Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

साहबे फुतूहाते उज्जाम



"साहबे फुतूहाते उज्जाम" असा थोरले बाजीराव पेशवे यांचा उल्लेख करणारा ग्रंथकर्ता म्हणजे मिर्झा मुहंमद.! मिर्झा मुहंमद याला ग्रंथवाचनाचा छंद होता. यातूनच इस्लामच्या उदयापासून तो १७४८ पर्यंत होऊन गेलेले प्रमुख मुसलमान बादशहा, सुलतान, नबाब, अमीर-उमराव, धर्मशास्त्रज्ञ, हकीम, पंडित इत्यादींचे मृत्युशक गोळा करून ते टिपून ठेवण्याची त्याला सवय लागली. सहाशे वर्षांचा एक खंड या हिशेबाने त्याच्या या शकावलीचे दोन खंड मिर्झा मुहंमदच्या हस्ताक्षरातील असून ते रामपूरच्या रिजा ग्रंथालयात सुरक्षित आहेत. या ग्रंथाचे नाव 'तारीखे मुहंमदी' असे आहे. त्याबद्दल दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती इतिहासाचार्य सेतू माधव पगडी यांनी लिहून ठेवली आहे त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.!

मिर्झा मुहंमद याचे घराणे मध्य आशियातील. त्याचा पणजा अब्दुल जलील बक्षी हा मध्य आशियातील. त्याचा मुलगा कुबादबेग हा कंधार येथे स्थायिक झाला. औरंगजेबाने त्याला दियानतखान ही पदवी दिली. दियानतखानाचा मृत्यू इ. स. १६७२ मध्ये झाला. त्याचा मुलगा रुस्तुम ऊर्फ मुअतमदखान हा औरंगजेबाच्या पदरी होता. इ. स. १७०५ मध्ये औरंगजेबाने वाकिणखेड्याला वेढा घातला होता. त्या सुमारास मुअतमदखान हा छावणीत वारला.  मिर्झा मुहंमद हा त्याचा मुलगा.

मिर्झा मुहंमद याचा जन्म ४ एप्रिल १६८७ रोजी झाला. तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा इ. स. १७०३ मध्ये रुहुल्लाखान बक्षी याने त्याला औरंगजेबासमोर आणले. औरंगजेबाने त्याला दीडशेची मन्सब दिली.

मिर्झा मुहंमद याच्या काळातील घटनांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांस उपयुक्त आहेत. म्हणून रामपूरचे विद्वान व्यासंगी ग्रंथपाल इम्तियाज अली अर्शी यांनी हिजरी ११०१ ते हिजरी ११६१ म्हणजे पाच ऑक्टोबर १६८९ ते तेवीस सप्टेंबर १७४८ या काळातील नोंदी एकत्र केल्या आणि त्यांच्या गुणदोषांची चर्चा करून त्यांचे उत्कृष्ट संपादन केले. हा ग्रंथ अलीगड विद्यापीठातर्फे १९७३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

ग्रंथात आपल्याला विविध व्यक्तींच्या मृत्यूंच्या तारखा कोठून मिळाल्या याचे संदर्भ मिर्झा मुहंमदने दिले आहेत. जेथे तारखा मिळू शकल्या नाहीत तेथे मृत्यूचे वर्ष दिले आहे.

नोंदी मृत्यूपुरत्या असल्या तरी मधून मधून या नोंदीच्या निमित्ताने मिर्झा मुहंमद हा त्या व्यक्तीसंबंधाने थोडक्यात आपले मत मांडतो. समकालीनाचे मत म्हणून ते अभ्यासकांना उपयुक्त ठरते. याची दोनच उदाहरणे पाहा : राजाराम महाराजांच्या मृत्यूची नोंद घेताना मिर्झा मुहंमद हा पुढीलप्रमाणे लिहून गेला आहे :

शहाजीचा नातू व शिवाजीचा मुलगा रामाजी ऊर्फ रामराजा याने आपला भाऊ संभाजी याच्या मृत्यूनंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखविले (कर्रोफर नमूदा). कर्र म्हणजे शत्रूवर हल्ले चढविणे, फर म्हणजे तेज, दबदबा.

राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी मिर्झा मुहंमद हा तेरा वर्षांचा असून औरंगजेबाच्या छावणीत होता, हे पाहिले तर राजाराम महाराजांबद्दल ‘कर्रौफर' - अर्थात बेडर हल्ले करणे व दबदबा निर्माण करणे हे शब्द बरेच काही सांगून जातात. 

मोगलांचे प्रचारतंत्र काही म्हणो, सामान्य मोगलांचे राजाराम महाराजांसंबंधीचे मत वरील शब्दातून व्यक्त झाले आहे. 

याच ग्रंथात दुसरे उदाहरण थोरले बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूच्या नोंदी विषयी आहे. मिर्झा मुहंमद म्हणतो : 

'दक्षिणी ब्राह्मण बाळाजी विश्वनाथ याचा मुलगा बाजीराव मराठ्यांचे प्रमुख राजे शाहू यांचा सेनापती व प्रचंड विजय मिळविणारा (साहबे फुतूहाते उज्जाम) - नर्मदेच्या काठावर मृत्यू दहा सफर ११५२ हिजरी (सव्वीस एप्रिल १७४०) वय चाळिशीच्या आत.' 

साहबे फुतूहाते उज्जाम" -अर्थात प्रचंड विजय मिळविणारा सेनापती" बाजीरावाच्या कामगिरीचे याहून चांगले मूल्यमापन क्वचितच करता येईल. 

असा हा ग्रंथ उपयुक्त ऐतिहासिक साधन ग्रंथ आहे. शत्रु कडील लेखक असून सुद्धा तो साकी मुस्तैद खान किंवा खाफीखान यांच्या प्रमाणे तो मत्सर भावाने मत मांडत नाही हे विशेष.! शेवटी लेखणीतून लेखकाचीच शाई व्यक्त होत नाही काय..? म्हणून न्याय बुद्धीने लिहिणारी लेखणी व सत्य परिस्थिती व्यक्त करणारी शाई महत्त्वाची ठरते.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts