छत्रपती शंभूराजांनी लिहीलेल्या "बुधभूषणम्" व "नखशिख" या ग्रंथामध्ये श्री गणरायांचे अप्रतिम वर्णन केले आहे.
बुधभूषणम् मधील पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकांत शंभूराजे म्हणतात,
देव-दानव कृत स्तुति भाग हेलया विजीत दर्पितनागम् |
भक्तविघ्नहनने धृतर त्वं, तं नमामि भवबालकरत्नम् ||१||
अर्थात,
गर्वोन्नत हत्तींना सहज रीतीने जिंकून देवदानवांच्या सर्व लोकांचे स्तुतीस पात्र ठरलेले, भक्तांच्या विघ्नांचे हरण करणाऱ्या व रत्न धारण करणार्या श्री शिव शंकराच्या बालकरत्नास मी नमन करतो. ते देवदानवांनी प्रशंसा केलेले व भक्त दुःख नाशक यत्न करणारे आहेत.
बुधभूषणम् मधील पहिल्या अध्यायातील ४५ व्या श्लोकांत शंभूराजे म्हणतात,
गण्डस्थलीगलदमन्दमदप्रवाह |
माद्यद्विरेफमधुरस्वरदत्तकर्णः ||
हर्षादिवालसनिमीलितनेत्रयुगमो |
विघ्नच्छिदे भवतु भूतपतिर्गणेश: ||४५||
अर्थात,
हत्ती मुखाचा मुखवटा धारण केलेले, त्यावरील गंडस्थळातून पाझरणाऱ्या प्रवाहातून मस्त झालेले भ्रमर मधुर स्वर निर्माण करीत आहेत. तो कानांना तृप्त करतो. त्यामुळे हर्ष व विलास निर्माण झाल्याने नेत्र युगल हे मंदावले आहेत, असा तो प्रभावशाली होणारा पंचमहाभूतांचा प्रमुख गणनायक आपले विघ्नहरण करो...
तसेच आपल्या "नखशिख" या हिंदी काव्य ग्रंथात शंभूराजे म्हणतात,
पद पदम पत्र सम चरन जंघ जिमी कनक करभ कर ॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल,
एकदंत अरू सुंड लवत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली पलक श्रवन सीस छवि सों मढत,
ग्यान होत अग्यान के सो गुन नायक के गुन पढत ॥
अर्थात,
गणेशाचे पाय हे कमलपात्राप्रमाणे समचरण, जांघ सोनेरी माशांची बनविलेली असून, नाभी खोल तर पोट लांब आहे. गणेशाची छाती अत्यंत विशाल असून चार हात धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत. एक दात आणि सोंड ही सगळ्या पापाचे हरण करीत आहेत. अत्यंत सुंदर डोळे, मोकळे कान व शिर्ष सौंदर्याने नटवलेले आहे.
शंभूराजे लिहितात की, श्री गणरायाचे गुणगान केल्याने अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो.
शंभूराजांसाठी केशव पंडितांनी सन १६८२ मध्ये 'धर्मकल्पकता' हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ निर्माण केला. त्यात केशव पंडित म्हणतात,
पृथ्वीवरील इंद्र, ज्याची कीर्ती पसरलेली आहे, धर्ममूर्ती लोक ज्याला प्रिय आहेत असे क्षत्रिय कुलालंकार, सिंहासनाधिपती शंभूराजे यांच्या दानाने लोक सुखी होतात, त्यांचा विजय असो..!
शौर्य साहस अन् सकलशास्त्राचा निशा -शंभूराजा ||
रणांगणातील बेखौफ योद्धा ज्याने आपल्या तलवारीने आपल्या रक्ताने इतिहास लिहिला, तोच शंभूराजा एक प्रतिभावान कवी, विद्वान, अनेक भाषांचा जाणकार आणि थोर तत्त्वज्ञानी होता.
तलवार असो वा लेखणी आणि रणं असो वा कागद, आपण हो राजे अखंड सूर्यसमान !
सेवेसी....
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट