Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

तंजावर राज्यावरील धार्मिक अतिक्रमण..

 


मित्रांनो धार्मिक अतिक्रमण हा मोगल काळातील राजकारणाचा एक महत्त्वाचा अजेंडा होता. विशेषता: बादशहा औरंगजेबाच्या कारकिर्दीचा. याशिवाय काही युरोपियन गटांनीही धार्मिक अतिक्रमणाला महत्त्व दिले होते. दक्षिणेतील दूर तंजावरच्या भोसल्यांच्या राज्यावरील धार्मिक अतिक्रमणाचा असाच एक प्रसंग जो व्यंकोजी राजे यांचे पुत्र शहाजी राजे यांनी मोठ्या कूटनीतीने परतवून लावला त्याची ही हकीकत.

यावेळी औरंगजेब बादशहा मराठ्यांचे किल्ले घेण्यात गुंतला होता तसेच कर्नाटकात मोगल मराठा संघर्षही सुरू होता. याच सुमारास छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून महाराष्ट्रात परतले होते. यावेळी दक्षिणेतील तामिळनाडचा मोगल प्रशासक दाऊदखान पन्नी हा मोठा कार्यक्षम व तडफदार म्हणून गाजलेला होता.

पंधराव्या शतकाच्या अखेरीस व्यापाराच्या निमित्ताने युरोपियन हिंदुस्थानात आले आणि व्यापाराबरोबरच त्यांनी आपल्या धर्माचे निशाण हिंदुस्थानात रोवले. 

अकबर, जहांगीर व शहाजहान कालात दमन व दिव येथे वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांनी आपल्या धर्म स्थळांसाठी मोगल बादशहाकडून काही अटींच्या बदल्यात हिंदुस्तानात आपल्या धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास परवानगी मिळवली होती.

दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार होऊन दोनशे वर्षे लोटली होती.

महाराज दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जिंजी किल्ल्याची बांधणी करत असल्याचे वर्णन त्या मुलुखातून प्रवास करणारे जेसूईट धर्मप्रसारक आपल्या नोंदीमध्ये लिहितात. अर्थात हिंदुस्तानात अनेक भागात धर्मप्रसारासाठी ही मंडळी फिरत होती.

यातही मुंबईकर इंग्रजांपेक्षा गोव्याच्या पोर्तुगीजांची धार्मिक कट्टरता अधिक होती. 

रोमन कॅथलिक पंथातील जेसुइट हा कडवा गट या कामात अग्रेसर होता. 

असो, दक्षिण भारतात हे लोण पसरत पसरत तंजावरला येऊन भिडले, आणि धर्मप्रसारासाठी जेसुइट लोकांनी राजकारण खेळण्यास सुरुवात केली. मोगल प्रशासक दाऊदखानाला आपल्याकडे वळवून घेऊन तंजावर राज्याचा नाश करण्याचा त्यांनी घाट घशतला. तो डाव शहाजी राजे यांनी कसा उधळून लावला ही हकीकत अतिशय उद्बोधक आहे. 

मोगलांचा एके काळचा अधिकारी सुप्रसिद्ध इतिहासकार निकोलाओ मनुची ह्या इटालियन लेखकाचे आणि दाऊदखानाचे मैत्रीचे संबंध होते. मनुचीने आपले आत्मचरित्र 'स्टोरिया दो मोगोर' या ग्रंथात तंजावरच्या धार्मिक अतिक्रमणाची जी घटना नमूद केली आहे. ('असे होते मोगल' : साहित्य संस्कृती मंडळ, पान ३४०) त्यात मनुची म्हणतो : 


"तंजावर येथे असलेल्या ख्रिस्ती लोकांचा छळ झाला तेव्हा ख्रिस्ती लोकांना मी साहाय्य केले हे मी मागे सांगितले आहे. पण जेसुइट पाद्र्यांचे मी (मनुची) केलेल्या साहाय्याने समाधान झाले नाही. मी दिलेला सल्लाही ते मानीनात. आपली कट्टर मते स्वीकारली जावीत अशी दुराग्रही भूमिका या जेसुइट पाद्र्यांनी घेतली. यात त्यांनी मैलापूरचा लॉर्ड बिशप आफोन्को याचे साहाय्य घेतले. दाऊदखान हा सॅन थॉमला आला असताना लॉर्ड बिशप आफोन्को त्याला भेटला. जेसुइट पाद्र्यांना अनुकूल असे पत्र तुम्ही तंजावरच्या राजाला लिहा, अशी लॉर्ड बिशपने दाऊदखानाला गळ घातली. या जेसुइट पाद्रयांच्या मागण्या तरी काय होत्या ? : १) तंजावरच्या राजाने त्यांचे चर्च बांधून द्यावे. २) आपल्या राज्यात जेसुइट पाद्र्यांना आपले काम करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य द्यावे. ३) जेसुइट पाद्री हे हे पालख्यांतून प्रवास करतील तेव्हा आणि अशाच इतर कामांत त्यांना कोणत्याही प्रकारे अडथळा न व्हावा. दाऊदखान हा शिष्टाचारात मुरलेला माणूस. त्याने लॉर्ड बिशपने म्हटल्याप्रमाणे तंजावरच्या राजाला पत्र पाठविले. असे पत्र पाठविण्यात आपले काही जात नाही, हे त्याला दिसत होते.


त्या पत्राला तंजावरच्या राजाने पुढीलप्रमाणे उत्तर पाठविले : 

“मी मोगल बादशहाचा मांडलिक आहे. आपण (दाऊदखान) माझे मित्र आणि रक्षक आहात. माझ्या प्रजेवर हे परदेशी आपले नवीन आचार-विचार लादून आमचा धर्म नष्ट करू पाहत आहेत. या परदेशीयांना आपण असे करू देऊ नये. त्यांचे चर्च बांधून देणे आणि त्यांचा धर्म चालू देणे हे करण्यास आपण जर मला भाग पाडीत असाल तर कर्नाटकातील कांजीवरम् आणि इतर ठिकाणी असलेल्या जुन्या इमारती नीट केल्या पाहिजेत. आणि याचा तर्कशुद्ध परिणाम म्हणून ब्राह्मणांना त्यांच्या

ठिकाणी राहू देऊन आपल्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे आपले आचार-विचार पाळण्याची परवानगी दिली पाहिजे."


ख्रिस्ती लोकांना अशा प्रकारे धार्मिक अतिक्रमण करायचेच असेल तर जुनी धार्मिक स्थळे आधी नीट केली पाहिजे व जुन्या परंपरा पुनश्च लागू केल्या पाहिजे हा शहाजी महाराजांचा युक्तिवाद परिणामकारक ठरला. धर्माबाबत पाद्र्यांना संपूर्ण मोकळीक द्यायची असेलच तर मग ती येथील स्थानिक हिंदू धर्मियांना का नाही.? त्यांनाही बंधनमुक्त का करू नये.? असा प्रति प्रश्नच शहाजीराजांनी आपल्या पत्रात दाऊद खानाला केला आहे.

हे पत्र दाऊदखानाला मिळाले. त्याने पत्रासोबत तंजावरच्या राजाने पाठविलेल्या भेटीचा आनंदाने स्वीकार केला. दाऊदखानाने राजाला पुढीलप्रमाणे ताबडतोब पत्र लिहिले : 

“तुम्ही मोगलांना पूर्वीप्रमाणेच खंडणी देत राहिले पाहिजे. बाकीच्या मजकुरासंबंधी (जेसुइट पाद्र्यांविषयी) म्हणाल तर तुमची विचारसरणी अत्यंत योग्य आणि मनाला पटेल अशी आहे. माझ्यापुरते म्हणाल तर मी नेहमीच तुमच्या हितसंबंधांची जोपासना करीत राहीन."


मनुचीने शेवटी म्हणतो : 

"जेसुइट पाद्र्यांसंबंधी माझे मन वळविण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यांची अशी इच्छा होती की, दाऊदखानास पत्र लिहून, तंजावरच्या राजावर स्वारी करण्याची मी त्यास विनंती करावी. याबद्दल दाऊदखानास दहा हजार पटाका (वीस हजार रुपये) देण्याचे त्यांनी ठरविले होते. या बाबतीत ढवळाढवळ करण्याचे मी साफ नाकारले." 


दाऊदखानाला वरील पत्रामुळे तंजावरच्या राजाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांनी प्रत्येक ख्रिस्ती माणसावर जबर कर बसविला. हा कर देणे त्यांना असह्य झाले. आपल्या देवळात तुम्ही आले पाहिजे, नाही तर तुम्हांला जबर शिक्षा करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिली. या भयाने हे ख्रिस्ती लोक देवळात जाऊ लागले, तेव्हा तंजावरच्या शेजारील राजेही आपापल्या इलाख्यात ख्रिस्ती लोकांना अशीच वागणूक देऊ लागले.

कट्टर जेसुइटांच्या मनसुब्याचा असा हा शोचनीय शेवट झाला. 

बरे मनुची खुद्द ख्रिस्ती धर्माचा, मात्र तोसुद्धा या कट्टरतेचा विरोध करतो. शेवटी धर्म ही मानण्याची गोष्ट आहे प्रसाराची नव्हे. आमिष देऊन तर नाहीच.!

प्रसारातून संख्या वाढ आणि संख्याबळातून वर्चस्व सिद्ध करण्याची गरज राजकीय पक्षाला असते, ती धर्माला नव्हे. मुळात मानवतेला पायदळी तुडवनाऱ्यांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठीच धर्माचा उदय झालेला असतो. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नव्हे.! तत्वता धार्मिक मुल्यांपासून अलिप्त राहून भौतिक प्रसार करणाऱ्या थोतांड पणाचे हे उदाहरण आहे. आणि त्याला जशास तसे उत्तर देणाऱ्या महाराज शहाजीराजांच्या बुद्धी चातुर्याचा हा इतिहास आहे.! धर्माचा नव्हे तर वृत्तीचा ‘फक्तइतिहास’ आहे !!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts