे 'अभिनव भोज' ठरले.

असो, ऐन बादशाही संकटकालात शहाजीराजांनी मुत्सद्देगिरीचा ‘तीर’ सोडून दोन ‘शिकार’ साधल्या त्या अशा.

अर्थात तो तीर म्हणजे रायभान जो तंजावरकर शहाजीराजांनी मोगलांवर सोडला आणि दोन शिकार साध्य केल्या त्या म्हणजे स्वतःच्या राज्याचे संरक्षण आणि बादशहाला दिलेली हुल..!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts