Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

बादशहा आणि सह्याद्रीची कबर..!



....मित्रांनो आज आपण औरंगजेब बादशहाच्या फौजे सोबत चालणार आहोत एका दीर्घ आणि रोमांचकारी प्रवासावर.! यावेळी सकल हिंदुस्थानात बादशहाला शत्रू म्हणून कोणी उरलं, ते फक्त स्वराज्य.! छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात.! या प्रवासाची सुरुवात होते विशाळगड अर्थात खेळणा किल्ल्यापासून आणि आपल्या सोबत निवेदक आहे साकी मुस्तैदखान जो प्रत्यक्ष या मोहिमेत हजर होता.


फतेह शुद किलाए खेलना: आणि नियतीचा खेळ-

सन १७०२ चा जून महिना,

बादशहाचे प्रचंड सैन्य विशाळगडाला वेढा देऊन बसले होते. पण परशुराम त्रिंबक प्रतिनिधी दाद देत नव्हते. अखेर सहा महिन्याच्या जबरदस्त प्रतिकारनंतर दोन लाख खंडणीच्या मोबदल्यात मोघलांना कसा बसा विजय पदरात पाडून घेता आला. 

या वेढ्यात शहाजादा बेदारबख्त, सेनापती फत्तेउल्लाखान, मिर्झाराजांचा नातू राजा जयसिंह (सवाई जयसिंग), अब्दुरहमानखान, सैफुल्लाखानाचा मुलगा असदुल्लाखान, नामांकित रुहुल्लाखान बख्शी आणि

बुयूतात (कारखाने) चा अधिकारी फजायलखान इत्यादी प्रमुखांची नावे आढळतात. याशिवाय मराठ्यांच्या हल्ल्यांना थोपवण्यासाठी महंमद अमीनखान फिरत होता. साकी मुस्तैदखान म्हणतो-

नगारे-नौबतीच्या गजरात बादशाही निशाने किल्ल्यांवर चढविली (४ जून १७०२). किल्लेदार परशुरामने अभय मागितले. रात्री (७ जून) आपली सगळी माणसे आणि शक्य तितके सामान घेऊन तो किल्ल्यातून निघून गेला. बादशाही लष्करात विजयाची शहाजणे वाजू लागली. 'फतेह शुद किलाए खेलना' या ओळीत विजयाची तारीख निघते. ही ओळ बादशहाला पसंत पडली. किल्ल्यावर निशाण चढले त्या वेळी बादशहा कुराण पठण करीत होता.

त्यात “सखरलना”(धन्य परमेश्वराची) हा शब्द आढळला. तेच नाव खेळणा किल्ल्याला देण्यात आले..'

अर्थात खेळणा बादशहाच्या हातात आला, पण जेव्हा एवढा मोठा बादशहा आणि त्याची सेना जेव्हा निसर्गाच्या हातचे खेळणे बनून जाते तेव्हा..? अर्थात नियतीचा खेळ बाकी होता.!


विशाळगडाहून पन्हाळ्याकडे: मृत्यूची दरी-

विशाळगड ताब्यात आल्यानंतर किमान पावसाळा येथेच थांबावे असे बादशहाच्या मनी होते मात्र त्याला लष्करासह पन्हाळ्याकडे निघावे लागले. पण येथून पुढे सुरू झाला मृत्यूचा खेळ.! साकी मुस्तैदखान म्हणतो-


‘...रात्रंदिवस पाऊस पडत होता आणि नदीनाले यांना पूर आले होते. पावसाळा संपेपर्यंत तेथून तळ हलवावा असे बादशहाच्या मनात नव्हते. पण काही ऐदी अमीर घाबरले होते. लष्करात धान्याची महर्गता होती. हवापाणीही चांगले नव्हते. सैन्यातील अननुभवी लोकही तेथे राहाण्याविरुद्ध आरडा-ओरड करू लागले. त्यामुळे अमीर-उमराव टेकीला आले होते. यामुळे बादशहाने मुहरम महिन्याच्या अखेरीस (१० जून १७०२) पेडगावच्या दिशेने कूच केले. त्या प्रदेशाचा ज्यांना अनुभव आहे त्यांना माहीत आहे की, तेथे वर्षातून पाच महिने धो धो पाऊस पडत असतो. डोळे उघडण्याचीही संधी मिळत नाही (फुर्सद चश्म वा नमूदन नमीदाद). तसा पाऊस सुरू झाला. नदीनाल्यांना प्रचंड पूर आले. रस्त्यात इतका चिखल होता की, माणसे आणि घोडी चिखलात छातीपर्यंत रुतून बसत. प्रवासात मोगल सैन्याचे अत्यंत हाल झाले. 

अंबाघाटाची जवळची दरी तीन कोसांची. पाऊस नसताना ती ओलांडण्यास मोगल सैन्याला दहा दिवस लागले. त्यात सुद्धा प्राण आणि वित्त यांची प्रचंड हानी झाली. मग पावसाळ्यात काय प्रकार घडला असेल याची कल्पना केलेली बरी, दरीत प्रवेश करताना प्राणावर कोणती संकटे येतील या कल्पनेने प्रत्येक जण माघार घेई. सगळी माणसे एकत्र झाली की, केव्हा एकदा आपण या प्रवासातून पुढे निघून जाऊ असे त्यांना होई, सामानसुमान वाहून नेण्यास वाहते नव्हती. सामान तरी काय राहिले होते? लहान-मोठे: गरीब-श्रीमंत या सर्वांची व्यथा प्रवासातील संकटांनी नागविले गेल्यासारखी झाली. त्यांच्यापाशी सामान इतके थोडे राहिले होते की, कोंबड्यावरही ते लादता आले असते.!

मोगल रडत कढत एका दिवसात पाव कोस जमीन आक्रमीत. रात्र काढण्यास दगडा-धोंड्यांचा आसरा मिळाला, नाही तर चिखलातच रात्र कंठावी लागे. दुसऱ्या दिवशी पुन्हा चिखलमाती आणि पाणी-पाऊस प्रवास चालू होई. मन्सबदार आणि प्रतिष्ठित माणसात आणि सामान्य माणसात इतकाच फरक उरला की प्रतिष्ठित माणसे हातात छडी घेऊन चालत. आपले सामान मजुरांच्या डोक्यावर देत, त्यांना दाटीत मार्ग आक्रमीत, तर माणसे शिवीगाळ करीत, अचकट विचकट आणि घाणेरडे बोलत चालत..’


सरोपा बरहना: आणि मृत्यूचा ओढा-

मोगल लष्कर आता ओढ्याजवळ दाखल झाले होते. प्रत्येकच पावलावर काहीतरी नवीन वाढून ठेवले होते. साकी मुस्तैद खान म्हणतो-

‘...मोगल सैन्य एका ओढ्याच्या काठी पोहोचले. ओढ्याला पूर आला. हत्तीच मोठ्या कष्टाने ओढा पार करू शकले. इतर स्वाऱ्यांची आणि वाहनांची काय कथा. बादशहा आणि मोठमोठे अमीर-उमराव यांचे सामान हाती वाहून न्यावे लागे. ओढ्याच्या काठावर पोहोचल्यावर बादशहाने आज्ञा केली की, लष्कराच्या लोकांची बायका-माणसे आणि सामान यांना सरकारी आणि अमीर-उमरावांच्या हत्तीवरून पार करावे. बादशहाच्या ताकिदीमुळे फौजेत बायका-माणसे तशी कमी होती. तरी जी होती त्यांची संख्या काही हजार होती. या बुर्खाधारी स्त्रिया उंट, हत्ती, बैल गाडी इत्यादी स्वाऱ्या वापरीत. पण ही वाहने नष्ट झाली होती. त्यामुळे त्या बायका पायापासून डोक्यापर्यंत उघडल्या(बुरख्याविना) (सरोपा बरहना). त्यापैकी अनेकांच्या अंगावर मूल्यवान् दागिने होते. त्या चिखलात अडकलेल्या असत. त्या काकुळतीला येऊन हत्तीच्या माहुतांना आपल्याला ओढ्याच्या पार नेण्याची विनंती करीत, रूपयाच्या ऐवजी अश्रफ्या देत. नव्हे, अंगावरचे दागिने देत. ओढ्याच्या काठावर एकच झुम्मड उडाली होती. ज्यांचे मरण ओढवले होते त्यांना हत्तीवर जागा मिळू शकली नाही. ते खालीच राहिले आणि पाण्यात बुडून मेले. ओढ्याच्या काठावर एक प्रलयच जणू उसळला होता. खाण्या-पिण्याचे जिन्नस नावालाही सापडेनात. मग लोक नुसते गम खात. जुम्दतुल्मुल्क असदखान(वजीर) याने ओढा ओलांडला. त्याच्यापाशी एक लहान तंबू होता. कोठेतरी कोरडी जमीन सापडली तर तेथे आपला तंबू उभा करावा या विचारात तो होता. पण तशी जमीन कोठेच सापडेना, निरुपाय होऊन त्याने चिखलातच तंबू दिला. मेखा नीट ठोकल्या नव्हत्या. रात्री जोराचा पाऊस सुरू झाला. दोनदा रात्री राहुटी जुम्दतुल्मुल्काच्या (वजीर) डोक्यावर आदळली. त्याचे नोकर रात्रभर राहुटीच्या ताणावा धरून उभे होते. काही शिजवावे म्हटले तर काही धान्यही शिल्लक नव्हते. अशाच उपासमारीत त्याने रात्र घालविली. सामान्य लोकांची काय स्थिती झाली असेल याची यावरून कल्पना येईल. लष्करचे बरेच सामान चिखलात रुतून बसले होते. ते काढण्याचे नोकर-माणसांना जमेना. मग ते ओढ्याच्या पार नेण्याची गोष्ट दूरच राहो. खेळण्याच्या किल्लेदारीवर हयातखान याची नेमणूक झाली होती. ते सामान खेळण्याला घेऊन जाण्याची बादशहाने त्याला आज्ञा केली. खरे पाहता तो ओढा किती लहान. तो पार करण्यास माणसे आणि जनावरे यांना काहीच वेळ लागत नसे. पण तोच ओढा पावसामुळे पूर येऊन भयंकर बनला होता. अनेक माणसे आणि जनावरे त्यात बुडून मेली. हत्तीचे माहूत लोकांना पार करण्यासाठी अश्रफीशिवाय बोलेनात. रुपयांचे नावही ते घेईनासे झाले. जबरदस्तीने किंवा पैसा खर्च करून, किंवा पोहून जे पार झाले त्यांना परमेश्वरकृपेने नवीन जन्म प्राप्त झाल्याप्रमाणे वाटले.

हत्तीचे वाहन लाभलेली माणसे बायका, पोरे आणि सामान यासहित ओढ्यातून पार झाली. पण कित्येक प्रतिष्ठित लोक काठांवरच राहिले. मग गरिबांची काय कथा. ते विनवणी आणि अजीजी करीत, पण श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांना ते ऐकण्यास कान आणि पाहण्यास डोळे नव्हते. आपण आपले प्राण आणि सामान यासहित सुरक्षित निघालो तर मिळवली असे ते समजू लागले. 

सूज्ञ जाणतातच की, परमेश्वराचा कोप झाला तर पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी तो दर्याच्या रूपाने वाहू लागतो. त्याच्या कोपाला तुफान वादळाची जोड मिळते. त्याचा प्रतिकार, माणसे कसा बरे करू शकतील?..

सारांश, त्या काळात रुपयाला एक शेर धान्य मिळे आणि तेही श्रीमंतांनाच. वरून तीव्र आणि झोंबणारा वारा आणि खाली पाणी आणि चिखल याशिवाय दुसरे काहीच दृष्टीस पडत नव्हते. लोकांचे जे हाल झाले ते मी कसे लिहू? घोड्याची निकामी झालेली खोगिरे आणि मेलेल्या माणसांचे सामान पेटवून लोक थंडीचे निवारण करू लागले. आपला उरलेला जीव वाचविण्याकरिता लोकांना हे करावे लागले.

ओढ्याच्या काठावर पावलापावलावर माणसे आणि जनावरे मरून पडली होती, त्याची इतकी दुर्गंधी सुटली होती की, जिवंत माणसांना जीव नकोसा झाला.

कविता – 'तो पहा उपासमार होऊन पडला आहे. तो कोण आहे कळत नाही. तो पहा. त्याचे प्राण कंठाशी आले आहेत. त्याच्याकरिता कोणी अश्रूही ढाळीत नाही.'

सारांश, चोवीस दिवसांनंतर (खेळण्याहून निघून) बादशहा आणि त्याचे सैन्य मोठ्या कष्टाने ओढ्यापार झाले. बादशहाकरिता एक तंबू तेवढा उभा करण्यात आला. तेच अदालत (न्यायालय) आणि तोच तसबीहखाना

(प्रार्थनागृह). साडेतीन महिन्यापासून सूर्य दिसत नव्हता. चंद्रदर्शनही होत नव्हते. सूर्य उगवणार नाही की काय असे वाटू लागले होते.

शेवटी त्याचे दर्शन घडले त्यावेळी मोगल सैन्यात हर्षाचा प्रचंड ध्वनी उठला. काय गलबला आहे हे पाहण्यास बादशहा स्वत: बाहेर आला.

खेळण्याहून चाळीस कोसांचा रस्ता अडतीस दिवसात आक्रमून रबिलावल महिन्याच्या बारा तारखेस मोगल सैन्य बनीशाहदुर्ग (पन्हाळा) येथे पोहोचले (१७ जुलै १७०२). येथे लोकांच्या जिवात जीव आला.

लष्करचे अनेक लोक मागे राहिले होते. त्यांच्या अंगावर कपडा नाही. आणि शरीरे काय, नुसती अस्थिपंजरे राहिली होती. अंगात रक्त म्हणून शिल्लक नव्हते. ते कसेबसे, भिकाऱ्याप्रमाणे, रडत-खडत चारपाच दिवसांनी छावणीत आले. नंतर मोगल सैन्य वडगाव (पन्हाळ्याच्या पूर्वेस तेरा मैलांवर) येथे पोहोचले (३० जुलै १७०२). तेथे एक महिना आठ दिवस बादशहाने मुक्काम केला आणि सैन्याला विश्रांती दिली.


मर्गे ताजा जुहरा गुदाज: आणि निसर्गाची कबर-

आता बादशाही लष्कर पन्हाळा किल्ल्यापासून पुढे पेडगावच्या दिशेने कूच करणार होते. साकी मुस्तैद खान म्हणतो-

‘....पुढे कूच करण्याचा बादशहाने विचार केला. कृष्णा नदी तेथून नऊ कोसांवर अशी खबर त्या चिर-प्रवासी लष्करात पसरली. कुचेच्या कल्पनेने सर्वांच्या हृदयात धडकी भरली. पुन्हा येऊ घातलेले भयंकर मरण (मर्गे ताजा जुहरा गुदाज – नक्षत्र वितळून जावे असे भयंकर मरण) तुम्हाला मुबारक, लखलाभ असो असे ते परस्परांना म्हणू लागले. लष्कराने नऊ कोसांचा प्रवास सोळा टप्प्यात पूर्ण केला. स्वारीची आणि सामान वाहणारी हजारो जनावरे मोगलांनी अत्यंत कष्टाने आणि अवाच्यासवा रक्कम खर्च करून गोळा केली होती. या प्रवासात ती चिखलात आणि दलदलीत अडकून बसली. त्यांना काढता येईना. त्यामुळे त्यांना तेथेच सोडून द्यावे लागले. कृष्णा नदी एक कोसावर राहिली त्या वेळी तर लष्कराचे अतिशय हाल झाले. असंख्य माणसे मरून निसर्गाने तयार केलेल्या कबरीत म्हणजे खड्ड्यात पुरली गेली. चिरकालपर्यंत त्यांची प्रवासातील संकटातून मुक्तता झाली. दुबळे आणि संकटग्रस्त असे तीस-चाळीस हत्ती त्या ठिकाणी गाढवाप्रमाणे दलदलीत रुतून बसले. ते काही केल्या उठेनात. त्या दिवशी जे कोणी जिवानिशी सुरक्षित बाहेर पडले ते खैर झाली असेच म्हणू लागले..’


कृष्णा: बहरे आदमख्वार-

असे हे मोगल लष्कर १९ सप्टेंबर १७०२ रोजी कृष्णेच्या काठावर कसेबसे पोहोचले. साकी मुस्तैद खान म्हणतो- 

‘...शेवटी लष्कर कृष्णेच्या काठावर पोहोचले. तो काय पाण्याचा दर्या होता! छे। त्या रक्ताच्या लाटा होत्या.!!!

नदीचे उतारही सापडेनात व नदीवर थोड्याशा नावा होत्या. त्याही जुन्या आणि मोडलेल्या. युगारंभीच्या हजरत नोहाच्या जहाजावरून त्या कदाचित् घडविल्या असल्यास नकळे. मोगल लष्करावर फिरून एकदा जे संकट कोसळले ते मी कसे लिहू आणि काय लिहू? भांडखोर नावाडी आणि बेमुर्वत व जुलूम करणारी माणसे, लोकांना नदीपार करण्यात सर्वस्व काढून घेण्यास टपून बसलेली असत. आणि त्यांना जास्तीत जास्त कसे नागवावे याबद्दल

त्यांच्यात स्पर्धा लागलेली असे. प्रत्येक नाव म्हणजे एक डोला आणि त्यात शंभर मुडदे अशी स्थिती होती.

लोकांवर काय गुदरले ते काय सांगावे? ज्यांना अंधाऱ्या रात्री नदी ओलांडावी लागली ते हेच म्हणत- अंधारी रात्र, लाटांची भीती आणि भयंकर भोवरे, किनाऱ्यावर उभे असलेल्यांना आमच्या मन:स्थितीची काय कल्पना?

अशा भयंकर दुर्दशेत अठरा दिवसांत नदी ओलांडून झाली (सप्टेंबर १७०२). या काळात नदी पोहून जाताना, किंवा नावा बुडाल्यामुळे, किंवा लाटांच्या मारामुळे किती माणसे त्या नरभक्षक नदीला (बहरे आदमख्वार) बळी पडली याची मोजदाद करण्याची बुद्धी आणि हिंमत कुणात आहे?

सारांश, हरप्रकारची संकटे सहन करून मोगल लष्कर बहादुरगडला पोहोचले. (नोव्हेंबर१७०२)

असो,

.... अशाप्रकारे प्रचंड हालाखीत औरंगजेब बादशहा आपल्या फजित फौजेसह पेडगावात दाखल झाला. शिवछत्रपतींनी राज्य निर्माण करताना सह्याद्रीच का निवडला याचे हे समर्पक उत्तर आहे. ही महाराजांची नेचर इंजीनियरिंग आणि नेचर डिफेन्स सिस्टीम आहे.! जिओ पोलिटिकल म्हणता येईल तेच.!

नेपोलियनची रशियन स्वारी आणि सायबेरियातील बिकट स्थिती, जर्मन सैन्याची स्टालिन ग्राड ची लढाई आणि निसर्गाची आपत्ती.! अशीच उदाहरणे पश्चात इतिहासात घडली. ज्याने संपूर्ण बाजी पलटली.

ज्या बादशहाने संपूर्ण हिंदुस्तानात अगदी विजापूर आणि गोवळकोंडा सुद्धा जिंकलेले होते त्या बादशहाचे स्वराज्यातील किल्ले घेताना असे हाल झाले जे कदाचित पूर्वी कधीच झाले नसावे.!

प्रत्यक्ष पूर्वीच म्हणजे अफजलखान, सिद्धी जोहर व शास्ताखान यांना परास्त केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनीच एका पत्रात बादशहाच्या अधिकाऱ्यास लिहिले की-

...अपार कष्ट रुपी घोडा देखील या कठीण मुलखात संचार करू शकत नाही. ...माझा देश म्हणजे उघड्या आणि विशाल मैदानात असलेली बिदर आणि कल्याण ही स्थळे नव्हेत की मोर्चे लावून आणि हल्ले चढवून जिंकून घेऊन येणे होऊ शकेल. माझ्या मुलखात पर्वतांच्या रांगा आहेत त्या दोनशे फर्लांग लांब आणि चाळीस फर्लांग रुंद बसल्या आहेत. माझ्या मुलखात जंगले नद्या-नाले ठिकठिकाणी आहेत. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले बांधण्यात आले आहेत..

"प्रत्येक ठिकाणी घोडदौड घेणे शक्य होईलच असे नाही, काही ठिकाणी ढाली टाकून देणेच योग्य ठरते..." 

“रक्ताच्या या नदीची भिती सर्व शहाण्यांना वाटते, कारण यातून आपली नाव सुरक्षित नेणे कुणालाच जमले नाही..!!!”(खुतूते शिवाजी)

... अर्थात ६० वर्षांपूर्वी महाराजांनी जे म्हटले होते तसेच घडले. आणि इतके हाल सहन करून बादशहाने जिंकलेला विशाळगड अर्थात खेळणा किल्ला पाठोपाठ मराठ्यांनी महाराणी ताराबाईंचे नेतृत्वात लगेच जिंकून घेतला..!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

  1. खूप छान लिखाण..... इतिहासाचे वास्तविक दर्शनच झाले....

    ReplyDelete

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts