Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

अब्दालीची रसदबंदी करणारा वीर योद्धा:सरदार गोविंदपंत बुंदेले..

 


ही कथा आहे बाजीराव पेशव्यांच्या खाजगी मालमत्तेचा सांभाळ करणाऱ्या बुंदेलखंडातील मामलतदाराची.!

होय सरदार गोविंदपंत बुंदेले.! यांचे मूळ आडनाव खेर! हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. त्यांचा जन्म इ.स. १७१० मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील “नेवारे” या गावी एका कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाळाजी हे कुलकर्णी होते. तेराचौदा वर्षांचे असतांना वडील वारल्यानें कुळकर्णाचें काम त्यांच्यावर पडलें. मात्र स्वभावाने हूड असल्यानें कुळकर्ण बरोबर चालेना व भाऊबंदांनींही त्रास दिला त्यामुळें व नेवरें येथील बर्व्यांचें उदाहरण पाहून ते तेथून पुण्यास थोरल्या बाजीरावांजवळ शागीर्दाची नौकरी करू लागले. पुढें त्यांचे बाजीरावांनी हेरले व त्यांना छत्रसाल राजाकडून नवीनच मिळालेल्या बुंदेलखंडाच्या कारभारावर नियुक्त केले. (१७३३)

येथून ते पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार किंवा विश्वस्त म्हणून कायम स्थाईक झाले. 

शौर्यानें व धूर्ततेनें वागून त्यांनी रजपूत, रोहिल्यांवर दाब बसवून मराठी साम्राज्याचा दरारा निर्माण केला. नवीन किल्ले बांधून व ठाणीं घालून राज्यविस्तारहि केला. 

सन १७३५ ते १७३६ दरम्यान मध्य प्रदेशातील “सागर” हे शहर गोविंद पंतांनीच वसविले ! सागर, जालौन, गुरुसराय, काल्पि , उरई या जहागिरीची त्यांनी स्थापना केली.

यावेळी कुरईच्या नबाबाकडून त्यांनी जो प्रांत हस्तगत केला त्यांत सागर म्हणून एक प्रचंड तलाव होता. त्याच्याकांठी सागर नांवाचेंच शहर वसवून, तें त्यांनी आपलें राहण्याचें मुख्य ठिकाण केलें (१७३६-३७). 

पुढें फर्रुकाबादच्या लढाईंत रोहिल्यांचा जंगी पराभव करुन ज्या मराठेसरदारांनी दिल्लीच्या बादशाहास धाक बसविला व ज्या लढाईबद्दल ''शाबास तुमच्या हिंमतीची व दिलेरी रुस्तुमेची'' अशी शाबासकी पेशव्यांकडून मिळविली, तींत गोविंदपंतहि एक मुख्य सरदार होता (१७५१). 

पंताचीं २८ वर्षें त्या प्रांतात गेल्यानें त्यांना तिकडील सर्वत्रांचीं खडानखडा माहिती झाली होती. तिकडील कापड व निरनिराळ्या चिजा ते पेशव्यांस पुरवीत असत. त्यांचा धाकटा भाऊ पुण्यास दरबारांत वकील असे. उत्तरेकडील कामाविशीचा पुष्कळ पैका पुण्यास धाडीत; चौदा लाखापर्यंतची ही रसद दरसाल नियमीतपणें धाडण्याबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांना पालखीची नेमणूक १७५० मध्ये झाली. 

रोहिल्यांच्या युद्धापासून त्याच्या प्रांतांत सतत दंगे होऊ लागल्यानें वसुलास अडचण पडली. हिंदुस्थानांत उत्तम व जय्यत अशी वीसहजार फौज सतत पाहिजे अशी त्यांची पेशव्यांकडे सक्त मागणी असे; नाहींतर “रांगडे लोक हरामजादे... फौज नसलिया बंदोबस्त राहणार नाहीं, वसूल येणार नाहीं, हयगय जालिया फजिती'' असें ते स्पष्ट लिहितात. (१७५५). 

बख्र-उल्ला खान हा पातशाहीत एक नामी पराक्रमी सरदार होता. त्यांनी त्याला चारी मुंड्या चित करून त्याचा पराभव केला होता ! हा एक फार मोठा विजय होता. गोविंदपंत यांना या विजया बद्दल आपली पाठ नानासाहेब पेशवे नक्कीच थोपटतील, शाब्बासकी मिळेल असे वाटले होते. पण नानासाहेब पेशवे यांनी या विजयाबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्यांना मनोमन खुप वाईट वाटले !

त्यांना असे वाटले, कदाचित एखादा मराठा सरदार असता तर त्याची नक्की दखल घेतली असती !

आपली खंत व्यक्त करायची म्हणुन त्यांनी २३ सप्टेंबर १६५५ रोजी नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिले आहे.

आमची दखल का घेतली नाही ? का आम्ही ब्राह्मण म्हणुन दुर्लक्षित आहे. त्यात त्यांनी स्वतःचा उल्लेख, ‘आम्ही कान धरली शेळी आहो" असा केला आहे.  

उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… आपली खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात, आमच्या ठिकाणी मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते, खूप गौरव केला असता. आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार?

गोविंदपंतांनी या ठिकाणी आम्ही ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात. (मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३, लेखांक १३७)

पंतांनी बक्रुल्लाखानास बडवून सर्व कुराकडा प्रांत काबीज केला खरा; परंतु राघोबादादानें तो आपला मेहुणा गोपाळराव बर्वे याच्या हवाली केला. त्यामुळे पंत व बर्वे यांचें वाकडें आलें. या कुराकडा प्रांतांत १८ परगणे होते. पुढें त्यांनी अंतर्वेदी जिंकून इटावा येथें जबरदस्त लढाई देऊन अस्करअल्लीस ठार केलें (१७५६) व पुष्कळ प्रांत मराठी राज्यास जोडून दिले. 

पुढे शिंदे-होळकरांतील तंट्याबद्दल लिहून, 'पातशहांत व वजिरांत कलागत लागली, त्यामुळें सरकारी कार्य जें म्हणावें तें होणार असा समय कधीं येणार नाहीं’ तरी आपण या, असा तो १७५६ त पेशव्यांना आग्रह करतात. परंतु या संधीचा फायदा पेशव्यांनीं घेतला नाहीं. 

यानंतर अबदालीच्या स्वा-यांमुळें उत्तरेस वसूल बरोबर जमत नसे व अशा तक्ररी पंतानेंच एकट्यानें केलेल्या नसून शिंदेहोळकरांनींहि केलेल्या आहेत. देशीं आल्यावर त्यांनी वाईजवळील वाकेश्वराचा जीर्णोद्धार करुन देवास बावधन येथें इनाम दिलें. बावधानास ते राहात असत. हिंदुस्थानांत परत जातांना पेशव्यांनीं त्यांचा गौरव केला. कुंजपुऱ्याच्या (१७६०) लढाईंत पंत हजर होते.

उत्तरेंत आल्यापासून मरणपावेपर्यंत (१७५८-६०) पंत एकसारखे लढायांत खपत होते. त्यांचे हिशेब तपासण्यास पुण्याहून सरकारांतून हिशेबतपासनीस गेले होते. परंतु रोहिल्यांच्या मोहिमा न संपल्यामुळें हिशेबाचें काम तसेंच राहिलें आणि पुढें तर पानिपतचे युद्ध घडून आले. 

सन १७६० च्या नोव्हेंबरमध्यें पंतांनी अब्दालीची रसद बहुतेक बंदच पाडली होती. अब्दालीच्या फौजेचे हाल होऊ लागले. अब्दालीने आताईखानाला त्यांच्यावर पाठवले. त्यावेळीं खानानें लबाडीनें होळकरांचें निशाण पुढें धरलें; त्यामुळें पंत फसले. (२२ डिसेंबर १७६०). 

काशीराज पंडिताने गोविंद पंतांची ही अखेरची हकीकत लिहिली आहे. तो म्हणतो-

‘गोविंद पंडिताकडे इटावा, शिकोहाबाद आणि अंतर्वेदीतील मुलूख होता. याशिवाय काल्पीपासून सागरपर्यंतचा मुलूख त्याच्या रास्त अंमलाखाली होता. त्याला सदाशिव भाऊने आज्ञा केली होती की तुम्ही आपले आणि इतर जमेल ते सैन्य घेऊन शहा दुराणीच्या पिछाडीवर यावे आणि अहमदशहाची रसद तोडावी. त्याप्रमाणे गोविंदपंताने बारा हजार स्वार घेतले. तो दिल्लीच्या बाहेर पडला. त्याने नदी ओलांडून मीरठ पर्यंतचा मुलूख उध्वस्त केला. यामुळे अहमदशहाच्या छावणीत रसदेची इतकी टंचाई की धान्याची धारण दोन रुपायाला एक शेर अशी झाली. दोन दिवसापर्यंत अशी परिस्थिती होती. अहमदशहाने शहावलीखानचा चुलत भाऊ अताईखान याला दोन हजार स्वार बरोबर घेऊन गोविंदपंतावर ताबडतोब चाल करून जाण्याची आज्ञा केली. अताईखानाच्या दस्त्याच्या बरोबर दहा हजार यतीम शिपाई पण लुटीच्या आशेने त्याच्याबरोबर दिघाले. अताईखान वाटेत कोठेही न थांबता भल्या पहाटे गोविंदपंतावर तुटून पडला. मराठ्यांची फौज उधळून गेली. अनेक मारले गेले आणि कित्येक जखमी झाले. धावपळीत तो घोड्यावरून खाली आला, आणि दुराणीच्या हाती सापडला. त्याचे डोके कापण्यात आले. आणि मग समजले की तो गोविंदपंत होता. सारांश मराठ्यांची फौज गारत झाली. चवथ्या दिवशी अताईखान हा गोविंदपंतांचे शिर आणि शत्रूची लूट घेऊन अहमदशहापाशी आला. अहमदशहाने त्याची तारीफ करून त्याच्यावर कृपेची वृष्टी केली. ही बातमी ऐकून सदाशिवभाऊ हा अत्यंत कष्टी आणि अस्वस्थ झाला. याशिवाय दोन ठिकाणाहून त्याला दुर्घटनेचे वृत्त कळले. पण तो शूर आणि हिंमतवान होता. त्याने या गोष्टीची पर्वा केली नाही.’

पुढे पंताचा मुलगा बाळाजी हा व त्यांचे वंशज पेशवाई अखेर बुंदेलखंडप्रांती कारभार करीत राहिले. पुढे या घराण्याच्या सागरकर व जालवणकर अशा दोन शाखा झाल्या. (राजवाडे खं १; मराठी रियासत)

असो, अशाप्रकारे कित्येक वर्षे उत्तरेत राहून गोविंद पंतांनी मराठा साम्राज्याची बाजू केवळ सांभाळलीच नाही तर पानिपत युद्ध प्रसंगात प्रत्यक्ष मैदानात उतरून काही काळ तरी अबदालीची नाकेबंदी करून आपला देह स्वराज्याच्या कार्यात खर्ची पाडला.!

पानिपताच्या या महासंगरात पानिपत युद्धापूर्वी आणि युद्धात बलिदान देणाऱ्या हरेक जंगे बहाद्दर योद्ध्यास मानाचा मुजरा.!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

faktitihas

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts