Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

कथा जगन्नाथ मंदिराच्या विध्वंसाची..

 


मित्रांनो,

मोगलांनी विजापूर पश्चात गोवळकोंड्याचे राज्य जिंकून घेतल्यानंतर (इ. स. १६८७) कृष्णेच्या दक्षिणेकडील कांजीवरम्पर्यंतचा भाग त्यांच्या ताब्यात आला. 


इ. स. १६८९ मध्ये औरंगजेबाने कर्नाटक प्रांताच्या अधिकाऱ्यांना (हैदराबाद, कर्नाटक व विजापूरकर्नाटक हे दोन्ही प्रांत) आदेश पाठविले की, त्या प्रांतातील सगळी देवळे पाडून नष्ट करण्यात यावीत. पांडेचरीचा फ्रेंच प्रशासक प्रांसोआ मार्टिन याने इ. स. १६८९ च्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या डायरीत लिहिले आहे की औरंगजेबाच्या ह्या आदेशाने कर्नाटकातील हिंदू जनतेत फार मोठी घबराट पसरली. सर्वात मोठी तीव्र प्रतिक्रिया (आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील) व्यंकटगिरीचा जमीनदार आणि शिबंदीचा प्रमुख आचम नाईक ह्याची होती.


ह्याच वेळी राजाराम महाराज हे महाराष्ट्रातून निघून जिंजीस पोहोचले. मोगलांच्या विरुद्ध जिंजी येथे तळ उभारून संघर्ष चालू ठेवावा ही त्यांची योजना. औरंगजेबाच्या धर्मवेडाने राजाराम महाराजांना अनपेक्षितपणे गोवळकोंडा राज्यातील आचम नाईक वगैरे असंतुष्ट जमीनदारांचे मोठे साहाय्य मिळाले. आचम नाईक हा सरळ जिंजीस जाऊन राजाराम महाराजांना मिळाला. 

समकालीन इतिहासकार निकोलावो मनुची हा इ. स. १७०० मध्ये मद्रासमध्ये होता. इ. स. १६९० मधील घटनांच्या बाबतीत लिहिताना तो म्हणतो-

'कर्नाटकात मद्रासपासून काही अंतरावर एक प्राचीन आणि प्रसिद्ध देवालय आहे. ह्या देवालयाला तिरुपती म्हणतात. ह्या ठिकाणी हिंदुस्थानातील सर्व भागांतून यात्रेकरू येतात. ह्या देवालयाला अनेक मौल्यवान भेटी सतत देण्यात येतात. त्यामुळे हे देवालय अतिशय श्रीमंत आहे. ह्या देवालयाचे मोठे उत्पन्न पाहता औरंगजेबाने त्याचा विध्वंस करण्याचे आजपर्यंत तहकूब केले आहे. पण देऊळ फोडण्याचे थांबविले याचे माझ्या मते कारण दुसरेच आहे आणि ते म्हणजे बंडे उफाळून येतील आणि ती मोडून काढणे फार कठीण जाईल अशी औरंगजेबाला भीती वाटते.'

असो,

मोगलांना मोठ्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले व शेवटी त्याचे धार्मिक धोरण बारगळले. मात्र या सुमारास औरंगजेबाच्या याच अधार्मिक आदेशाचे पालन ओरिसातील सुप्रसिद्ध देवालयात होऊ लागले. त्याचीच ही कथा, उडरा देसी विराजमान भगवान जगन्नाथाची.!


खान-ए-दौरान हा इ. स. १६६७ पर्यंत ओरिसाचा सुभेदार होता. त्यानंतर तरबियत खान, सफी खान, रशीदखान, आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून बोटे छाटलेला शाहिस्ताखान बंगालच्या सुभ्यावर गेला. बंगाल ओरिसा या भागात त्याने प्रशासकीय अंमल चालविला. शायस्ताखानानंतर सालेह खान. यापुढील अठरा वर्षांत अब्दुल नसरखान (बहुधा शायस्ताखानाचा मुलगा) आणि मोहम्मद अक्रमखान हे सुभेदार होऊन गेले. या सुमारास औरंगजेबाचे लक्ष पुरीच्या जगन्नाथाकडे वळले. ते देवालय उद्ध्वस्त करून मूर्ती विजापूरला पाठवण्यात याव्या अशी औरंगजेबाने आज्ञा केली. 

खुर्याचा राजा दिव्यसिंह हा जगन्नाथाच्या देवालयाचे वंशपरंपरा विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या घराण्यातील होता. मोगलांचा मांडलिक म्हणून औरंगजेबाची आज्ञा मानणे त्याला भाग होते. सुभेदार अक्रमखानाला दिव्यसिंहाने कसे तोंड दिले..? काय त्याने बादशहाच्या आज्ञेचे पालन केले..? देवालयाचा विध्वंस झाला...? मूर्ती औरंगजेबाकडे गेल्या..? या प्रश्नांची उत्तरे सांगणारी विलक्षण कथा जगन्नाथपुरीच्या बखरीत(मदाला पंजी) आणि समकालीन फारसी ऐतिहासिक साधनांतून मिळाते.


इ. स. १६९०-९१ मध्ये अक्रमखान हा ओरिसाचा सुभेदार होता. त्याच्यापूर्वी नसरखान (१६८७) हा सुभेदार होऊन गेला. तर सुभेदार नरसखान याच्या आपत्ती बद्दल जगन्नाथपुरीची बखर ‘मदला पंजी’ म्हणते :


'मुकुंद देवाच्या कारकीर्दीच्या ३१ व्या वर्षी नबाब अब्दुल नसरखान (ओरिसाचा सुभेदार) हा जगन्नाथाचे देवालय उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने पिपली गावापर्यंत आला. मुकुंद देव जवळच असलेल्या दंड मुकुंदपूर या गावी जाऊन राहिला. तो अब्दुल नसरखानाला भेटू इच्छीत होता. त्याच रात्री पिपली येथे मोठे वादळ होऊन विजा कोसळल्या. त्यामुळे विध्वंसाचा बेत सोडून सुभेदाराने राजे मुकुंद देव याच्याशी मैत्री केली. त्यानंतर तो कटकला परत गेला (इ. स. १६८७).

यानंतर जगन्नाथ मंदिरावरील आपत्ती काही काळ टळली. मधल्या चार-पाच वर्षांचा काळ लोटला. औरंगजेब बादशहाने विजापूर गोवळकोंडा ही राज्ये हस्तगत केली होती. या सुमारास औरंगजेबाचे लक्ष पुरीच्या जगन्नाथाकडे वळले. ते देवालय उद्ध्वस्त करून मूर्ती विजापूरला पाठवण्यात याव्या अशी आज्ञा औरंगजेब बादशहाने ओरिसाच्या नव्या सुभेदाराला अर्थात अक्रमखानला केली. जगन्नाथ मंदिरावर पुनश्च एकदा आपत्ती येऊन ठेपली.!

१६ मे इ. स. १६९२ रोजी काय घडले त्याबद्दल मदला पंजी बखर म्हणते : 


‘या दिवशी औरंगजेबाचा सुभेदार अक्रमखान हा पुरी येथे आला. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ मरमस्त खान (मरहमत खान असावा), जमान कुली आणि इतर ५० घोडेस्वार हे होते. ते आणि राजा दिव्यसिंह देव यांनी देवालयाच्या सिंहद्वाराला लागून असलेला मंडप आणि त्यावरील घुमट फोडले. त्यांनी भोगमंडपात असलेली चक्रे काढून घेतली. मोगलांनी जगन्नाथाच्या लाकडी मूर्तीही नेल्या. अक्रमखानाचा भाऊ देवळाच्या गर्भगृहातील मूर्तीच्या सिंहासनापर्यंत गेला.' 

वरील मजकूर समकालीन अशा एका फारसी ग्रंथातही आला आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे 'तबसीरुतुल नाझिरीन'. याग्रंथातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे :

'मीर सय्यद बिलग्रामी हा विद्वान, धर्मनिष्ठ आणि आदरणीय माणूस होता. ओरिसाचा सुभेदार मोहम्मद अक्रमखान याचा तो अधिकारी होता. औरंगजेबाने जगन्नाथाचे देवालय नष्ट करावे अशी आज्ञा आपला ओरिसाचा सुभेदार अक्रमखान याला केली. राजा दिव्यसिंह देव (खुर्याचा राजा) याच्या ताब्यात जगन्नाथाचे देऊळ होते. त्याने अक्रमखानाची व आपली भेट घालून द्यावी अशी मीर सय्यद बिलग्रामी याला विनंती केली. राजाने आश्वासन दिले की, 'आपण देवालयाची मोडतोड करू आणि मूर्ती बादशहाकडे पाठवू.' देवालयाच्या प्रवेशद्वारापाशी एका राक्षसाचा पुतळा होता. तो दिव्यसिंहाने फोडला. तसेच त्याने देवळाच्या प्रवेशद्वारावरील दोन बुरुज (घुमट) पाडले. मूर्ती चंदनाच्या होत्या. त्यांच्या डोळ्यांत मूल्यवान रत्ने बसविली होती. या मूर्ती काढून नेण्यात आल्या. पुढे त्या मूर्ती औरंगजेबाकडे त्याच्या विजापूरच्या छावणीत पाठवण्यात आल्या. औरंगजेबाच्या आज्ञेने त्या मूर्ती मशिदीच्या पायऱ्यांखाली टाकून देण्यात आल्या.'

मदला पंजी बखरीतील या हकीकतीचे अधिक विश्लेषण चकडा पोथी या नावाने लिहिलेल्या ग्रंथात होते. त्या ग्रंथात यासंबंधीचा आलेला मजकूर पुढीलप्रमाणे आहे :

'त्या दिवशी (१६ मे इ. स. १६९२) बादशहाच्या (औरंगजेब) आज्ञेने सुभेदाराचा (ओरिसाचा) भाऊ जमाल, त्याचा सहकारी अब्दुल्ला खान आणि राजा (दिव्यसिंह) हे पुरीला आले. राजा दिव्यसिंह याने देवालयाचे मुख्य द्वार फोडले, आणि सिंहद्वार बंद केले. त्याने जगन्नाथ देवाच्या मूळ मूर्तीसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती तयार केल्या (कृष्ण, बलराम आणि सुभद्रा). त्या मूर्ती त्याने जमालखानाला दिल्या. जमालखानाने त्या मूर्ती आपल्याबरोबर कटकला नेल्या. तेथून त्याने त्या मूर्ती बादशहाकडे (औरंगजेब) पाठविल्या.’


असो,

जगन्नाथाच्या खोट्या मूर्ती तयार करून दिव्यसिंहाने त्या मोगलांना दिल्या. असे म्हणतात की, याच मूर्ती पुढे औरंगजेबाच्या आज्ञेने विजापूरच्या मशिदीच्या पायरीखाली पुरण्यात आल्या. प्रार्थनेस जाणाऱ्या लोकांनी मूर्ती रोज तुडवीत जावे हा या आज्ञेमागील हेतू.

तर अशी आहे जगन्नाथाच्या देवालयाच्या विध्वंसाची ही कथा. पंढरपूर, मथुरा, काशी सोमनाथ किती हा विध्वंसाचा अट्टाहास.. तरी उरला तो जगन्नाथ.!

मित्रांनो,

इतिहासातून धर्म दाखवण्याचा हा प्रयास नसून मानवाच्या अधर्मी कृतीचे हे प्रतिबिंब आहे.! आणि मानवाचे कर्म दाखवणे हाच इतिहासाचा धर्म आहे..!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

faktitihas

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts